पवार, गोपाळ मारुती
गोपाळ मारुती पवार मूळचे सोलापूर जिल्ह्यातील झाला. त्यांचा जन्म याच जिल्ह्यातील पानगाव येथे झाला. वडील नरखेड येथे राहत. पवारांचे माध्यमिक शिक्षण सोलापुरातच तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झाले. तेथून १९५५ साली बी.ए.ची पदवी प्राप्त करून १९५८ साली ते पुणे विद्यापीठातून एम.ए. झाले. पुण्यात शिक्षण चालू असतानाच त्यांनी काही काळ पुणे महानगरपालिकेत नोकरी केली. पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर आवडीच्या अध्यापन विषयाकडे वळले. १९५९ साली अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर काही काळ औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात अध्यापन केले. पुढे मराठवाडा विद्यापीठात आणि शिवाजी विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. १९९२ साली सेवानिवृत्त झाले. दरम्यान १९७६ साली ‘विनोदाचा औपपत्तिक विचार’ या विषयावर विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी प्राप्त झाली. सध्या वास्तव्य सोलापूर येथे आहे.
समीक्षक म्हणून पवार यांची प्रसिद्धी असली, तरी प्रारंभीच्या काळात त्यांनी कथा, कविता लिहिल्या. शालेय जीवनापासूनच त्यांना साहित्य वाचनाची आणि लेखनाची आवड होती. त्यांच्या कथा-कविता ‘प्रसाद’, ‘हंस-चेतना’ इत्यादी मासिकांमध्ये प्रसिद्ध होत असत. ‘रविवार सकाळ’मध्येही ते लिहीत असत. स.प.महाविद्यालयात प्रा.रा.श्री.जोग यांच्यामुळे साहित्याची व खास करून समीक्षेची गोडी लागली. ‘कुसुमाग्रजांच्या रूपकात्मक कविता’ या अभ्यासपूर्ण आणि व्यासंगपूर्ण लेखनाने १९६३ साली पवार यांची समीक्षक म्हणून ओळख मराठी साहित्यसृष्टीला झाली व ती आजही कायम आहे. पुढे पु.ल.देशपांडे, आनंद यादव यांच्या लेखनाची त्यांनी केलेली समीक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ‘विवेकनिष्ठ जीवनदृष्टी’ हे पवारांचे पहिले पुस्तक १९६८ साली प्रसिद्ध झाले. त्यामध्ये जीवनविषयक जाणिवांचा वेध पवारांनी साक्षेपाने घेतला आहे. बहुतेक नामवंत समकालीन मराठी साहित्यिकांच्या साहित्याची समीक्षा त्यांनी केली आहे. व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ यांच्या निवडक कथांचे संपादन करून त्या संग्रहांना त्यांनी विस्तृत आणि साधार, साक्षेपी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत. ‘मराठी साहित्य: प्रेरणा व स्वरूप’ हा समीक्षा ग्रंथ त्यांनी समीक्षक प्रा.म.द.हातकणंगलेकर यांच्या सहकार्याने संपादित केला असून तो १९८६ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. १९५० ते १९७५ या पाव शतकाच्या काळात मराठी वाङ्मयाच्या विविध दालनांत (कथा, कादंबरी, नाटक, काव्य, दलित वाङ्मय, समीक्षा, आत्मचरित्र इत्यादी) निर्माण झालेल्या साहित्यामागच्या प्रेरणा कोणत्या आहेत आणि त्यांचे स्वरूप काय आहे, याचे अभ्यासपूर्ण विवेचन या ग्रंथात विविध मान्यवरांनी केले असून त्यात ‘विनोदी वाङ्मय’ या विषयावर पवारांनी लिहिले आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा पवारांच्या अभ्यासाचा खास विषय होय. महर्षींचे चरित्र ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ या नावाने त्यांनी लिहिले असून त्याला २००८ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. ‘निवडक वि.दा.शिंदे’ (१९९९), ‘शिंदे शेष निहूणे’ (१९७९), ‘म.वि.दा.शिंदे जीवन व कार्य’ (२००४) ही त्यांची महर्षी शिंदे विषयक अन्य संपादित व स्वतंत्र पुस्तके आहेत. त्यांच्या अन्य पुस्तकांत ‘साहित्यमूल्य आणि अभिरुची’ (१९९४), ‘विनोद: तत्त्व व स्वरूप’ (२००४) यांचा समावेश असून विनोदावरील त्यांच्या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा २००८चा रा.श्री.जोग पुरस्कार मिळाला आहे. विनोदाची सर्वांगीण, तात्त्विक आणि साक्षेपी समीक्षा करणारा अलीकडच्या काळातील हा एक मान्यवर ग्रंथ असून विनोदी वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी आणि विनोदी लेखनासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल, अशा आशयाचा अभिप्राय अनेकांनी नोंदविला आहे. पवारांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिका आणि अन्य साहित्य समीक्षा संबंधित नियतकालिकांमधून तसेच मराठी वृत्तपत्रांमधून विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखन केले आहे. पवार हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं .
- मधू नेने