Skip to main content
x

पटवर्धन, वसुंधरा कृष्णाजी

          था क्षेत्रात आपला खास ठसा उमटविणार्‍या वसुंधरा पटवर्धन या मागील पिढीतील वाचकप्रिय ज्येष्ठ लेखिका आहेत. त्या पूर्वाश्रमीच्या वसुधादेवी काशीनाथ खानविलकर असून त्यांचा जन्म मुंबईत गिरगावात झाला. आई इंदिराबाई ह्या कामसू, चटपटीत, शिस्तप्रिय आणि सेवापरायण अशा होत्या. वडील काशीनाथ (खानसाहेब) बुद्धीमान होते. ते लेकीवर जास्त माया करत असत. ते ब्राह्मणसभेचे काम करत असत. आई-वडील दोघांनाही वाचनाची आवड होती. वडिलांनी वसुधाकडून बालपणी ‘वाईकर भटजी’ ही कादंबरी दोनदा वाचून घेतली  होती. वसुंधराताईंवर वडिलांचे जास्त संस्कार झाले. नाथीबाई दामोदर ठाकरसी शाळेत त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. मराठी सातवी (फायनल), इंग्रजी ४थी इतके शिक्षण त्यांनी घेतले. त्या साहित्यविशारदही झाल्या. लहानपणा-पासूनच त्यांना लेखन-वाचनाची आवड होती. लहानपणी शाळेतल्या बाई इतर मुलींना वसुधादेवीचे निबंध आवर्जून वाचून दाखवायच्या. वडिलांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडले. वडिलांनी त्यांना गाणे गायची प्रेरणा दिली. त्या पेटीही वाजवायला शिकल्या. घरी सुबत्ता होती. आई सुगरण होती. वडील लाड करायचे. त्यामुळे त्यांचे बालपण आनंदात गेले. पंधराव्या वर्षी लग्न झाले अन् वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन अशी त्यांची नवी ओळख झाली.

वसुंधराताईंंना स्वतंत्र विचार करण्याची आवड पूर्वीपासूनच होती. कीर्तन, प्रवचन, भाषणे ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. श्रवणामुळे कानाबरोबरच मनही तयार झाले. अनुभवविश्व नकळत समृद्ध झाले. माणूस वाचायची सवय लागली अन् घटना-प्रसंगांतून चिंतन सुरू झाले. अंगी असलेली कल्पकता लिखाणाला साथ देऊ लागली. अंतर्मुख करणारे संवेदनशील मन लाभल्याने जे अनुभवले, त्यातील जे वेधक, ते त्यांनी टिपले अन् मग ते सारे त्यांच्या लेखणीतून सहजतेने झरू लागले. लेखन ही सहजस्फूर्त कला आहे, हे त्यांना अनुभवाने पटले. आसपासचे वातावरण, स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या जीवनातील घडामोडी हे सारे पाहता-अनुभवता त्यांना उत्तम कथा-बीजे मिळाली. त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी स्त्रीजीवन विषयक उत्कट अनुभूती आहे. कथाकादंबरी लिहिताना स्वभावचित्र रेखाटनाला त्यांनी विशेष प्राधान्य दिले. वसुंधराताईंचे लेखन नीटनेटके, सरल आहे. सहजता हा विशेष गुण असल्याने त्यांचे लिहिणे नेहमीच अनलंकृत पण आकर्षक राहिले.

मालतीबाई बेडेकर, इरावती कर्वे, दुर्गा भागवत यांचे लेखन त्यांना विशेष आवडायचे. कमलाबाई फडके, महादेवशास्त्री जोशी, बाळ गाडगीळ, अरविंद गोखले, सरिताताई पदकी या लेखक-लेखिकांचे त्या वेळी एक मंडळ होते. ही सगळी साहित्यिक मंडळी महिन्यातून एकदा जमत. एकमेकांनी लिहिलेले वाचत, ऐकत, त्यावर चर्चा करत. रेडिओवर कार्यक्रम होत. लेखन-प्रक्रियेबद्दल अनुभवकथन होत असे. विख्यात समीक्षक सरोजिनी वैद्य यांच्याशी वसुंधराताईंची चाळीस वर्षांची मैत्री होती.

‘संसारशोभा’ हा वसुंधराताईंचा पहिला कथासंग्रह १९५१ साली प्रकाशित झाला. लेखनाच्या स्वतंत्र गुणवत्तेमुळे त्यांना खूप लोकप्रियता लाभली. ‘शोध’ (१९५४), ‘चेहरा’ (१९५८), ‘पिपाणी’ (१९६१), ‘अंतरपाट’ (१९६२), ‘प्रतिबिंब’ (१९६३), ‘उपासना’ (१९६९), ‘पैठणी’ (१९७९) असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘प्रीतीची हाक’ (१९५१), ‘नेत्रा’ (१९८७) या कादंबर्‍या खूप गाजल्या. १९५४ मध्ये ‘हिरकणी’ हे नाटक, १९५९ मध्ये ‘मी भटकते आहे’ (लघुनिबंध), १९८४ मध्ये ‘ऋणानुबंध’ हे व्यक्तिचित्र ही पुस्तके प्रकाशित झाली. ‘हाऽऽय’ हे प्रवासवर्णन आहे. ‘जयंताच्या गोष्टी’ हे बालसाहित्य आहे. वसुंधराताईंनी जवळजवळ २५० कथा लिहिल्या. त्यांच्या कथांवर कथाकार पु.भा.भावे ह्यांचा काहीसा प्रभाव जाणवतो. त्यांच्या कथा हिंदी-गुजरातीत अनुवादित झाल्या. ‘मधूची आई’ या त्यांच्या कथेवरून ‘एकटी’ हा  चित्रपट निघाला अन् तो खूप गाजला. ‘नावेतील पाणी’ या कथेवरून ‘हिरकणी’ हे नाटक लिहिले. मो.ग.रांगणेकर यांनी या नाटकाचे प्रयोगही केले. त्यांचे ‘संघर्ष’ हे पुस्तक आध्यात्मिक अनुभव आणि त्या तर्‍हेच्या विचारांवर आधारित आहे. त्या पुस्तकाला प्रा.राम शेवाळकर यांची प्रस्तावना आहे.

- ललिता गुप्ते

पटवर्धन, वसुंधरा कृष्णाजी