Skip to main content
x

रोकडे, वसंत सावळाराम

     वसंत सावळाराम रोकडे त्यांचा जन्म इस्लामपूर जि. सांगली या गावी झाला. पितृछाया लहानपणीच हरपल्याने त्यांचे ७ वी पर्यंतचे शिक्षण आजोळी विटे येथे झाले. माध्यमिक शिक्षण कर्मवीरांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव मोफत निवासी विद्यालय सातारा येथे झाले. छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा मधून त्यांनी एफ.वाय. व टी.डी. ही. पदविका संपादन केली.

     टी. डी. नंतर १९५३ मध्ये त्यांनी लोणंद येथे शिक्षक व वसतिगृह व्यवस्थापक म्हणून सेवेस प्रारंभ केला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत्वाची जाणीव करून देऊन त्यांचा विकास घडावा यासाठी त्यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना साने गुरुजींचे अनुयायी म्हणून लोक संबोधू लागले.

      १९५६ मध्ये त्यांची बदली जनता विद्यामंदिर, कान्हूर येथे मुख्याध्यापक म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली. ही शाळा ग्रामस्थांनी चालवली होती. अंतर्गत मतभेदांमुळे ती डबघाईला आली होती. शाळेत दोन वर्ग - ८ वी, ९ वी त्यात ३३ मुले होती. शासनातर्फे शाळेला नोटीस देण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी काम केले. १९५६ ते ६४ या ८ वर्षाच्या कालावधीत रोकडे यांनी ५ खोल्यांची इमारत बांधली. तसेच आदर्श ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, सुंदर परिसर या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्धता, नियोजनपूर्वक कामकाज करणे या उपक्रमांमुळे कान्हूरची शाळा ही आदर्श शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली. पहिल्या वर्षी शाळेचा निकाल ८१ टक्के लागला.

       १९६४-६६ या कालावधीत रोकडे यांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ - सुपे, जि. अहमदनगर येथे काम केले. त्यापूर्वी शिक्षक वर्गातील मतभेदांमुळे शिपाई सोडून सर्वांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. दोन वर्षात शाळेसाठी जागा खरेदी, गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, ग्रंथालय व प्रयोग शाळांचा विकास साधून सुपे येथील शाळेला विकसित शाळा हा लौकिक प्राप्त करून दिला. तसेच ‘गणेश विद्यालय’ गणेश नगर येथे शाळेला दिशा देण्याचे काम केले.

       १९६६-६८ या कालावधीत हिंदी व मराठी विषयाचे व्याख्याते म्हणून काम करताना स्वत:च्या व्यासंगामुळे त्यांनी एक चांगले प्राध्यापक म्हणून लौकिक संपादन केला.

        रोकडे यांनी १९७०-९२ या २२ वर्षांच्या कालावधीत प्राचार्यपद भूषविले. त्यांनी सहजानंद भारती शिक्षण शास्त्र महाविद्यालय श्रीरामपूर येथे ८ वर्षे प्राचार्य म्हणून काम करताना पहिल्या दिवसापासून कामकाजास प्रारंभ, नियमितपणा, स्वाध्यायपद्धती, रात्रअभ्यासिका, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, सामूहिक प्रेरणा देणे या उपक्रमांमुळे पहिल्या वर्षी महाविद्यालयाचा निकाल पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाचा लागला. गुणवत्ता यादीत ३ विद्यार्थी आले. हीच परंपरा पुढील कालावधीतही टिकून राहिली. ‘बोरावके महाविद्यालय’ श्रीरामपूर - येथे (१९८१-८६) गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम कार्यवाहीत आणल्याने १२ वीचे निकाल उत्कृष्ट लागत असत. प्रत्येक वर्षी ५ ते ७ विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस. ला प्रवेश मिळे. आयुर्वेद, होमिओपॅथी, इंजिनिअरिंग आदी अभ्यासक्रमांना साधारणपणे ३० विद्यार्थी जात असत. सातत्याने गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न चालू असल्याने ११ वी ते बी.ए. पर्यंत असणारे जे विद्यार्थी पदवी परीक्षेत बसले त्यांच्यापैकी ७० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाचा भौतिक विकासही झाल्याने परिसर सर्वार्थाने विकसित झाला.

       ‘अण्णासाहेब आवटे महाविद्यालय’- मंचर या महाविद्यालयाचा विकासही त्यांनी केला. भौतिक विकासाचा विचार करता असे दिसून येते की या कालावधीत त्यांनी सुसज्ज प्रयोगशाळा, १२ वर्ग खोल्या, ग्रंथालयाची आदर्श इमारत यांची निर्मिती केली. गुणात्मकतेवर भर देऊन विद्यार्थ्यांचा व पर्यायाने महाविद्यालयाचा दर्जा सुधारला. वनीकरण प्रकल्पातील वृक्षांचे संवर्धन करून नवीन वृक्षांची लागवड केली. रोपवाटिकेद्वारा परिसरात रोपे पुरवून वनीकरणास प्रोत्साहन दिले. या कार्यामुळे महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाचा वनीकरण पुरस्कार प्राप्त झाला.

      महाविद्यालयातील प्रौढ साक्षरता योजनेचे यश पाहून पुणे विद्यापीठाने इतर महाविद्यालयांसाठी ती योजना कार्यवाहीत आणली. मुख्याध्यापक, प्राचार्य, आजीव सदस्य, सहसचिव, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, विविध समित्यांचे सदस्यत्व या सर्व भूमिका त्यांनी यशस्वीपणे साकारल्या आहेत.  त्यांच्या कार्याचे विश्‍लेषण केल्यानंतर असे दिसून येते की,

      १. ते आदर्श व प्रयोगशील शिक्षक आहेत. गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी केलेल्या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांची व शिक्षणाची गुणवत्ता वाढीस लागली.

      २. उन्हाळी व हिवाळी वर्गांना ‘सात्रळ प्रकल्पा’तील यशामुळे सर्वत्र प्रारंभ झाला त्यामुळे विद्यार्थ्यांचे यश वृद्धिंगत होत गेले.

      ३. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी ‘कर्मवीर विद्याप्रबोधिनी’ स्थापन करून कार्यास प्रारंभ केला.

      ४. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कार्यवाहीत आणलेल्या योजनांमुळे विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारण्यास उत्तेजन मिळाले.

      विद्यापीठ स्तरावर विविध समित्यांवर काम करून तसेच शैक्षणिक मानसशास्त्र व शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन या नात्याने त्यांनी भरीव कामगिरी पार पाडली आहे. प्राचार्य रोकडे यांनी ग्रामीण भागात हायस्कूल, महाविद्यालये, वसतिगृहे यांची उभारणी करून आपले कार्य सचोटीने व निष्ठेने केले आहे. संस्थेने व जनतेने सोपवलेली जबाबदारी निःस्पृहपणे व विश्‍वस्त या नात्याने पार पाडली. हे कार्य करताना विद्यार्थी हित जपणारे शिक्षक म्हणून लौकिक संपादन केला.

      प्राचार्य रोकडे यांनी शिक्षण विकासासाठी केलेले कार्य भावी पिढीला दिशादर्शक ठरणारे आहे.

     - डॉ. एस. बी. गागरे

रोकडे, वसंत सावळाराम