Skip to main content
x

शेख, यासीन फत्तेलाल

फत्तेलाल, एस. ,साहेबमामा

कलादिग्दर्शक

 

     केवळ मराठीच नव्हे, तर जागतिक चित्रपटक्षेत्रात ‘प्रभात फिल्म कंपनी’चे महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि प्रभातच्या या कर्तृत्वाशी कायमचे निगडित झालेले नाव म्हणजे एस. फत्तेलाल!  फत्तेलाल यांच्याजवळ कुठलीही पदवी, पुस्तकी ज्ञान नव्हते; पण उपजत निरीक्षणशक्ती, परिश्रमांची तयारी, सौंदर्यवेधी नजर, जीवनावरची श्रद्धा आणि अखंड प्रयोगशीलता यातून त्यांनी ‘प्रभात चित्रां’चे कलादिग्दर्शन वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

      एस. फत्तेलाल यांचे पूर्ण नाव होते शेख यासीन फत्तेलाल ऊर्फ साहेबमामा. त्यांचा जन्म कोल्हापूरनजीकच्या कागल येथे झाला. कोल्हापूरच्या कलासंपन्न वातावरणाचा वारसा घेऊनच ते पुण्यात आले आणि नंतर प्रेक्षकांनी ‘प्रभात चित्रां’च्या रूपाने त्यांच्यातील कलागुणांचे प्रकटीकरण अनुभवले. आपले कलागुण टिपणारे माध्यम हे कॅमेर्‍याचे आहे, याचा साहेबमामांना कधीच विसर पडला नाही. चित्रपट ही सामूहिक कला आहे, हे ते जाणून होते.

     त्यामुळेच व्ही.शांताराम, विष्णुपंत दामले आणि साहेबमामा यांनी उत्तमोत्तम चित्रपटांची वेगळी परंपरा निर्माण केली. प्रभातच्या सर्वच चित्रपटांत साहेबमामांच्या कलाचातुर्याचे दर्शन घडते. शांतारामबापू कथा सांगू लागले की साहेबमामांच्या कल्पकतेला खाद्य मिळे. कथेला चित्रपटाचे रूप देताना काळ, रस, वातावरण, सजावट, वेषभूषा यांची नेमकी उभारणी हा साहेबमामांचा प्रांत होता.

     ‘अमृतमंथन’, ‘अमरज्योती’, ‘वहाँ’ या ‘प्रभात’च्या सुरुवातीच्या चित्रपटांचे अद्भुतरम्य वातावरण त्यांनी कलात्मकतेने निर्माण केलेले दिसते. ‘चंद्रसेना’मध्येही त्यांच्या कल्पनाविलासाचा प्रत्यय येतो. ‘धर्मात्मा’ (१९३५), ‘कुंकू’ (१९३७), ‘माणूस’ (१९३९), ‘शेजारी’ (१९४१), ‘गोपाळकृष्ण’ (१९३८), ‘संत ज्ञानेश्‍वर’ (१९४०) व ‘रामशास्त्री’ (१९४४) या सर्व गाजलेल्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन साहेबमामांच्या कल्पकतेची, कल्पनारम्यतेची, प्रतिभेची, सौंदर्यदृष्टीची आणि संवेदनशीलतेची प्रचिती देणारे आहे.

     शांतारामबाबूंनी प्रभात सोडल्यानंतर साहेबमामांनी दामले यांच्यासह दिग्दर्शनातही योगदान दिले. ‘संत तुकाराम’, ‘संत ज्ञानेश्‍वर’, ‘गोपालकृष्ण’ ही त्याची काही उदाहरणे आहेत. साहेबमामांनी मूकपटांसाठीही काम केले होते. त्यात १९२८ मधील ‘महारथी कर्ण’, त्याचप्रमाणे पहिला भारतीय रंगीत चित्रपट ‘सैरंध्री’ (१९३३) यांचा समावेश आहे.

     कॅमेरामन म्हणूनही साहेबमामांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. ‘सैरंध्री’, ‘सिंहगड’ (१९३३), ‘अयोध्येचा राजा’ (१९३२), ‘अग्निकंकण’ (१९३२), ‘मायामच्छींंद्र’ (१९३२), ‘अमृतमंथन’ (१९३४), ‘चंद्रसेना’ (१९३५) या चित्रपटांसाठी साहेबमामांनी कॅमेरा चालवला आहे.

    प्रभातच्या अखेरच्या टप्प्यात आणि अस्तानंतरही साहेबमामांनी चित्रपटनिर्मिती चालूच ठेवली. ‘चाँद’ (१९४५), ‘हम एक है’ (१९४६), ‘गोकुळ’ (१९४७), ‘लाखाराणी’ (१९४५), ‘आगे बढो’, ‘सीधा रास्ता’ (१९४८), ‘अपराधी’ (१९४९), ‘संत जनाबाई’ आणि ‘युगे युगे मी वाट पाहिली’ अशा चित्रपटांची निर्मिती साहेबमामांनी केली.

    सजावट, वातावरणनिर्मिती आणि वेषभूषा या घटकांबाबत साहेबमामांनी विशिष्ट दृष्टी होती. त्यांची कलादृष्टी ‘पारखी’ होती. पात्रयोजनेच्या वेळी ती प्रत्ययास येत असे. कलादिग्दर्शक म्हणून त्यांनी निवडलेले सहकारीही हुन्नरी होते. श्रीपतराव मिस्त्री, थत्ते, परदेशी, सडोलीकर, चित्रकार दीक्षित असे साहेबमामांचे सहकारी होते. ते आपल्या कुटुंबीयांप्रमाणे या सहकार्‍यांची काळजी घेत असत. यातूनच ‘अमरज्योती’मधील प्राचीन भारताचे वैभव, ‘कुंकू’मधले सोज्ज्वळ, मध्यमवर्गीय वातावरण, ‘माणूस’मधील वेश्यावस्ती, संतपटातील तत्कालीन तपशील, पेशवाईचे वैभव, गजबजलेले संपन्न गोकुळ, ‘शेजारी’मधील धरणफुटीचे दृष्ट... हे सारे यथातथ्य साकारू शकले.

     साहेबमामा उत्तम चित्रकारही होते. त्यांनी रेखाटलेल्या निसर्गचित्रांची प्रदर्शनेही झाली होती. मात्र व्यवहारकुशलतेअभावी साहेबमामांच्या या कलादृष्टीला उत्तरायुष्यात ग्रहण लागले.

- द.भा. सामंत

शेख, यासीन फत्तेलाल