शिरोडकर, मीनाक्षी पांडुरंग
‘यमुनाजळी खेळू....’ या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातल्या गाण्याने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी. मीनाक्षी यांचा जन्म मुंबईतला. त्यांचे मूळ गाव गोव्यातील पेडणी हे होय. तर त्यांचे मूळ नाव रतन पेडणेकर होते. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या राममोहन विद्यालयात झाले. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. खाँसाहेब उस्ताद भूर्जीखाँ आणि गोविंदबुवा शाळीग्राम यांच्याकडे त्यांचे संगीत शिक्षण झाले होते. संगीतातली तयारी आणि मोहक रूप यामुळे त्यांना संगीत नाटकांत कामे मिळू लागली. वयाच्या विसाव्या वर्षीच नाट्यरसिक डॉ. पांडुरंग शिरोडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
प्रसिद्ध छायाचित्रकार आणि ‘हंस चित्र’चे एक मालक पांडुरंग नाईक यांचे शिरोडकर कुटुंबीयांशी स्नेहसंबंध होते. त्यांच्या ओळखीने मीनाक्षी यांचा ‘हंस चित्र’संस्थेत प्रवेश झाला. ‘हंस चित्र’ने त्यांच्याशी महिना अडीचशे रुपयांवर करार केला. हा चित्रपट होता ‘ब्रह्मचारी’. या चित्रपटातली पोहण्याचा पोशाख असणारी त्यांची भूमिका ही हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील पहिली भूमिका ठरली. ‘यमुनाजळी खेळू....’ हे गाणे लोकप्रिय झाले. १९३८ साली चित्रपट प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. ‘ब्रह्मचारी’नंतर त्यांनी मा. विनायक यांच्या दिग्दर्शनाखाली ‘ब्रँडीची बाटली’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्यांनी काँग्रेस सेवा दलातील तरुणीची भूमिका साकारली होती. नायक होते दामूअण्णा मालवणकर. ‘ब्रँडीची बाटली’नंतर ‘देवता’ (१९३९), ‘सुखाचा शोध’, ‘अर्धांगी’ (१९४०) अशा चित्रपटांत त्यांनी काम केले.
‘अर्धांगी’ चित्रपटानंतर ‘हंस चित्र’चे ‘नवयुग चित्रपट लिमिटेड’ असे रूपांतर झाले.‘नवयुग’निर्मित पहिला चित्रपट होता ‘लपंडाव’.त्यात मीनाक्षी आणि वनमाला अशा दोन नायिका होत्या. मुंबईच्या वेस्ट एंड थिएटरमध्ये २६ जुलै १९४० रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर मीनाक्षी यांची भूमिका असलेले ‘अमृत’ आणि ‘संगम’ असे दोन चित्रपट १९४१ साली प्रदर्शित झाले. नंतर मा. विनायक यांच्या ‘प्रफुल्ल चित्र’ या बॅनरखाली ‘चिमुकला संसार’ (१९४३) व ‘माझं बाळ’ (१९४३) या चित्रपटांतून मीनाक्षी यांनी भूमिका केल्या. १९४४ साली प्रभातच्या ‘रामशास्त्री’ चित्रपटात त्यांनी रामशास्त्रींच्या पत्नीची भूमिका केली. ‘मेरी अमानत’ हा नायिका म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
१९५०-५१ च्या सुमारास मीनाक्षी यांनी मराठी संगीत नाटकातून काम करायला सुरुवात केली. त्यांनी ‘संशयकल्लोळ’, ‘उद्याचा संसार’, ‘उसना नवरा’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘सौभद्र’, ‘शापसंभ्रम’, ‘एकच प्याला’ आदी नाटकांमध्ये काम केलेले आहे. राजा परांजपे यांच्या ‘पेडगावचे शहाणे’साठी त्यांनी पार्श्वगायन केले. वृद्धापकाळाने मुंबईत मीनाक्षी यांचे निधन झाले.
- द.भा. सामंत