Skip to main content
x

पुराणिक, विठाबाई श्रीधर

जोगन विठामाई

    कोपरगावाजवळ (अहमदनगर) असलेल्या ‘कोऱ्हाळे’ या गावी श्रीधरबुवा पुराणिकांच्या घरी विठाबाई यांचा जन्म झाला. पुराणिकांचे घर असल्याने नित्य भजन-पूजन-प्रवचन-कीर्तन अशा धार्मिक वातावरणातच विठाबाईचे लहानपण गेले. या वातावरणामुळे बालपणापासूनच त्यांची वृत्ती धार्मिक बनली. कृष्णाची बालमूर्ती घेऊन त्या खेळ खेळत बसत.

त्या काळच्या रीतीनुसार विठाबाई यांचे वयाच्या पाचव्या वर्षीच लग्न करण्यात आले. तिचा नवरा मात्र ४० वर्षांचा होता. यथावकाश त्यांना एक पुत्रही झाला. नवऱ्याच्या भिक्षुकीवर प्रपंच चालविणे अवघड झाल्याने विठाबाईंनी महिलांना लागणाऱ्या सुया, दोरे, कवड्या, माळा तसेच मीठ, मिरच्या अशा वस्तूंचा घरगुती स्वरूपाचा व्यवसाय सुरू केला व नीटनेटका प्रपंच केला.

जवळच असलेल्या ‘वावी’ गावी दर मंगळवारी आठवड्याचा गावबाजार भरत असे. विठाबाई सर्व वस्तू विकण्यासाठी या बाजारात जात. वेळ-प्रसंगानुसार स्वतः माल गाडीत भरत व स्वतः बैलगाडी चालवून ने-आण करीत. गरजेनुसार त्या घोड्यावरूनही प्रवास करीत असत. सर्व काम करताना त्यांचे भजन-नामस्मरण अखंड चालू असे. सायंकाळ होताच त्या जेथे असतील, तेथे आरती करीत. रस्त्यावर, ओढ्याकाठी, झाडाखाली बसून अशा भजन-आरती करताना पाहून विठाबाईंबद्दल लोकांच्या मनात आदराची भावना होती. पुढे त्यांच्या पतीचे निधन होऊन त्यांना वैधव्य आले, तरी न डगमगता मोठ्या धैर्याने ईश्वर नामस्मरण -व्यापार-व्यवहार करीत त्यांनी आपले जीवन पूर्ववत चालू ठेवले.

एकदा मंगळवारचा बाजार करून घरी परतताना विठाबाई यांचा घोडा ओढ्याजवळील स्मशानभूमीपाशी अडला. त्यांनी मोठ्या हिमतीने ‘‘कोण आहे? माझा घोडा का अडवला आहे?’’ असा प्रश्न विचारला आणि त्यांची भेट नाथपंथी गोरक्षनाथ यांच्याशी झाली. गोरक्षनाथ विठाबाईंच्या डोळ्यांना दिसले नाहीत; पण आवाज व हस्तस्पर्श यांमुळे त्यांची ओळख पटली. गोरक्षनाथांची पूर्णकृपा विठाबाईंना प्राप्त झाली. पुढे गुरू गोरक्षनाथ यांनी विठाबाईंची कसून परीक्षा घेतली. त्या सर्व बिकट परीक्षांमध्ये विठाबाई यशस्वी झाल्यानंतर विठाबाईंना नाथपंथीय जोगन दीक्षा देऊन गोरक्षनाथ अनुग्रह करते झाले आणि तेव्हापासून विठाबाईंचे नाव ‘जोगन विठाबाई’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाले.

पांढरे वस्त्र, रुद्राक्ष धारण करून त्यांनी कठोर साधना केली. या सर्व परीक्षा काळात विठाबाईंना त्यांची जिवाभावाची शेजारीण बयाबाई यांनी फार मोठी साथ दिली. बयाबाईने मरताना विठाबाईच्या सेवेची जबाबदारी आपल्या जावेकडे सोपवली.

नाथपंथीय साधना, तपाचरण आणि गोरक्षनाथांची कृपा यांमुळे विठाबाई यांना अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. पण यांपैकी कोणत्याही सिद्धीचा उपयोग त्यांनी कधीच केला नाही. यामुळे सकाम भक्ती करणाऱ्या अनेक भाविकांच्या टीकेला, रोषाला व तिरस्काराला विठाबाईंना सामोरे जावे लागले.

वृद्धापकाळी आजार झाला असतानाही त्यांची साधना व नामस्मरण कधीच सुटले नाही. आता यापुढे कोठे प्रवासाला जायचे नाही असे ठरवून त्या गाणगापूर यात्रेस जाऊन आल्या, तसेच बहिणीकडे, ‘मुखेड’ येथे जाऊन आल्या. हीच त्यांची अखेरची गाणगापूर यात्रा ठरली. पौष शुद्ध एकादशीला भजन-पूजन-कीर्तन करून मध्यरात्री नामजप करीत त्यांनी देहत्याग केला.

विद्याधर ताठे

पुराणिक, विठाबाई श्रीधर