Skip to main content
x

तांबे, भास्कर रामचंद्र

     भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्म झाशीजवळच्या मुंगावली (ग्वाल्हेर) गावात झाला. त्यांचे वडील रामचंद्र गंगाधर तांबे आणि आई यमुनाबाई, ज्या देवासच्या डोंगरे यांच्या कन्या होय. तांबे यांचे शिक्षण माळव्यात झाले. देवासच्या हायस्कूलमधून १८९३ साली ते अलाहाबादच्या मॅट्रिक परीक्षेस बसले व पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. नंतर देवासचे राजपुत्र खासेसाहेब पवार यांचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ‘चिवचिव चिमणी छतात’ हे तांब्यांचे बालगीत खासेराव आणि त्यांच्या भावंडांसाठीच निर्माण झाले होते आणि त्यांच्यासाठीच रॉबर्ट ब्राउनिंगच्या ‘पाइड पायपर ऑफ हेमेलिन’चा ‘पुंगीवाला’ हा अनुवाद त्यांनी केला. आपल्या सुरुवातीच्या लेखनात प्रतिभेचा अभाव जाणवल्यामुळे त्यांनी आपल्या काही कविता जाळून टाकल्या. १८९७ साली रतलाम येथील त्र्यंबकराव जावडेकर यांच्या वारूबाई नावाच्या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला.

इंदोरला वास्तव्य असताना तांबे यांनी होळकर महाविद्यालय, डेली महाविद्यालय येथील ग्रंथालयांत अभ्यास केला. संस्कृत काव्याचे आणि नाटकांचे त्यांनी अध्ययन केले, आणि इंग्रजी कविताही भरपूर वाचल्या. टेनिसनच्या काव्यातील संगीत आणि ब्राउनिंगच्या नाट्यगीतातील पात्र विविधता व मनोलेखनाचे खूप आकर्षण त्यांना वाटले होते. त्याचा प्रभाव तांब्यांच्या काव्यसृष्टीवर पडलेला दिसतो. कवी तांब्यांनी ‘भयंकर प्रमाद’ नावाचे अपूर्ण नाटक लिहिल्याचा तसेच ‘वियोगिनी’ नावाचे ऐतिहासिक काव्य आणि ‘सरोवर आणि कमळे’ ह्या प्रेमगीत संग्रहाचा उल्लेख आढळतो, पण ते लेखन अनुपलब्ध आहे.

तांब्याच्या कवितेचा संग्रह काढण्याची कल्पना सर्वांत आधी प्रा.वासुदेव गोविंद मायदेव यांच्या मनात आली आणि ती साकार झाली. त्यानंतरचा तांब्यांच्या कवितेचा दुसरा भाग दि. गं. केळकर म्हणजेच ‘अज्ञातवासी’ यांनी काढला. कवी तांबे यांच्या एकसष्टीनिमित्त अनेक विशेषांक निघाले त्याच वेळी कवी माधव जूलियन म्हणजेच माधवराव पटवर्धन यांनी ‘तांबे यांची समग्र कविता’ या शीर्षकाने तांब्यांची एकंदर पूर्ण कविता संपादित केली आणि नंतर काही वर्षांनी प्रा.रा.श्री.जोग यांच्या दीर्घ प्रस्तावनेसह तांब्यांची समग्र कविता रसिकांपुढे आली. ग्वाल्हेरच्या ‘तांबे वाढदिवस मंडळाने’ ‘तांबे: व्यक्ती आणि कला’ हा ग्रंथ १९३४ साली प्रकाशित केला. ग्वाल्हेरचे अधिपती जिवाजीराव शिंदे ह्यांनी कवी तांब्यांना ‘राजकवी’ ही पदवी बहाल केली आणि तांब्यांचे शिष्य, देवासच्या छोट्या पातीचे राजे खासेसाहेब पवार ह्यांनी तांब्यांची नेमणूक करून घेतली. तांब्यांची खासियत म्हणजे आपल्या काव्याचे सादरीकरण करता-करता अनेक कवींच्या काव्याची चिकित्सा करीत-करीत काव्यानंद द्विगुणित करीत असत, असे सांगितले जाते. प्राच्य आणि पाश्‍चात्त्य काव्याचे वाचन, अध्ययन केलेल्या तांब्यांना आपल्या भाषेचा अभिमान होता आणि संस्कृत कवितेचा दर्जा इंग्रजीपेक्षा कमी नाही, असेच ते म्हणत.

