सुतार, भिवा
आधुनिक काळातील कोल्हापूरची कलापरंपरा ज्यांच्यापासून सुरू झाली, ते कलावंत म्हणजे भिवा सुतार असे मानले जाते. ते मूळचे टेंबू या गावचे होते. त्यांना लहानपणापासून चित्रकलेचा नाद होता. भिवा सुतार हे चित्रकलेसोबतच हस्तिदंतावरील कोरीव काम व दगडाच्या मूर्तीही बनवीत असत. भिवा सुतार यांचा जन्म, बालपण, शिक्षण व मृत्यू यांबद्दलची माहिती उपलब्ध नाही. परंतु १८५० च्या सुमारास त्यांची प्रसिद्धी होऊ लागली.
त्यांना कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय शिक्षण मिळाले नव्हते; पण एका युरोपियन कलावंताचे काही काळ मार्गदर्शन लाभले होते असे म्हटले जाई. आपल्या कलागुणांमुळे त्यांनी कोल्हापूरच्या रेसिडेंटवर व त्या परिसरातील संस्थानिकांवर छाप टाकली होती. त्यातून कोल्हापूर, औंध, कुरुंदवाड, सांगली येथील संस्थानिकांनी त्यांच्याकडून बरीच कामे करून घेतली.
भिवा सुतार १८७२ च्या दरम्यान औंध संस्थानात कुणा मुलाबाळांचे पोर्ट्रेट्स काढावयाचे आहेत काय म्हणून श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्याकडे आले. त्या वेळी महाराजांनी त्यांस ‘‘मुलाबाळांचे पोर्ट्रेट्स नकोत; पण आमचे समाधान होण्यासारखे रामपंचायतन काढून द्या,’’ असे सांगितले. भिवा यांनी ते काम स्वीकारले व सुमारे चार महिने हे चित्र काढण्यासाठी ते औंधास होते. त्यांस रोज तीन माणसांचा तूप-साखरेचा शिधा व रोज नक्त पाच रुपये असा मेहनताना ठरला.
भिवा सुतार हे अत्यंत व्यसनाधीन होते. ते गांजा ओढीत, दारू पीत असत व बाहेरख्यालीही होते. औंधास असेपर्यंत त्यांनी हिरी नावाची एक सुंदर मुलगी ठेवली होती. तिला प्रत्यक्ष पुढे बसवूनच त्यांनी रामपंचायतनातील सीता काढली असे औंधचे कलासक्त महाराज भवानराव पंतप्रतिनिधी यांनी नोंदवून ठेवले आहे. अत्यंत लहरी स्वभावाचा हा कलावंत चार-आठ दिवस कुंचला हाती न घेता मौजमजा करी; पण एखादे दिवस काम करीत बसला की त्यास जेवण्याचेही भान नसे. ते रात्रंदिवस काम करीत असत. चार महिन्यांत रामपंचायतनाचे चित्र तयार झाले व ते औंधमधील महाराजांसकट सर्वांना अत्यंत आवडले. त्यातील शैली बघता पाश्चिमात्य शरीरशास्त्राचा व भारतीय परंपरेचा या चित्रात सुरेख संगम दिसून येतो. वस्त्रे रंगविताना वास्तववादी शैलीचा वापर असून दागदागिनेही अत्यंत सुंदर रंगविले आहेत.
चित्र पूर्ण झाले. चार महिने पाच रुपये रोज आणि तीन माणसांचा उत्तम शिधा रोज याप्रमाणे साडेसातशे रुपये त्यांनी वसूल केले व निघते वेळी म्हणाले, ‘‘मला हजार रुपये द्या, नाहीतर चित्र देत नाही.’’ महाराजांना चित्र अत्यंत आवडले होते. शिवाय भिवा सुताराची वृत्ती व व्यसनी स्वभाव ते जाणून होते. शेवटी साडेसातशे रुपये जास्त दिले व शेला पागोटे देऊन त्यांना रवाना केले.
या काळात त्यांनी श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींच्या वडिलांचा एक लाकडाचा पुतळा केला होता. शिवाय त्यांनी औंधास ज्यांना गुरू मानले, त्या विठोबा अण्णा यांना लाकडाची वासुदेवाची सुंदर मूर्तीही बनवून दिली. त्यांनी तरुणपणी घडविलेल्या मूर्ती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींच्या संग्रही होत्या. मुरलीधर, दोन गोपी, दोन गायी, स्तनपान करणारी वासरे असा एक मूर्तिसमूह, हस्तिदंती महादेव-पार्वती, गणपती, दत्त अशी ही यादी आहे. परंतु पुढील काळात त्या नाहीशा झाल्या. राजाराम रंगोबा छायाचित्रकार यांनी १८७४ मध्ये या श्रीराम-पंचायतनाचे फोटो काढले. त्याच्या प्रती करून विकून त्यांनी भरपूर पैसे मिळवले. या चित्राची लोकप्रियता बघून पुण्याच्या चित्रशाळा प्रेसचे वासुदेवराव जोशी यांनी आपल्या शिळा प्रेसवर हे रामपंचायतनाचे चित्र छापले. ते एवढे लोकप्रिय झाले की त्याच्याही हजारो प्रती काढाव्या लागल्या.
कुरुंदवाडच्या संस्थानिकांना भिवा सुतारांनी हस्तिदंती गणपतीची मूर्ती करून दिली होती. मुंबईच्या एस. महादेव या फोटोग्रफी कंपनीने त्याची छायाचित्रे काढली व त्याच्या प्रती करून विकल्या. ते छायाचित्रदेखील अत्यंत लोकप्रिय ठरले.
भिवा सुतार हे कुरुंदवाडकर पटवर्धन यांच्या पदरी अनेक दिवस होते. त्यांनी भिवाची लहरी वृत्ती व व्यसनाधीनता सांभाळून त्यांच्याकडून बरीच कामे करून घेतली. तेथे त्यांनी गणपतीचे व सिंहाचे चित्र, सोन्याचे कमळ केले होते. याशिवाय गणपती व ॠद्धि-सिद्धी, राम-लक्ष्मण-सीता-मारुती, मुरलीधर अशा हस्तिदंती मूर्ती करून दिल्या होत्या. मुंबईच्या माधवबागेतील ‘लक्ष्मीनारायणा’ची संगमरवरी मूर्ती भिवा सुतारांच्याच हातची आहे.
एकंदरीत विविध पुस्तकांतील उल्लेख व उपलब्ध छायाचित्रे बघता भिवा सुतार हे रविवर्मांपूर्वी वास्तववादी शैलीत प्रमाणबद्धता, रेखाटनातील लय व डौल सांभाळत दर्जेदार कलानिर्मिती करणारे कलावंत होते असे म्हणता येईल. पण ते आपली कला कशी तयार होते हे इतरांस दाखवीत नसत. औंध दरबारचे चितारी बंडोबा चितारी यांनी त्यांच्याकडे जाऊन असा प्रयत्न केला असता भिवा सुतारांनी त्यांना आपण चित्र कसे काढतो ते बघू दिले नाही.
आबालाल रहिमान यांच्यापूर्वीपासून कोल्हापूर परिसरात वास्तववादी पद्धतीचे काम करणारा हा कलावंत असल्यामुळे त्या परिसरातील लोक कोल्हापूरची कलापरंपरा आधुनिक काळात भिवा सुतारांपासून सुरू झाली असे मानतात.
- सुहास बहुळकर