Skip to main content
x

परेरा, ब्रॅण्डन कॉनन

           कोणीसशेसाठ आणि सत्तरच्या दशकांत जाहिरातकलेच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ब्रॅण्डन कॉनन परेरा यांचा मुंबईत जन्म झाला व त्यांचे शालेय शिक्षण सेंट मेरीज हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी १९४५ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच त्यांनी १९४८ मध्ये उपयोजित कलेतील पदविका प्राप्त केली.

          सुरुवातीला त्यांनी एल.ए. स्ट्रोनॅक्स, डी.जे. केमर अशा जाहिरातसंस्थांमधून काम केले. ते १९५६ मध्ये लंडनला गेले आणि त्यांनी तिथे रेपिअर डिझाइन, बॅरन मॉस आणि सी.व्हर्नान्स अशा प्रसिद्ध जाहिरातसंस्थांमधून काम केले. त्यांनी लंडनमधल्या वास्तव्यात जाहिरातकलेच्या विविध अंगांचा अभ्यास चालू ठेवला. डिझाइन, कॉपी राइटिंग, प्रॉडक्शन, मीडिया, तसेच कायदा, अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवस्थापन या शाखांचा त्यात समावेश होता.

          त्यांनी १९६१ मध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून ‘अय्यर्स’ या जाहिरातसंस्थेत प्रवेश केला. अय्यर्स लंडनमधल्या एलपीई (द लंडन प्रेस एक्स्चेंज) या जाहिरातसंस्थेशी संलग्न झाली आणि ‘एलपीई अय्यर्स’ असे तिचे नामकरण झाले. त्या वेळेस परेरा यांची या जाहिरातसंस्थेच्या संचालक मंडळावर निवड झाली.

           ‘जे.जे.चे त्या वेळचे डायरेक्टर चार्ल्स जेरार्ड यांच्याकडून इलस्ट्रेशनच्या माध्यमातून योग्य संवाद कसा साधायचा हे मी शिकलो,’ असे परेरा यांनी आपल्या ‘चेन्जिंग फेसेस’ या पुस्तकात नमूद केले आहे. त्या काळातले प्रसिद्ध संकल्पनकार पी.एन. सर्मा  यांचा, ‘विचार करा, विचार करून तर्कशुद्ध मांडणीपर्यंत या’ या शिकवणुकीचा प्रभावही परेरा यांच्यावर होता.

          मुंबईस परत येण्यापूर्वी परेरा यांनी, ‘अय्यर्स’मध्ये ज्या ब्रॅण्ड्स अथवा उत्पादनांसाठी काम करावे लागणार होते, त्यांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी लंडनच्या ‘बीकॅम इंटरनॅशनल’ या संस्थेत काम केले. तिथे ब्रॅण्ड मॅनेजमेंट या नव्याने रूढ होत असलेल्या व्यवस्थापनपद्धतीचा अनुभव घेतला. भारतात परतल्यावर अय्यर्समध्ये परेरा यांनी कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि सर्जनशीलतेला वाव देणारे मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्जक व्यक्तींचे सहा स्वतंत्र गट करून त्यांच्यावर विशिष्ट उत्पादनांच्या जाहिरातींचे काम सोपवले. या प्रत्येक गटात कॉपिराइटर, संकल्पनकार, इलस्ट्रेटर अशांचा समावेश होता.

          परेरा यांच्या कारकिर्दीत छायाचित्रणाला महत्त्व दिले गेले आणि विलास भेंडे, मित्तर बेदी यांच्यासारखे उत्तम छायाचित्रकार तयार झाले. ‘टेरीन’चा पॉलिएस्टर धागा आणि तो धागा वापरून साड्या तयार करणारी ‘लक्ष्मी विष्णू’ ही कापडगिरणी यांच्या जाहिराती परेरा यांनी केल्या आणि त्या गाजल्या. वस्त्रांबरोबरच आनुषंगिक वस्त्रप्रावरणे, फॅशन शो डिझाइन करण्यापासून त्यांचे छायाचित्रण,  जाहिराती करण्यापर्यंत सारे संकल्पनात्मक नियोजन ब्रॅण्डन परेरा यांचे होते.

          अय्यर्समध्ये असताना परेरा यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली. तेथे १९६९ मध्ये मानसशास्त्रीय विश्लेेषक (सायकोअ‍ॅनलिस्ट) डॉ. चक्रपाणी यांची नेमणूक केली. जाहिरातींचे संकल्पन करीत असताना समाजाची, ग्रहकवर्गाची मानसिकता लक्षात घेऊन जाहिरातसंकल्पन ग्रहकसन्मुख करणे त्यामुळे शक्य झाले. जाहिरातसंस्थेत अशा पद्धतीने विचार करण्याची पद्धत त्या काळात तरी नवीन होती. त्यांचा १९७२ मध्ये ‘चैत्र अ‍ॅडव्हर्टायझिंग’ची स्थापना करण्यात सहभाग होता. त्यांनी १९८३ मध्ये ‘चैत्र’ सोडली व ‘ग्लिमा’ नावाची संस्था काढली. ‘क्लॅरियन’ या जाहिरातसंस्थेत ते क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणूनही काम करीत होते.

          परेरा यांनी १९९२ मध्ये ‘नोव्हा’ जाहिरातसंस्था काढण्यास मदत केली. तिथे ते दोन वर्षे अ‍ॅक्टिंग मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्यांनी झेवियर्स कम्युनिकेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पॅकेजिंग इन्स्टिट्यूट अशा अनेक संस्थांमधील विद्यार्थ्यांना शिकवले. चाळीस वर्षांच्या आपल्या कारकिर्दीवर परेरा यांनी ‘चेन्जिंग फेसेस’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी केलेल्या  जाहिरातींचे नमुने दिलेले आहेत आणि स्वतःचे अनुभवही सांगितले आहेत.  ते १९७७ ते १९९३ या काळात ‘कॅग’चे अध्यक्ष होते. नंतरही ‘कॅग’चे सदस्य या नात्याने ते जाहिरातींच्या जगाशी संबंध ठेवून आहेत.

- दीपक घारे, रंजन जोशी

परेरा, ब्रॅण्डन कॉनन