Skip to main content
x

सातोस्कर, बाळकृष्ण दत्तात्रेय

     बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर यांचा जन्म गोव्यातील माझेरू या गावी झाला. त्यांचे शिक्षण म्हापसे आणि मुंबई येथे झाले. इंग्रजी विषय घेऊन ते बी.ए. आणि त्यानंतर ग्रंथालयशास्त्र परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे पोर्तुगीज भाषेवर चांगलेच प्रभुत्व होते. त्यानी मुंबई प्रकाशन आणि मुद्रण असा जोडधंदा मुंबई येथे सुरू केला. त्यांनी ‘कथासागर’ मासिकाचे संपादन केले.

     अनुवाद, संशोधन आणि स्वतंत्र साहित्यनिर्मिती करणारे सर्जनशील साहित्यिक म्हणून सातोस्कर प्रसिद्ध आहेत. पर्ल बकच्या ‘मदर’ कादंबरीचा ‘आई’ हा अनुवाद त्यांनी १९४४ मध्ये केला. त्यानंतर त्यांनी ‘धरित्री’ (गुड अर्थ), ‘दिग्या’ (ऑलिव्हर ट्विस्ट), ‘पंचविशीतले पाप’ (मोपाँसा) हे अनुवाद केले. निवडक पोर्तुगीज कथांचा अनुवाद त्यांनी ‘द्राक्षांच्या देशात’ या नावाने केला.

     ‘अभुक्ता’ आणि ‘प्रीतीची रीत’ या त्यांच्या कथासंग्रहांतील कथा मध्यमवर्गीय कौटुंबिक समस्या केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या आहेत. माणसामाणसांतील नातेसंबंध शोधताना त्यांची कथा गोमंतकीय संवेदनशीलता व्यक्त करते. गोमंतकातील संस्कृती, आचारविचार, व्यक्तिमूल्ये यांचा प्रभाव त्यांच्या कथेत जाणवतो.

      ‘जाई’, ‘मेनका’, आणि ‘अनुजा’ या आपल्या सामाजिक कादंबर्‍यांत गोमंतकीय समाजाच्या स्थितिगतीचा वेध त्यांनी घेतला आहे. गोव्याच्या मुक्तिसंग्रामावर आधारलेली ‘आज मुक्त चांदणे’ ही कादंबरी गोव्यातील राजकीय व सामाजिक परिवर्तन अधोरेखित करते.

     ‘अभिराम’ आणि ‘वासुदेव’ या त्यांच्या कादंबर्‍यांमधील विषय पौराणिक असून वेगवेगळ्या युगांतील दोन अवतारी पुरुष कादंबर्‍यांचे नायक आहेत. अमानवी, अलौकिक नायकांचे मानवी रूप दाखविण्याचे कार्य त्यांनी यशस्वीपणे केले आहे.

      ग्रंथालयाशी संबंधित ‘ग्रंथ व ग्रंथालयीन चळवळ’ आणि ‘द्विबिंदू वर्गीकरण पद्धती’ ही सातोस्करांची पुस्तके ग्रंथालयातील कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरणारी आहेत. विविध साहित्यप्रकार सहजपणे हाताळणार्‍या सातोस्करांनी वयाची साठी गाठलेली असताना, ‘गोमंतक : प्रकृती आणि संस्कृती’ हा तीन खंडांचा विस्तृत साहित्य प्रकल्प  हाती घेतला आणि सतत परिश्रम करून दहा वर्षांत तो पूर्णत्वास नेला. तिसरा खंड १९८७ मध्ये प्रकाशित झाला. अडीच हजार वर्षांतील गोमंतकाचे चित्र त्यांनी वाचकांपुढे उभे केले आहे. हे तीन खंड गोव्याच्या इतिहासलेखनातील फार मोठे योगदान आहे, असे म्हटले पाहिजे. १९९३ साली त्यांचे ‘बादसायन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.

      गोवामुक्तीनंतर ते मुंबईहून गोव्यात आले. ‘गोमंतक’ दैनिकाचे संपादक म्हणून ते पाच वर्षे कार्यरत होते. सातोस्करांना सार्वजनिक कार्याची विलक्षण आवड होती. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते. १९८२ साली मंगेशी येथे झालेल्या गोमंतक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

- डॉ. सुभाष भेण्डे

सातोस्कर, बाळकृष्ण दत्तात्रेय