Skip to main content
x

पटवर्धन, गजानन कृष्ण

          जानन कृष्ण पटवर्धन यांचा जन्म; प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगली येथे झाले. १९४० साली त्यांनी बी.एस्सी. (कृषी) पदवी कृषी महाविद्यालय, पुणे येथून विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. पदवी मिळताच ते कृषी खात्यात नोकरीला लागले. ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे ते कृषिविद्या विभागात कार्यरत होते. या विभागात मुख्यत्वे उसाच्या पोषणासंबंधी त्यांनी संशोधन केले. उसासाठी सेंद्रिय खताची आवश्यकता असते. संपूर्ण नत्र रासायनिक स्वरूपात न देता २/३ नत्र पेंडीच्या स्वरूपात द्यावा असे सुरुवातीचे विचार पेंडीच्या दुर्मीळतेमुळे बदलण्याची पाळी आली. त्या वेळी पेंड मिळत नसेल, तर एकरी १० टन शेणखत किंवा कंपोस्ट वापरावे, अशी शिफारस करण्यात आली. एवढे कंपोस्ट मिळणेही दुरापास्त होते. म्हणून उसाचे शेतातील पीक काढल्यानंतर राहिलेले पाचट वापरून कंपोस्ट केल्यास निदान निम्मी गरज भागेल, असे त्यांचे मत होते. ऊस पिकाला एकरी १०० कि.ग्रॅम स्फुरद आवश्यक आहे, त्यासाठी सुपरफॉस्फेट वापरल्यास टनेज व साखर उतारा चांगला मिळतो. वरंब्याच्या उतारावर मध्यावर स्फुरदयुक्त खत दिल्यास पीक अधिक मिळते. म्हणून ते जमीन पृष्ठभागावर देऊ नये. त्याचप्रमाणे उसाला १०० किलो पालाश सल्फेट स्वरूपात देण्याची त्यांची शिफारस होती. अमोनियम सल्फेटबरोबर ही दोन्ही खते दिल्यास पेंड नाही दिली तरी अन्नांश दृष्टीने फार फरक पडणार नाही व पेंड जनावरांना खाद्यासाठी उपलब्ध होईल. उसामध्ये सुरुवातीच्या काळात मका हे आंतरपीक घेऊ नये, कारण फुटवे व वाढीवर परिणाम होऊन टनेजचे नुकसान होते. क्षारयुक्त सिंचित जमिनीत २० निरनिराळी पिके घेऊन त्यांची क्षारप्रतिकार क्षमता अजमावण्यात आली. धैंचा, ऊस, कांदा, भात, सूर्यफूल, लसूण व गहू (खपली) ही पिके क्षारयुक्त जमिनीत इतर पिकांच्या मानाने चांगली येतात. ही पिके फेरपालटीसाठी वापरून जमीन सुधारते व उत्पन्नही मिळते असे त्यांना आढळले होते. कोईमतूरहून आलेल्या उसाच्या अनेक जातींमध्ये १९४९ साली त्यांना सीओ ४१९ हीच जात श्रेष्ठ असल्याचे आढळले. नंतर १९५६ मध्ये सीओ ७४० हे उन्नत वाण अधिक चांगले असल्याचे दिसून आलेे. या दोन्ही जाती मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आल्या.

          १९६० ते १९६३ दरम्यान कोलंबो योजनेअंतर्गत ऑस्ट्रेलियात ऊस विषयात त्यांनी एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. परत आल्यावर १९६४मध्ये ते ऊस विकास अधिकारी या नात्याने निरनिराळ्या जिल्ह्यांत कार्यरत होते. मुंबई राज्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी म्हणून पुणे येथे काम करत असताना १९७६ साली सेवानिवृत्त होऊन पुण्यात स्थानिक झाले.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

पटवर्धन, गजानन कृष्ण