तांबे यांच्या विचारात आनंद हाच कलेचा उद्देश आहे. चित्र, संगीत, काव्य ह्या कला एकमेकींच्या हातांत हात घालून चालतात अशी त्यांची धारणा होती. सश्रद्ध तांब्यांना कलासाधना हा परमेश्वरी प्रसाद वाटे. त्यांची दृष्टी, श्रद्धा, मांगल्य, आनंद यांना महत्त्व देणारी होती आणि प्रेम ही तिची पायाभूमी होती. हे जग जणू अपूर्व सुंदर नाटक आहे, असे त्यांना वाटे. त्यामुळे त्यांनी कवितेतून सजीव भावभावनांची, अस्सल जगतानाची चित्रे रेखाटली. त्यांची कविता नाट्यगीते, प्रेमगीते, गूढगीते, निसर्गगीते आळवते. त्यांच्या प्रेमगीतांमध्ये वास्तव आणि कल्पना यांचा संगम आहे. तांब्यांची कविता वैणिक (lyrical) आहे. म्हणून आत्मनिष्ठ आणि नाट्यात्मक काव्य त्यांनी निर्माण केले. ज्या माळव्यात तांबे राहिले तेथील संगीतमयतेचा प्रभाव त्यांच्यावर होता. माधवराव पटवर्धनांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी काव्य आणि संगीत यांच्या परस्पर प्रभावाची मीमांसा केलेली आहे.

‘कित्येक ठिकाणी सोळा मात्रांच्या जागी मी चौदा मात्राच ठेविल्या आहेत. त्या का? तेथे संगीत कलेचा संबंध येतो. ....संगीताचा आणि काव्याचा किती निकट संबंध आहे, आणि संगीतामुळे काव्यातील भावना किती उठावदार होतात, आणि या दोन जुळ्या बहिणी कला एकमेकींस भेटल्या व खेळीमेळीने सहकार्य करू लागल्या, तर ह्या दुःखमय पृथ्वीवर स्वर्गलोक कसा भरभर उतरून येतो, हे मी तुम्हांला सप्रयोग सिद्ध करून दाखविले असते.’ (१३/४/१९३५, सह्याद्री, फेब्रुवारी १९४२)

तांब्यांच्या धारणा आणि काव्यक्षमता ह्या मध्य प्रदेश भागातल्या संस्थानी वातावरणाने घडवलेल्या होत्या. म्हणूनच त्यांच्या चाली स्त्रीगीतांच्या, लोकगीतांच्या, हरिदासी पद्धतीच्या आणि तत्कालीन नाट्यगीतांच्या आहेत. त्यांची सौंदर्यदृष्टी इंद्रिय संवेदनांच्या पल्याड जाऊन भावनाट्यनिर्मिती करते. त्यांच्या कवितेतील विवाहोत्तर प्रेमात ‘अन्तरः कोऽपि हेतुः’ची छटा नाही असे माधवराव पटवर्धन म्हणाले होते. त्यावर तांबे पत्रात म्हणतात, ‘त्या वेळची समाजस्थिती कशी होती? ‘अष्टवर्षात् भवेत् कन्या’ हा प्रकार होता. प्रेमयाचनेला अवकाशच नव्हता. ....माझ्या रजपूत अद्भुतरम्य कवितांचे जनन याच जाणिवेत आहे.’ (राजकवी तांबे यांचा साहित्यविषयक पत्रव्यवहार, संपादक ना. बा. पराडकर, ग्वाल्हेर १९४९, पृष्ठ १०७)

