ताम्हाणे, व्ही.ए.
व्ही.ए. ताम्हाणे उपाख्य रावबहादूर ताम्हाणे यांनी १९०२मध्ये एल.एजी. (लायसेंसिएट इन अॅग्रिकल्चर) पदवी प्राप्त करण्यासाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा या महाविद्यालयाला स्वतंत्र अस्तित्व नसून ते कॉलेज ऑफ सायन्स (आताचे अभियांत्रिकी महाविद्यालय)चाच एक भाग होते. ताम्हाणे यांनी १९०६मध्ये पदवी प्राप्त केली. ताम्हाणे यांची रसायनशास्त्र विभागात डॉ. मेग्गिट्ट यांच्या हाताखाली प्रोबेशनर म्हणून काम करण्यासाठी निवड झाली होती. कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. हॅरॉल्ड एच. मॅन यांचे निकटचे सहकारी म्हणून त्यांनी कार्य केले आहे. डॉ. मॅन हे संशोधनाला अत्यंत महत्त्व देत असत व महाविद्यालयाच्या कर्मचार्यांनी आपली गुणवत्ता सतत वाढवत राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे आपल्या कार्यकाळात त्यांनी अशा सुसंधीचा नेहमीच सदुपयोग करून घेतला. खारपट जमिनीच्या बाबतीत त्यांचे ज्ञान अत्यंत वाखाणण्याजोगे होते. त्यांनी कोरडवाहू शेतीच्या विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या योगदानाबाबत त्यांना सरकारतर्फे विविध मानसन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ताम्हाणे यांनी काही काळासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. कृषी महाविद्यालयात एकूण चाळीस वर्षे सेवा बजावून ताम्हाणे १९३९मध्ये निवृत्त झाले.
- संपादित