पवार, उदेसिंग अण्णा
वरखेडे या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गावात एका सुखवस्तू व प्रगतशील शेतकरी कुटुंबात उदेसिंग अण्णा पवार यांचा जन्म झाला. पुणे येथील शेतकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन ते शेतकी पदवीधर झाले. त्यावेळी त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळत असताना देखील त्यांनी समाजसेवेत उडी घेतली. आपल्या गावात बंधाऱ्याचे काम हाती घेऊन गावाची जलसिंचन व्यवस्था त्यांनी केली. अण्णांना शेती, शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण व आपत्ती व्यवस्थापन हे सर्व विषय अत्यंत आवडीचे होते. या सर्वात जास्त आवडीचा विषय म्हणजे शिक्षण. त्यांनी वरखेड्यात माध्यमिक शाळा सुरू केली.
चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी सहकारी संघ, बेलगंगा सहकारी साखर कारखाना, शेतीमाल बाजार समिती या संस्थांमध्ये सतत कार्यरत राहण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सहकार संघाचे सहा वर्षे संचालक म्हणून संधी मिळाली. कॉटन मार्केटिंग सहकारी फेडरेशन जळगावला संचालक होते. नगरदेबळ्याच्या सूत गिरणीचे चेअरमन म्हणून काम केले. स्टार्च फॅक्टरीचे संचालक झाले. त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. त्यामुळेच अनेक शासकीय समित्यांवर त्यांना सभासदत्व प्राप्त झाले.
शेतकीचे पदवीधर (बी.एस.सी.) असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. भारत कृषक समाज दिल्लीचे कायदे मंडळाचे सभासद म्हणून त्यांनी कार्य केले. उदेसिंग यांच्या शिक्षणप्रेमाची विशेष बाब म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील तिन्ही अग्रगण्य शिक्षणसंस्थांशी त्यांचा संबंध आहे. उंबरखेड्याची सर्वोदय संस्था, चाळीसगावची राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ आणि चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी या संस्थेत ते सदस्य आहेत. अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळेच सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना ते जवळचे वाटतात.
महाविद्यालयातील वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषाविविध चर्चासत्र यांत पवार आवर्जून उपस्थित राहतात. विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करतात. शिक्षण विचारांपैकी उदेसिंहांचा एक विचार आदर्श म्हणून घेतला जावा असे वाटते. ज्या शिक्षण संस्थेत एखादी व्यक्ती, शिक्षक म्हणून काम करते त्या व्यक्तीने त्याच शिक्षणसंस्थेत आपली मुले शिक्षणासाठी ठेवावीत. हे सांगणारे शिक्षण संस्थेचे पहिलेच अध्यक्ष असावेत. शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या मुलांचा गौरव आदर्श शिक्षकांचा गौरव, खेळाडूंना प्राधान्य महाविद्यालयातील स्पर्धा जिंकणाऱ्यांचे कौतुक, शिक्षकांचे प्रशिक्षण, प्राचार्य, मुख्याध्यापकांना मार्गदर्शन या शैक्षणिक बाबींना त्यांनी महत्त्व दिले.