Skip to main content
x

राणे, दत्तात्रेय आप्पाजीराव

            त्तात्रेय आप्पाजीराव राणे यांचा जन्म उत्तर कानडा जिल्ह्यातील कारवार तालुक्यातील हळगे गावी झाला.  गरिबीशी झगडत त्यांनी बी.एस्सी. (कृषी)पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते १९५१मध्ये मुंबई प्रांतीय शेतकी खात्यात शेती अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांना १९६०मध्ये सरकारने एम.एस्सी.साठी नवी दिल्लीत पाठवले. तेथे त्यांनी फळबाग या विषयावर १९६२मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. नंतर राहुरी येथे म.फु.कृ.वि.ची स्थापना झाल्यावर उद्यानविद्या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झाली. अमेरिकेत पेनसिल्व्हिनिया विद्यापीठात १९६९ ते १९७३ या काळात उद्यानविद्येचा अभ्यास करून राणे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यापूर्वी त्यांनी मांजरी फार्म (पुणे), कारवार, केळी संशोधन केंद्र (पुणे), काजू संशोधन केंद्र (वेंगुर्ला) येथे शेती अधिकारी म्हणून काम केले. १९८५ ते ८७ या काळात राणे यांनी चिंच व जांभूळ यावर विशेष संशोधन केले. द्राक्षावरच्या करपा रोग निर्मूलनासाठी औषधांचा त्यांनी यशस्वी प्रयोग केला. त्यांनी दिंडोरी येथे १९८५ ते ८९ या काळात १५० एकर माळरानावर फळबाग फुलवली.

            राहुरीला १९७३मध्ये प्रभारी उद्यान विभागप्रमुखपदी असताना ५०० एकर जमिनीवर विविध फळबागांची लागवड त्यांनी आधुनिक पद्धतीने यशस्वी करून दाखवली. त्यांचे २१ संशोधन निबंध विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. त्यातील एका निबंधाला उत्कृष्ट निबंधाचे पारितोषिक मिळाले. फलोद्यान संस्थेत केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल  हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ इंडियाने फेलोशिप देऊन राणे यांचा सन्मान केला. ते शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतात.

- संपादित

राणे, दत्तात्रेय आप्पाजीराव