फडके, अभय दत्तात्रय
पुण्यात जन्मलेल्या अभय दत्तात्रय फडके यांचे शिक्षण पुण्यातच झाले. त्यांचे वडील दत्तात्रय फडके दै. लोकशक्तीचे संपादक व स्वातंत्र्यसैनिक होते. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून त्यांनी १९६१ साली बी.एस्सी. (कृषी) व १९६३मध्ये कृषि-रसायनशास्त्र विषयात एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम वर्गात प्राप्त केली. कृषि-रसायने व विशेषत: शेतीमध्ये लागणाऱ्या रसायनांच्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. त्यांना कृषि-रसायनांचा विकास व विपणन क्षेत्राचा ४५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ऱ्होन पौलंक (इंडिया) या कंपनीचे ते प्रवर्तक व निर्देशक होते. तसेच आय.सी.आय.,टाटा फायनान्स व एस्सोसारख्या मातब्बर कंपन्यांत वरिष्ठ व्यवस्थापकीय पदावर ते २३ वर्षे होते. या चौफेर अनुभवानंतर १९९०मध्ये त्यांनी अजय बायोटेक इंडिया लि. या कंपनीची पुणे येथे स्थापना केली व प्रदूषणमुक्त व पर्यावरणस्नेही कृषी उत्पादनांचे उत्पादन पुण्याजवळ खळद येथे सुरू केले. बायोफॉस नावाचे सेंद्रिय उत्पादन जमिनीतील अविद्राव्य स्फुरद विद्राव्य करून पिकांना उपलब्ध करते. बायोनीम नावाचे उत्पादन नीम बियापासून तयार केलेले व सेंद्रिय कीड/रोगप्रतिबंधक आहे. या दोन्ही उत्पादनांचे विपणन झुआरी उद्योग लि., गोवा ही कंपनी करते. जैविक खते निर्माण करणारी भारतातील प्रमुख मोठी उत्पादक अशी अजय बायोटेकची ख्याती आहे. भारताचे राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते १९९५चे राष्ट्रीय उत्पादकता पारितोषिक कंपनीला मिळाले. तत्पूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल अलेक्झांडर यांच्या हस्ते स्फुरद विद्राव्यता संशोधनाचे उत्पादन व व्यापारीकरण केल्याबद्दल कंपनीचे प्रवर्तक अभय फडके व डॉ. बिनाता फडके यांना सिकॉम लि.चा शरद केळकर स्मृती पुरस्कार देण्यात आला. जिवाणूंपासून निर्माण केलेली कीटकनाशके व रोगनाशके कंपनी तयार करत असून जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेली खते व औषधे उत्पादने सेंद्रिय शेतीसाठी देशात व परदेशात शेतकऱ्यांना हवी आहेत व त्यांना मागणी आहे.
अभय फडके यांचे मोठे योगदान कडुलिंबाच्या एकस्वाबद्दल भारताने दिलेल्या निकराच्या आंतरराष्ट्रीय संघर्षात आहे. कडुलिंबाच्या तेलामुळे पिकावरील रोगांचे नियंत्रण होते हे अनुभवाला आल्यावर अमेरिकेच्या शेती खात्याने त्यावर संशोधन सुरू केले व २६ डिसेंबर१९८९ रोजी एकस्वासाठी प्राथमिक अर्ज केला. संशोधनानंतर हेक्झेनने काढलेल्या अर्कातील विशिष्ट घटकासाठी अमेरिकन सरकार व डब्लू.आर. ग्रेस कंपनीने युरोपीयन एकस्व कार्यालयाकडे एकस्वासाठी अर्ज केला. त्यांनी चौकशी करून या कंपनीनेच हा शोध लावला आहे हे मान्य करून, त्या कंपनीला १४ डिसेंबर १९९४ रोजी स्वामित्व हक्क बहाल केले. भारतातील डॉ. वंदना शिवा यांच्या जागरूक स्वयंसेवी संस्थेने व बेल्जियम व उतर देशांतील मंत्री व संस्थांनी या एकस्वाला कायदेशीर आव्हान दिले. फडके यांनी १९९६मध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून ऱ्होन पोलंक कंपनीत असताना नीम आधारित कीटकनाशक उत्पादने तयार करावीत असा प्रस्ताव मूळ फ्रेंच कंपनीला दिला होता, असे युरोपीयन एकस्व कार्यालयाकडे नोंदवले. मे १९९८मध्ये फडके यांनी अमेरिकन कंपनीचा शोध मुळात त्यांनी लावलेला नाही हे सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडे सादर केले. १९८५ व १९८६मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे व सांगली जिल्ह्यातील पिकावर कडुलिंबावर आधारित कीटक व बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या होत्या व त्या वेळी सर्व माहिती शेतकऱ्यांना दिली होती. फडके यांनी स्वत: युरोपीयन एकस्व कार्यालयापुढे साक्ष दिली. हे फडके यांचे म्हणणे युरोपीयन एकस्व कार्यालयाने ग्राह्य धरले व अमेरिकेतील कंपनीचे त्यांचाच शोध असल्याचे म्हणणे जून १९९९मध्ये अमान्य केले. फडके यांची साक्ष खूप महत्त्वाची ठरली व भारताने एकस्वाची लढाई जिंकली. अमेरिकेला मिळालेले नीमचे एकस्व रद्द झाले.