Skip to main content
x

सोनावडेकर, नारायण लक्ष्मण

             स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपले एक स्वतंत्र स्थान सोेनावडेकर यांनी निर्माण केले. भारतभर अनेक ठिकाणी बसविलेल्या त्यांच्या दर्जेदार शिल्पांद्वारे त्यांनी स्मारकशि-ल्पांच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील म्हात्रे, तालीम, करमरकर अशा दिग्गज शिल्पकारांची परंपरा समर्थपणे पुढे चालवली.

               नारायण लक्ष्मण सोनावडेकरांचा जन्म मुंबईतील गावदेवी येथे, विश्‍वकर्मा (पांचाळ) घराण्यात झाला. पारंपरिक देवदेवतांच्या मूर्ती घडविणार्‍या घराण्याचे ते वारसदार होते. त्यांच्या आजोबा व वडिलांनी वेंगुर्ल्यापासून गोव्यापर्यंतच्या अनेक देवळांतील देवांच्या मूर्ती घडविल्या होत्या. कोकणातील आरवलीच्या मंदिरातील ‘वेतोबा’ची लाकडी मूर्ती सोनावडेकरांच्या आजोबांनी घडविली होती. कालानुरूप ती खराब झाली म्हणून तिचे कांस्य धातूत परिवर्तन (रूपांतर) करून देण्याची जबाबदारी सोनावडेकरांनी शिल्पकार म्हणून नावारूपाला आल्यावरही पार पाडली होती.

               त्यांचे घराणे मूळचे ‘सोनावडे’ गावचे. नंतर पोटापाण्याच्या व्यवसायासाठी ते सोनावडे सोडून कोकणातील अडकेरी गावाला आले; तिथून त्यांचे वडील लक्ष्मणराव यांनी मुंबईत स्थलांतर केले. ते कुशल ‘स्टोन कार्व्हर’ होते, त्यामुळे त्यांना जे.जे. स्कूलऑफ आर्टच्या आटर्स अ‍ॅण्ड क्राफ्ट डिपार्टमेंटच्या स्टोन कार्व्हिंग क्लासमध्ये शिक्षक म्हणून नेमण्यात आलेे.

               बालपणापासूनच नारायणला मूर्ती घडविण्याचा छंद होता. शिल्पकलेचे प्राथमिक ज्ञान त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर शिल्पकलेचे उच्च शिक्षण घेण्यासाठी वडिलांचे प्रोत्साहन मिळाल्याने त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागात प्रवेश घेतला. ते १९५६ मध्ये शिल्पकला विभागाच्या अंतिम परीक्षेत विशेष नैपुण्य दाखवून प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांना या विभागाची एक वर्षाची फेलोशिप मिळाली.

               शैक्षणिक अभ्यासात उत्तम नैपुण्य दाखविल्यामुळे त्यांना १९५६ मध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या वार्षिक प्रदर्शनात सुवर्णपदक देण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिल्पकलेला उपयुक्त असणारे ‘मेटल एम्बॉसिंग’ व ‘स्टोन कार्व्हिंग’ हे जे.जे. स्कूलच्या आटर्स अ‍ॅण्ड क्राफ्ट विभागाचे अभ्यासक्रमही यशस्विरीत्या पूर्ण केले.

               जे.जे. स्कूलच्या वार्षिक प्रदर्शनात त्यांना १९५८ मध्ये रौप्यपदक व १९६१ मध्ये कांस्यपदक मिळाले होते. याच काळात त्यांना राज्य कला प्रदर्शनात १९५७ व ५८ मध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय अशी दोन बक्षिसे मिळाली. सोनावडेकरांच्या व्यक्तिशिल्पाला १९५९ च्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात ‘गव्हर्नर ऑफ बॉम्बे’ यांचे पारितोषिक मिळाले. सांपत्तिक अडचण असतानासुद्धा त्यांनी अकरा वर्षे शिल्पकलेतील सर्व अंगांचा व तंत्रांचा अभ्यास व्हावा म्हणून जे.जे.त शिक्षण घेतले.

