पवार, भास्कर बळीराम
भास्कर बळीराम पवार यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील दरेगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण दरेगाव येथेच झाले, तर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना २ कि.मी. अंतरावर असणार्या पिंंपळकोठे या गावी जावे लागे. त्यापुढचे म्हणजे ८वी ते १०वीपर्यंतचे शिक्षण सटाणा येथील मराठा हायस्कूलमध्ये झाले. एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी धुळे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९६४मध्ये पवार यांनी येथूनच बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त करून परभणी येथे अप्पर विस्तार अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. १९७१मध्ये त्यांनी पुणे कृषी महाविद्यालयामधून एम.एस्सी. पदवी वनस्पतिशास्त्र या विषयात प्रथम क्रमांकाने मिळवली. त्यांनी जेनेटिक्स अॅन्ड प्लॅन्ट ब्रीडिंग या विषयात पीएच.डी. पदवी १९९१मध्ये संपादन केली. त्यानंतर पवार यांनी कृषि-अधिकारी (भाजीपाला संशोधन केंद्र, पुणे), कांदा संशोधन अधिकारी (पिंपळगाव बसवंत), प्राध्यापक वनस्पतिशास्त्र (पदव्युत्तर महाविद्यालय, राहुरी), कुलसचिव (म.फु.कृ.वि., राहुरी), गहू-विशेषज्ञ (कृषी संशोधन केंद्र, निफाड)या पदांवर कार्य केले.
पवार यांनी कांद्याची बसवंत ७८०, तसेच लसणाच्या श्वेता व गोदावरी या जातींच्या संशोधनात प्रमुख योगदान दिले. तसेच गहू-विशेषज्ञ म्हणून कार्यरत असताना त्यांनी एन.आय.ए.डब्लू.३४ आणि एन.आय.९९४७ या जातीच्या प्रसारास मान्यता मिळवून दिली. त्यांनी एम.एस्सी. व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
- संपादित