शिलेदार, जयमाला जयराम
जयमाला जयराम शिलेदार यांचा जन्म इंदूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव काशीबाई होते. त्यांचे वडील नारायण सावळाराम जाधव हे गंधर्व संगीत मंडळी, तसेच शिवराज कंपनी, ललितकलादर्श अशा कंपन्यांमधून अनेक छोट्या-मोठ्या भूमिका करत. ते स्त्री-भूमिकाही करत. त्यामुळे साहजिकच नाटक आणि संगीत, त्यांच्या तालमी, संस्कार या वातावरणातच जयमाला यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. त्यांचे माहेरचे नाव प्रमिला जाधव होते.
जयमाला शिलेदारांना त्यांचे कुटुंबीय व आप्तेष्ट प्रेमाने ‘नानी’ असे संबोधतात. त्यांच्या लहानपणीचा काळ या बिर्हाडी नाटकमंडळींमध्येच गेला. त्यांचे शालेय शिक्षण बेळगाव येथील ‘वनिता विद्यालया’त मराठी पाचवीपर्यंतच झाले. त्यांचे सुरुवातीचे गाण्याचे शिक्षण वडील नारायण जाधव यांच्याकडे झाले. पुढे बेळगावला असताना त्या मोगूबाई कुर्डीकरांकडेही शिकल्या. नंतर जयपूर गायकीची तालीम त्यांना मोहन पालेकरांकडून मिळाली. त्यानंतर जगन्नाथबुवा पंढरपूरकर, मनहर बर्वे, कृष्णराव चोणकर अशा दिग्गजांकडून त्यांना तालीम मिळाली. लहान वयात बालगंधर्वांच्या गाण्याचे संस्कार प्रमिलावर घडले. त्यांनी ‘संगीत विशारद’ आणि ‘संगीत अलंकार’ या पदव्याही प्राप्त केल्या.
अभिनयाचेही धडे त्यांना गोविंदराव टेंबे यांच्याकडून मिळाले. डिसेंबर १९४२ मध्ये गोविंदराव टेंबे यांच्या ‘वेषांतर’ या नाटकाद्वारे प्रमिला जाधव यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. येथूनच त्यांची संगीत रंगभूमीवरील नायिका म्हणून यशस्वी कारकीर्द चालू झाली. साहित्य संघाच्या नाट्योत्सवापासून जयराम शिलेदार व प्रमिला यांच्या रंगभूमीवरील सहजीवनाची सुरुवात झाली. जयराम शिलेदार आणि प्रमिला जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल वातावरणात १ ऑक्टोबर १९४९ रोजी ‘मराठी रंगभूमी’ ही संगीत नाट्यसंस्था स्थापन केली. त्यांनी १९५० साली विवाह केला. ‘मराठी रंगभूमी’ या नाट्यसंस्थेतून व इतर संस्थांमधूनही जयमाला शिलेदारांनी अनेक भूमिका यशस्वी केल्या. सुभद्रा, रुक्मिणी, वसंतसेना, रेवती, शारदा, देवयानी अशा नायिकांच्या भूमिकाच त्यांनी केल्या. त्यांनी एकूण सेहेचाळीस नाटकांमधून बावन्न भूमिका आणि सुमारे चार हजारांवर प्रयोगांतून आपले अलौकिक कर्तृत्व गाजविले. बालगंधर्वांपासून छोटा गंधर्व, राम मराठे, रामदास कामत अशा अनेक संगीतनटांसह त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले.
सुरेल आणि निकोप आवाज, विनयशील अभिनय, प्रेक्षकांना हवेहवेसे वाटत असतानाच पद संपविणे, भूमिकेला साजेल असा पदांचा विस्तार, त्यांतील शब्दांची मोडतोड न करता होणारे स्पष्टोच्चार या सर्व बारकाव्यांनिशी केलेले गायन व मेहनतीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. याशिवाय पदांच्या आधीचे संवाद आणि त्यांची लय ही पदांमध्येच नकळत मिसळून जात असे. सर्वसमावेशक असा स्वतःचा वेगळा विचारही त्यांच्या गाण्यात सतत दिसतो.
नाटकांतील भूमिकांबरोबर जयमाला शिलेदारांचा शास्त्रीय संगीताचा अभ्यासही मोठा होता. शास्त्रीय संगीताच्या मैफलींबरोबरच त्यांनी नाट्यसंगीताच्याही स्वतंत्र मैफली केल्या. संगीत नाटक हेच त्यांचे जीवन होते. कंपनी काढल्यामुळे कंपनीतील सर्व माणसांची जबाबदारी त्यांच्यावर होती. संगीत नाटकांचे उत्पन्नही फारसे नव्हते. त्यामुळे गाण्याच्या मैफली करून त्या सर्व खर्च भागवत. प्रतिकूल काळामध्येही त्यांनी यशस्वीरीत्या कंपनी आणि त्यातील सर्व माणसांचा प्रेमाने सांभाळ केला.
‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी’, ‘मधु मधुरा तव गिरा’, ‘सुवर्णतुला’ नाटकामधील ‘गुणकंस’ रागातील ‘येतील कधी यदुवीर’ ही पदे नाटकाप्रमाणेच मैफलीतही त्या समरसून गात. शास्त्रीय संगीतातील ‘पूर्वा कल्याण’ आणि ‘गुणकंस’ हे त्यांचे मैफलीतील खास लोकप्रिय ठरलेले राग होते. प्रसन्न चेहर्याने आणि सतत हसतमुख राहून गाणे हे तर त्यांचे वैशिष्ट्यच होते. त्यांनी १९४४ साली गायलेल्या चार भावगीतांच्या ध्वनिमुद्रिकाही गाजल्या. त्यांनी १९४७ साली ‘गरीबांचे राज्य’ (संगीत : दादा चांदेकर) या एकमेव चित्रपटात भूमिका व गायन केले.
उत्तम गृहिणी, कलावंत, शिक्षिका, संगीत दिग्दर्शिका असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व रसिकांसमोर येते. त्यांनी सोळा संगीत नाटकांचे संगीत दिग्दर्शन केलेले आहे. ‘बाजीराव-मस्तानी’, ‘अनंतफंदी’, ‘पती गेले ग काठेवाडी’, ‘एखाद्याचं नशीब’ यांसारख्या नाटकांना त्यांनी संगीत दिले. जातिवंत शिक्षिका म्हणूनही त्यालोकप्रिय झाल्या. आज चौर्याऐंशीच्या घरात असणार्या जयमालाबाईंचा अजूनही उत्तम दाद घेणारा गळा, नवीन पिढी तयार करण्यासाठीची त्यांची धडपड, असिधाराव्रत घेतल्याप्रमाणे जयमालाबाईंनी अजूनही जपलेले विद्यादानाचे व्रत बहुमोल आहे.
अखिल भारतीय नाट्यपरिषद प्रणीत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (१९७४), राज्यशासन प्रणीत ‘बालगंधर्व’ पुरस्कार, ‘नाट्यदर्पण’चा ‘महिंद्र नटराज’ पुरस्कार (१९९८), अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (२००३, अहमदनगर), ‘छत्रपती शाहू’ पुरस्कार (२००६), ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (२००७), नाट्यपरिषदेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार व संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०११) हे पुरस्कार त्यांना संगीत व संगीत नाटक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्राप्त झाले.