               शिल्पकामातील नैपुण्यामुळे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे १९६२ मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. सावंतवाडी येथील लक्ष्मी न्हावेलकर यांच्याशी १९६७ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांनी पंधरा वर्षे जे.जे. स्कूलमध्ये अध्यापन केले. या काळात ते व्यावसायिक स्मारक- शिल्पे घडवून त्या क्षेत्रातही नावारूपाला आले. व्यावसायिक कामांना अधिक वेळ देण्यासाठी व अंतर्गत राजकारणामुळे १९७७ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

               ते उत्तम शिक्षक होते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे शिकवताना ते त्या माध्यमाचे मूलभूत गुणधर्म समजून घ्यायला सांगत. शिल्पाच्या प्राथमिक कामासाठी आरंभीचे माध्यम म्हणजे शाडूची माती. तिचा मऊपणा, लवचीकता, इ. गुणधर्मांची ओळख ते त्या मातीला सहजगत्या हातांनी दाबत, करून देत. माती थापण्यापूर्वी शिल्पाचा प्राथमिक सांगाडा (skeleton) कसा बांधावा याचे तांत्रिक ज्ञानही देत. शिल्प तयार करण्याच्या टप्प्यानुसार माती मळणे, मातीचा घट्टपणा, ती रचण्याची पद्धत, तसेच चेहर्‍यासाठी मातीचा गोळा थापून झाल्यावर नाक, डोळे अशा तपशिलांकडे कसे जायचे याचे प्रात्यक्षिक ते नेहमी देत.

               पाश्‍चात्त्य शिल्पकार रोदाँ यांच्या मातीलेपनाचा व रचनेचा त्यांच्यावर प्रभाव होता. याशिवाय त्यांचे शिक्षक शिल्पकार वि.वि. मांजरेकर आणि शिल्पकार करमरकर यांच्याबद्दल त्यांना आदर होता. त्यांचा उल्लेख ते आवर्जून करत. व्यावसायिक शिल्पनिर्मितीच्या क्षेत्रात सुरुवातीच्या काळात त्यांना मिळालेले महत्त्वाचे शिल्पकाम म्हणजे नागपूर येथील ऑल इंडिया रिपोर्टर या संस्थेसाठी केलेले श्री. चितळे (१९६२) व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकातील स्वामी विवेकानंदांच्या १९७१ मधील पूर्णाकृती शिल्पाचे होते.

               त्या काळात अशी शिल्पे ते, त्यांचे वास्तव्य असलेल्या खार येथील पत्र्याच्या चाळीत तयार करीत. स्वामी विवेकानंदांच्या ‘योद्धा संन्यासी’ या शिल्पप्रतिमेची मूळ संकल्पना सुप्रसिद्ध चित्रकार एस.एम. पंडित यांची होती. एस.एम. पंडित यांनी विवेकानंद शिलास्मारकासाठी केलेल्या तैलचित्राचाच त्यासाठी आधार घेतला होता. हे शिल्प ब्रॉन्झ धातूत ओतविण्यासाठी चित्रपटसृष्टीतील जुन्या जमान्यातील नट पी. जयराज यांनी स्वखुषीने त्यांच्या बंगल्यातील जागा उपलब्ध करून दिली. या शिल्पामुळे सोनावडेकरांची कीर्ती भारतभर पसरली. ‘लोकसत्ते’चे तत्कालीन प्रमुख पत्रकार कृ.पा. सामंत यांच्या लक्षात या तरुण शिल्पकाराची धडपड येताच त्यांनी या विषयावर लेखमाला लिहून, ‘अशा कलावंतांना शासनाकडून काहीही साहाय्य मिळत नसल्याबद्दल’ आश्‍चर्य व्यक्त केले. या त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन खार (पश्‍चिम) येथे सोनावडेकरांना शासनातर्फे एक जागा देण्यात आली व त्या जागेवर त्यांनी स्टूडिओ उभारला.

               यानंतरच्या काळातील त्यांची अनेक व्यावसायिक शिल्पे याच स्टूडिओत निर्माण झाली. त्यात महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक, गोवा, बिहार, दिल्ली अशा अनेक राज्यांत सार्वजनिक ठिकाणी बसविलेल्या अनेक स्मारकशिल्पांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी भारतातील अनेक उद्योगसमूहांसाठी उद्योजकांची शिल्पे तयार केली असून त्यांत टाटा, बिर्ला, बजाज, किर्लोस्कर अशा अनेक उद्योगसमूहांचा समावेश आहे. त्यांनी घडविलेली अनेक संत, महात्म्यांची शिल्पे विविध मठ, मंदिरे व समाधिस्थळी बसविलेली आहेत.

