Skip to main content
x

साधले, आत्माराम नीळकंठ

साधले आनंद

     रामायणाचे, महाभारताचे आणि एकूणच प्राचीन व पौराणिक संस्कृत साहित्याचे चिकित्सक अभ्यासक, संशोधक असलेल्या साधल्यांनी मूळ नाव बाजूला सारून ‘आनंद साधले’ याच नावाने बहुतेक साहित्य लिहिले. ते प्राधान्याने ‘समीक्षा’ या प्रकारात मोडणारे आहे. मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व आणि प्रावीण्य होते. परिचयात्मक लिखाण असले, तरी त्यांच्या अभ्यास-संशोधनाची वेगळी छाप उमटते.

     सावंतवाडी जिल्ह्यातील साळगाव येथे जन्मलेल्या साधले यांनी सावंतवाडी व मुंबई येथे अनुक्रमे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतले. ते मराठी आणि संस्कृत या दोन्ही विषयांतील मुंबई विद्यापीठाचे, बी.ए.चे पदवी प्राप्तक आहेत. टपाल आणि तार खात्यात १९४० ते १९७५ अशी पस्तीस वर्षांची प्रदीर्घ सेवा करून त्यांनी मुदतपूर्व स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. ‘लढाई संपल्यावर’ ही त्यांची पहिली कादंबरी त्यांच्या वयाच्या ऐन पंचविशीत प्रसिद्ध झाली. साधले यांच्या विविध विषयांवरच्या ग्रंथसंपदेने साठाची संख्या ओलांडलेली आहे.

      संस्कृत साहित्याचा साधल्यांचा साक्षेपी अभ्यास असल्याने, त्यातील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी स्वतःच्या वेगळ्या दृष्टिकोनातून, त्या काळातील घटनांचा लाक्षणिक, तार्किक आणि व्यावहारिक अर्थ लावून ते मराठी वाचकांसमोर विचक्षक पद्धतीने मांडलेले आहेत. महाभारतावरील ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ ही प्रदीर्घ लेखमाला ‘नवशक्ती’ दैनिकातून प्रकाशित होत असतानाच ती लोकप्रिय झालीच; पण अभ्यासकांत त्यावर वेगळ्या अंगांनी चर्चा झाली. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे इतिहास, ललित यांचा सुरेख संगम आहे.

      ‘महाराष्ट्र रामायण’ ही रामायणाची कथा खंडकाव्यातून प्रदीर्घपणे कथन करणारी त्यांची ग्रंथरचनाही, त्यातील आशय आणि अभिव्यक्तीने गाजली. साधले यांनी ‘दशोपनिषद’ या मालिकेतून दहा उपनिषदांचा मर्मग्राही आणि रसग्राही परिचय करून दिला आहे. ‘आनंदध्वजाच्या कथा’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्राचीन कथांतील शृंगार धीटपणे मराठीत पुढे आणला. ‘मातीची चूल’ हे त्यांचे आत्मचरित्रही गाजले.

     त्यांची लेखनशैली सुटसुटीत तरी रंजक आणि अभ्यास-संशोधन-समीक्षात्मक असूनही प्रासादिक आणि रोचक होती. संस्कृतमधील साहित्य आधुनिक काळात मराठी वाचकांपुढे आणणार्‍या मोजक्या लेखकांत त्यांचे स्थान मोठे आहे.

- मधू नेने

साधले, आत्माराम नीळकंठ