पुरंदरे, माधुरी बळवंत
माधुरी बळवंत पुरंदरे यांचा जन्म व शिक्षण पुणे येथे झाले. शिवचरित्राचे प्रसिद्ध लेखक व इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या त्या कन्या असल्या, तरी चित्रकलेची विशेष आवड असल्याने मुंबई व पॅरिस येथे त्यांनी त्या कलेचे शिक्षण घेतले. त्या फ्रेंच भाषेचे अध्यापन करतात. संगीत व अभिनय यांतही त्यांनी नाव कमावले आहे. वाचनातून ज्ञान व माहिती मिळते, पण कधी न संपणारा आनंदही मिळतो, असे त्यांचे मत असून त्या आनंदात इतरांना सहभागी करण्याची त्या धडपड करतात. त्यांची मैत्रीण नंदिता वागळे यांच्या सहकार्याने त्यांनी बालजगतासाठी ‘वाचू आनंदे’चे चार भागांत संपादन केले. शिवाय ग्रामीण भागातील शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी ‘वनस्थळी’ या नियतकालिकाचे संपादन त्यांनी अनेक वर्षे केले. राधाचं घर, यशचे भावविश्व उलगडून दाखविणा-या कंटाळा, हात मोडला सारख्या कथा या त्यांच्या पुस्तकांवर बालवाचकही खुश आहेत. परकीय कलाकृती मराठीत आणून मराठीला समृद्ध करण्याबरोबरच त्यांनी दया पवार यांच्या ‘बलुतं’चे फ्रेंचमध्ये भाषांतर केले.
थिएटर अॅकेडेमी या पुणेस्थित नाट्यसंस्थेशी माधुरीताई १९७५पासून संबद्ध आहेत. १९९४ ते १९९८ या काळात त्या संस्थेच्या उपाध्यक्षा होत्या. ‘पिकासो’ चरित्र (१९८६), आयर्विंग स्टोनच्या लस्ट फॉर लाइफ वर आधारित ‘व्हिन्सेंट व्हॉन गॉग’ ही कादंबरी, सॅम्युअल बेकेट यांचे नाटक ‘वेटिंग फॉर गोदो’ (१९९५), मोलिएरच्या डॉन जुआन या नाटकाचे रूपांतर, ज्याँ जिओनोच्या लघुकादंबरीचे ‘झाडे लावणारा माणूस’ (२००१) हे भाषांतर इत्यादी माधुरीताईंची साहित्यसेवा आहे. अंतर्मुख व गंभीर वृत्ती, अनेक कलामाध्यमांची समज व त्यावर पकड, सातत्याने जोपासलेली प्रयोगशीलता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आहेत.
बालसाहित्य लेखनासाठी २०१४ साली त्यांना ‘मराठी साहित्य अकादमी’चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. २०१६ साली ‘बिग लिटल बुक’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.