Skip to main content
x

पवार, नामदेव भिका

        नामदेव भिका पवार यांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील चौगाव येथे झाला. त्यांचे आईवडील पिंपळगाव येथे शेतीचा व्यवसाय करत होते. त्यामुळे नामदेव यांचे बालपण व सातवीपर्यंतचे शिक्षण याच गावी झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मालेगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला व १९६५मध्ये शालान्त परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. घरी भरपूर जमीन असल्यामुळे त्यांनी धुळे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवून १९६९मध्ये पदवी प्राप्त केली. नंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून १९७१मध्ये वनस्पति-रोगशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते घरची शेती पाहू लागले. याच दरम्यान मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना होऊन याअंतर्गत कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथे पवार यांची साहाय्यक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ या पदावर कडधान्य पिकावर संशोधन करण्यासाठी (१९७३) नेमणूक झाली. येथे त्यांनी संशोधनासाठी आवश्यक असणारी छोटी प्रयोगशाळा स्थापन केली. तसेच कडधान्य पिकासाठी शेतकऱ्यांना रायझोबीयम जिवाणू खताची पाकिटे तयार करून औरंगाबाद जिल्हा परिषदेतर्फे नाममात्र किमतीत उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रातील सर्व विभागातून कडधान्यांच्या पिकावरील रायझोबीयम जिवाणू गोळा करून प्रयोगशाळेत चाचण्या घेऊन अधिक नत्र स्थिरीकरण करणाऱ्या प्रजातींची निवड करून त्यांची वाढ केली. अखिल भारतीय पातळीवर चाचण्यांसाठी प्रजाती उपलब्ध करून दिल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनाबाबत सहा लेख प्रसिद्ध केले.

        पवार यांनी १९८०पासून औरंगाबाद येथील बाजरी संशोधन केंद्रावर ११ वर्षे काम केले. बाजरी पिकावरील करपा व अरगट रोगप्रतिकारक वाण विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. १९९१-९४ या काळात बदनापूर येथे वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून काम करताना त्यांनी बी.एस.एम.आर. ७३६ या तुरीच्या रोगप्रतिबंधक वाणाची निर्मिती व प्रसार करण्यासाठी सहभाग घेतला.

        १९९६पासून पवार हे पुणे कृषीमहाविद्यालयात वनस्पति-रोगशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कापूस, बाजरी, अळंबी या संशोधन प्रकल्पांचे तांत्रिक व प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी एकूण ३१ संशोधनपर लेख लिहिले असून ते नामांकित नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत. २००५मध्ये पवार सेवानिवृत्त झाले. 

- संपादित

पवार, नामदेव भिका