               त्यांनी केलेल्या राष्ट्रपुरुषांच्या शिल्पांत महात्मा गांधी, नागपूर (१९७४), अश्‍वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, फार्मागुडी, गोवा (१९७७), फील्ड मार्शल करिअप्पा, मडिकेरी (१९९६), महात्मा जोतिबा फुले, मुंबई (१९८२), डॉ. राजेंद्र प्रसाद, बिहार (१९८६), क्रांतिकारक बिरसा मुंडा, बिहार (१९८९) ही विशेष उल्लेखनीय आहेत.

               त्यांनी घडविलेल्या संत, महात्म्यांच्या शिल्पांत स्वामी वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी), गोविंदस्वामी, केरळचे स्वामी मेनन, भावनगरचे बजरंगदास बाप्पा, अशा शिल्पांतून जणूकाही या व्यक्तीच साक्षात समोर बसल्या असून त्या भक्तांना आशीर्वाद व आधार देत असल्याचा भाव त्यांतून प्रगट होतो.

               त्यांनी घडविलेल्या उद्योजकांच्या व्यक्तिशिल्पांत जे.एन. टाटा, सुमंत मुळगावकर, जमनालाल बजाज, साळगावकर ही व्यक्तिशिल्पे या उद्योजकांची दूरदृष्टी व धडाडी व्यक्त करतात. त्यांचे दाक्षिणात्य राष्ट्रकवी ‘कवी कुवेम्पू’ यांचे शिमोगा, कर्नाटक येथे बसवलेले शिल्प या राष्ट्रकवीचे राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्त्व व प्रतिभा, त्यांचा उभे राहण्याचा आविर्भाव व पुतळ्याला दिलेल्या पोतातून व्यक्त होतो.  याशिवाय त्यांनी कर्नाटकातील देवन्हळ्ळी येथे २००० मध्ये १७ फूट उंचीचे ‘टॉर्च बेअरर’ हे शिल्प इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एन्शन्ट हिस्टरी या संस्थेसाठी तयार केले. ही एका हातात मशाल घेतलेल्या नग्न तरुण प्रतिभावंताची वेगवान प्रतिमा आहे. त्यातील नग्नता एका फडफडणार्‍या कापडाने झाकली आहे.

               स्वत: सोनावडेकरांना हे शिल्प अत्यंत आव्हानात्मक वाटले होते; कारण त्या काळात ते असाध्य रोगाने आजारी होते, शिवाय या कामात प्रत्यक्ष व्यक्ती किंवा तिच्या छायाचित्रांचा आधारही नव्हता. परंतु या शिल्पावर ग्रीक प्रभाव जाणवतो व त्यातून ‘भारतीय प्राचीन इतिहास’ ही संकल्पना व्यक्त झाली नाही, असे मत काही विद्वान व कलावंतांनी व्यक्त केले. कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकातील त्यांचे स्वामी विवेकानंदांचे दहा फूटी शिल्प सर्व दृष्टींनी उत्तम म्हणावे लागेल. विवेकानंदांचे भव्य, तेजस्वी व उदात्त व्यक्तिमत्त्व, त्यांची तेजस्वी मुद्रा व त्यावरील भाव, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे उभी राहण्याची ढब, त्यांच्या संन्यासी वृत्तीला साजेशी त्यांची कफनी, शाल व फेटा या सर्वांची योग्य योजना, त्यांच्या भव्य देहाला स्पष्ट करणार्‍या ड्रेपरीच्या ओघवत्या घड्या व त्यानुसार योग्य पोताची निवड, या सर्व गोष्टी उत्तम प्रकारे मातीत घडवून नंतर कांस्य धातूत परिवर्तित केल्या आहेत.

