Skip to main content
x

शाळिग्रम, पद्मावती अनंत

द्मावती अनंत गोखले (पूर्वाश्रमीच्या पद्मावती शाळिग्रम) यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे आजोबा हे उत्तम मृदंग वाजवायचे व वडील गोपाळ शाळिग्रम हेही गायक व पखवाजवादक होते. ते कोल्हापूर दरबाराच्या आधिपत्याखाली संगीत विद्यालय चालवायचे. पद्मावतीबाईंचे बंधू केशव व वामन हेही गायक व तबलावादक होते. संगीताचा वारसा पद्मावतीबाईंना घरातून मिळाला होता. काका पं.गोविंदबुवा शाळिग्रम (उ.अल्लादिया खाँसाहेबांचे ज्येष्ठ शिष्य) यांच्याकडून त्यांना जयपूर घराण्याचे शिक्षण मिळाले. त्या १९३१ सालापासून मैफलींत गाऊ लागल्या. त्यावेळी त्या १३ वर्षांच्या होत्या व अल्पावधीतच त्यांचे नाव गाजू लागले.

भरदार, ढाला, पण गोडवा, नखरा, चापल्य असणारा आवाज, गायकीत आकाराशिवाय, एकार, उकार, इकाराचा वापर, कणस्वरांचा नेमका वापर, दीर्घ दमसांस, गुंतागुंतीची व झपाटेदार तान ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये आहेत. भूपनट, बिहागडा, खट यांसारखे जयपूरचे राग तर त्या गायल्याच; पण मालकंस, भूप, पूरिया असे आम रागही त्या वेगळ्या ढंगाने गात. नंद हा त्यांचा खास आवडीचा राग त्या फार बहारीने गात असत. ख्यालाच्या बरोबरीने पद्मावतीबाईंनी बनारस ढंगाची व पंजाबी हरकती, मुरक्यांनी नटलेली ठुमरीही गायली. ‘जा मैं तोसे नाही बोलूं’, ‘बिन देखे परे नाही चैन’, ‘लगत करेजवा में चोट’, ‘हट छोड़ सखी’ या ठुमर्‍या त्या खूप रंगवून गात असत. शिवाय त्या भावगीते व बालगंधर्वांची नाट्यपदेही उत्तम गायच्या.  एच.एम.व्ही.ने काढलेल्या त्यांच्या कामोद, जयजयवंती, पूर्वी, तोडी, तिलककामोद या रागांच्या ध्वनिमुद्रिका गाजल्या.

पद्मा शाळिग्रम या नावाने विवाहापूर्वी त्यांनी वासवदत्ता (१९३४), भूल का भोग (१९३५) अशा काही मराठी, हिंदी व तेलुगू पौराणिक चित्रपटांतून भूमिकाही केल्या. ‘देवयानी’ (१९४०) या चित्रपटातील त्यांची देवयानीची भूमिका गाजली.

पद्मावती गोखले यांनी घराण्याच्या परंपरेला काही बाबतीत छेद देऊन आपले गाणे समृद्ध केले. त्यामुळे त्यांना घराण्यातील बुजुर्गांचा रोष पत्करावा लागला. त्या काळात अशा तर्‍हेची सांगीतिक बंडखोरी आणि त्यातून आलेली सर्जनशीलता स्त्री-कलाकारासाठी सहज आणि समाजमान्य नव्हती. बाईने नम्र,सोज्ज्वळ असावे या समजुतीला वैयक्तिक व सांगीतिक आव्हान देऊन ते पद्मावतीबाईंनी सहज पेलले.

त्या काळातील अनेकांनी ‘जयपूर घराण्याची’ गायिका म्हणून त्यांना मानले नाही, मात्र पद्मावतीबाईंनी आपल्या बहारदार मैफलींनी आपले उत्तम गायिका म्हणून असणारे स्थान सिद्ध केले. पांढरपेशा समाजातून आलेल्या स्त्री-कलाकाराने ठुमरीसारखे शृंगारिक प्रकार सादर करणे हे त्या काळात समाजमान्य नव्हते व जयपूर घराण्यातही मान्य नव्हते. पण पद्मावतीबाईंनी ठुमरी गायनालाही पांढरपेशा समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.

त्या काळात लाहोरसारख्या प्रांतात आपल्या मैफलींना स्त्रियांनी आलेच पाहिजे असा आग्रह धरणार्‍या पद्मावतीबाई एका प्रकारे बंडखोर गायिकाच म्हणायला पाहिजेत. दिलखुलास, स्पष्टवक्ता स्वभाव असलेल्या बुद्धिमान आणि परखड विचारांच्या गायिका म्हणून त्यांचा लौकिक होता. सांगली, मिरज, इचलकरंजी, जमखिंडी, जत, औंध, फलटण अशा महाराष्ट्रातील संस्थानांमध्ये, तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील पूर्ण भारतात लाहोर, पेशावर, जालंधरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी मैफलींतून आपली गायकी पोहोचविली. आकाशवाणीच्या त्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार असल्याने देशभरातील आकाशवाणी संगीत संमेलनांतून त्या गायल्या. या गायिकेची आणि गायकीची दखल घेऊन ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९८८), ‘कालिदास’ सन्मान (१९९४-९५), कोलकाता येथील संगीत रिसर्च अकादमीची शिष्यवृत्ती, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा विशेष सन्मान देऊन पद्मावतीबाईंना गौरवले गेले.

डॉ. शुभदा कुलकर्णी

शाळिग्रम, पद्मावती अनंत