Skip to main content
x

फडणीस, नागेश अनंत

        नागेश अनंत फडणीस यांचा जन्म सध्याच्या कर्नाटक प्रांतातील धारवाड येथे सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून १९४२मध्ये बी.एस्सी. (कृषी) ही पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केल्यानंतर त्यांनी डॉ.जी.एस.चीमा यांच्या मार्गदर्शनाखाली एम.एस्सी. ही पदवी १९४७मध्ये प्राप्त केली. त्यांनी पदवी परीक्षेनंतर १९४२मध्ये कृषी खात्यातील सेवेस कृषि-अधिकारी म्हणून सुरुवात करून प्रारंभी पुण्यातील कृषी महाविद्यालयातील मोदीबाग, गणेशखिंड फळ संशोधन केंद्र व इतर प्रक्षेत्रावर अधीक्षक म्हणून काम केले. त्यांनी संशोधन अधिकारी म्हणून पुणे येथील केळी संशोधन केंद्र येथे व लिंबवर्गीय संशोधन योजना नागपूर येथे काम केले. त्यांनी २१ नोव्हेंबर १९६२ ते २७ नोव्हेंबर १९७०पर्यंत राज्याचे प्रमुख उद्यानविद्यावेत्ता म्हणून काम पाहिले. त्यांनी कोकणापासून मराठवाडा व विदर्भामधील सर्वच फलोद्यान संशोधन केंद्रांचे नियंत्रण, मार्गदर्शन व संशोधन कार्याचे संकलन करून शासनास अहवाल सादर करण्याचे काम केले. नोव्हेंबर १९७०मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘उद्यानशास्त्र विभागप्रमुख’ हे पद निर्माण झाल्यानंतर या पदावर त्यांनी जुलै १९७२पर्यंत काम पाहिले. यानंतर त्यांनी कृषी खात्यातील सेवेत परत जाण्याचा पर्याय निवडल्यामुळे त्यांचा फलोद्यानाचा गाढा अनुभव लक्षात घेता शासनाने त्यांना प्रतिनियुक्तीवर रिझर्व्ह बँकेच्या अ‍ॅग्रिकल्चरल रिफायनान्स कॉर्पोरेशन (सध्या नाबार्ड बँक)मध्ये तज्ज्ञ संचालक (हॉर्टिकल्चर) म्हणून पाठवले. या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्यासंबंधी फलोद्यान विकासास पूरक ठरतील असे धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अगदी बोरासारख्या फळपिकांसाठीही सुलभरीत्या भांडवली कर्जपुरवठा उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या. यामुळे भांडवलाअभावी अडलेला शेतकरी पुन्हा फळपिकांकडे वळू लागला.

        प्रा.फडणीस यांनी विविध फळपिकांवर संशोधन केले. त्यांचा केळी, संत्री, मोसंबी, द्राक्षे, सीताफळ या फळपिकांवरील संशोधनात विशेष सहभाग होता. केळी संशोधन केंद्रावर काम करत असताना त्यांनी पिकांच्या मुळांच्या, पानांच्या व फळांच्या वाढीचा सखोल अभ्यास करून त्यानुसार अधिक उत्पादनासाठी खते देण्याच्या योग्य वेळा, खतांच्या मात्रा, लागवडीसाठी मुनव्याचे वय (२-३ महिने), वजन (५०० ते ७०० ग्रॅम) प्रमाणित केले. यापेक्षा कमी अथवा अधिक वजनाचे मुनवे वापरल्यास उत्पादनात घट येते हे दाखवून दिले व उत्पादन वाढीचा कमी खर्चिक मार्ग दाखवला. त्यांनी केळी पिकावर काम करताना बसराई जातीमध्ये अधिक उत्पादन देणारा मोठा घड जळगावमधील शेंदुर्णी भागात शोधला. सध्या तो श्रीमंती नावाने जळगाव जिल्ह्यात काही भागांत लागवडीखाली आहे. लागवडीसाठी बियाण्याची कमतरता असल्यास कंदांच्या तुकड्यांपासून लागवड करण्याचे तंत्र त्यांनी यशस्वीरीत्या विकसित केले.

        डॉ.गोपाळकृष्ण यांच्यानंतर द्राक्ष पिकाच्या प्रसारासाठी प्रा.फडणीस यांनी मोठे योगदान दिले. द्राक्ष जातींच्या छाटणीच्या पद्धती व वेळा, छाटणीनंतर डोळे फुटण्यासाठी थायोयुरियासारख्या रसायनाचा वापर व इतर भौतिक पद्धती (काडी पिरगाळणे, गुंडाळणे) विकसित करून प्रमाणित केल्या. उत्पादनवाढीसाठी व फळांच्या गुणवत्तावाढीसाठी फलधारणेनंतर घडापुढील ठरावीक पाने राखून काडी छाटणे, घड विरळणीसाठी व फळांचा आकार वाढवण्यासाठी या संजीवकांचा वापर,गर्डलिंग सारखी तंत्रे विकसित करून प्रमाणित केली. ही तंत्रे आजही थोड्याफार सुधारणांसह द्राक्ष बागेत वापरली जात आहेत. नवीन जाती निर्माण करण्यासाठी त्यांनी संकराचा कार्यक्रम राबवून त्याद्वारे बिनबियांचे ४ व वाइनसाठी योग्य १ वाण विकसित केले. त्यांच्या चाचण्या राहुरी व पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष संशोधन केंद्रावर सुरू होत्या. रशियाहून आणलेल्या १६ द्राक्ष जातींच्या अभ्यासानंतर किसमिस चोर्नी ही बिनबियाची जात आपल्या हवामानात चांगली येते हे त्यांनी दाखवून दिले.

        प्रा. फडणीस यांनी लिंबवर्गीय फळ संशोधन केंद्रावर संशोधक म्हणून काम करत असताना मोसंबीच्या फुलांवर ग्रेपफ्रुट जातीचा संकर करून न्यूसेलर या विषाणूमुक्त मोसंबीची निर्मिती केली व मोसंबीचे डोळे भरून केलेल्या कलमांच्या अभ्यासात न्यूसेलर मोसंबी उत्पादनासाठी, फळांच्या प्रतीसाठी व रोगमुक्ततेसाठी सरस आढळली. सध्या या न्यूसेलर मोसंबीचीच कलमे लागवडीसाठी वापरली जातात. प्रा.फडणीस यांनी मुदखेड येथे संत्रा पिकावर काम करताना बिनबियांच्या संत्र्यांचा शोध लावला. बिनबियांचा लिंबू हा कँकर रोगमुक्त मोठ्या आकाराची फळे देणारा वाण कागदी लिंबाऐवजी लागवडीसाठी उपलब्ध करून दिला. उत्तम शिक्षक व शिस्तप्रिय प्रशासक असा त्यांचा लौकिक होता.

- प्रा. भालचंद्र गणेश केसकर

फडणीस, नागेश अनंत