               त्यांचे दुसरे शिल्प म्हणजे मुंबई विधान भवनाच्या प्रांगणात उभारलेले महात्मा फुल्यांचे बारा फुटी भव्य शिल्प. याचे वैशिष्ट्य म्हणजे मातीच्या गतिमान लेपनाने ते साकार झाले आहे. महात्मा फुल्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्यांचा जाडाभरडा पेहराव, कणखर करारी मुद्रा, विरश्रीयुक्त ढब यांचे सर्व संयोजन उत्तम रितीने, योग्य पोताची निवड करून सोनावडेकरांनी साधले आहे. त्यामुळे पुतळ्याचा भव्यपणा जाणवतो व  महात्मा फुल्यांचे व्यक्तिमत्त्व मनावर ठसत जाते.

               नारायण सोनावडेकर यांचे विश्‍वेश्‍वरय्यांचे अर्धशिल्प तर त्यांची विशिष्ट मृत्तिकालेपनाची खासियत दाखवते. ते मातीचे छोटे छोटे गोळे बोटांनी दाबून, वळवून (Gliptic process) एक विशिष्ट पोत निर्माण करून सहजगत्या रचलेले शिल्प म्हणता येईल. गडकरी रंगायतन, ठाणे येथील भिंतीवरील राम गणेश गडकरी, बालगंधर्व व कोल्हटकर यांच्या शिल्पांचे संयुक्त उत्थित शिल्प कलात्मकतेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

               सोनावडेकर गुरुस्थानी मानत असलेल्या शिल्पकार करमरकरांची थोर समाजवादी नेते एस.एम. जोशी यांना समोर बसवून शिल्प घडविण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती व करमरकरांनी आपली ही अपूर्ण इच्छा सोनावडेकरांना बोलून दाखवली होती. विशेष म्हणजे सोनावडेकरांनी आपल्या गुरूंची ही इच्छा १९८९ मध्ये पूर्ण केली व एस.एम. जोशी यांना समोर बसवून एक अप्रतिम व्यक्तिशिल्प साकारले.

               शिल्पकाराला आपण घडविलेली शिल्पे बाहेरच्या फाउण्ड्रीत योग्य प्रकारे धातूत ओतली जातील याची खात्री नसते. म्हणूनच सोनावडेकरांनी प्रयत्नपूर्वक स्वत:ची फाउण्ड्री उभी केली व स्वत:चे समाधान होईल अशा प्रकारे शिल्पांचे ओतकाम स्वत:च्याच फाउण्ड्रीत केले. नवकलेबद्दल (modern art)त्यांना विशेष आस्था नव्हती; पण ती दृष्टी त्यांना होती. कारण, आपल्या पुतळ्यासाठी बांधलेल्या प्राथमिक सांगाड्याला (skeleton) ते गमतीने ‘अमूर्त रचना’ म्हणत. गंमत म्हणून अशी काही शिल्पेही त्यांनी केली होती. आपल्या वास्तववादी कलेला बाधा नको म्हणून ते आधुनिक कलेकडे वळले नाहीत.

               सोनावडेकर आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य समाजापासून दूर राहिले. त्याला दोन कारणे असू शकतील. एक म्हणजे पूर्वायुष्यातील कटू अनुभव व स्मारकशिल्पकार्याच्या व्यावसायिक कामातील व्यग्रता व रेटा. त्यामुळे त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना व इतर सामान्य व्यक्तींना ते महान शिल्पकार होते याव्यतिरिक्त त्यांचा स्वभाव व अंतरंग कळले नाही. त्यांच्या हातून म्हात्रे, करमरकर, तालीम यांच्यासारखी सामान्यजनांच्या जीवनाचे दर्शन घडविणारी अभिव्यक्तिपूर्ण शिल्पे घडली नाहीत. याबद्दल त्यांना खंत होती व अशा प्रकारची स्वान्त:सुखाय कलानिर्मिती करण्याची त्यांची इच्छा त्यांना अखेरच्या काळात झालेल्या आजारामुळे फलद्रूप होऊ शकली नाही. असा हा स्पष्टवक्ता शिल्पकार जीवनाच्या अंतापर्यंत ताठ मानेने जगला.

               - प्रा. विठ्ठल शानभाग

सोनावडेकर, नारायण लक्ष्मण