तांबे यांचे वैशिष्ट्य असे की, कवितेतून त्यांनी रूपसंवेदक कल्पनाचित्रे आणि शब्दसंवेदक कल्पनाचित्रे रेखाटून दृष्टी-श्रवण-स्पर्श-रस-गंधयुक्त संवेदना चितारल्या. सौंदर्यवादी विशेषांमध्ये त्यांच्या कवितेचे प्राणतत्त्व आहे, पण कवितेचा आत्मा अस्सल भारतीय आहे. त्या सुंदरतेच्या प्राणतत्त्वात आधुनिक धीटपणाचा प्रत्यय मिसळला जातो. तांब्यांबाबत असे म्हणता येईल की, ते काव्यातील व्यक्तींच्या भावभावना, संवेदना, रक्तवाहिन्या आणि मेंदूही धारण करतात आणि आपले स्वत्व राखून एका नव्या अस्तित्वाला जन्म देतात. म्हणूनच त्यांच्या नाट्यगीतांनी मराठी कवितेत एक नवे दालन उघडले आहे ज्यामध्ये निवेदन, आत्मनिवेदन, संवाद, विरोधी लयतत्त्वे असे सारे काही असते. याबाबत प्रा. श्री. के. क्षीरसागर म्हणाले होते- ‘निर्भेळ समतेपेक्षा परिमित विषमतेत...गोडी आहे, हे रोमँटिक संप्रदायाने ओळखलेले रहस्य... जुन्या मराठी कवींत ज्ञानेश्वरांनी व आधुनिकांता तांब्यांनी हेरले आहे, तेवढे दुसर्‍या कोणीही हेरलेले नाही.’ (‘टीकाविवेक’) तांब्यांच्या कवितेत भाऊ-बहीण, पति-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, मुशाफीर-राजकन्या, राजकन्या-दासी, पहारेकरी-राजकन्या, माळीण-गिर्‍हाईक, वंचिता, विधवा-मुले असे बहुविध परस्परसंबंध आहेत. कधी निवेदन-संवाद असे मिश्रणही आढळते; तर काही फक्त मनोगते आहेत. तांब्यांना आत्मौपम्य वृत्तीने अशी विविधता टिपता आलेली आहे.

तांब्यांच्या कवितेतील गूढगीतांमध्ये जी अनंताची ओढ आहे ती मूळचीच आहे. म्हणून ते म्हणाले होते ’I have always been a mystic’. प्रेम आणि विश्वास यांतून ते प्रेमश्रद्धेचा संदेशच देत होते, दृश्य जगाच्या खोलीचा वेध घेऊ पाहत होते, म्हणूनच ते खर्‍या अर्थाने प्रेमप्रतीतिधर्मी (Love Mystic) कवी ठरतात.  तांब्यांची ही प्रेमश्रद्ध वृत्ती त्यांच्या गूढगीतांमध्ये प्रकटलेली आहे, जिला संतांच्या विराण्यांचा स्पर्श आहे आणि कबीर, तुलसीदास आणि मीरा यांच्या वृत्तीचा स्पर्श आहे. ह्या अपार्थिवाच्या स्पर्शाने पार्थिव जीवनच बदलले; मनाची समजूत घालू लागले की ‘मना वृथा का भीशी मरणा, दार सुखाचे ते हरि-करुणा’, मग मृत्यूला सामोरे जाण्याची वृत्ती आलेली आहे; ज्यात पूर्ण ज्ञानाने आलेली विस्मितता आहे. मग गूढताही मूर्त होते कारण तिच्यात सूचकता आहे. जगाच्या चक्राची घरघर थांबून आणि आत्मज्ञानानंतरची अवस्था असे दोन प्रवाह त्यांच्या गूढगीतांत दिसतात. ही प्रक्रिया विश्लेषणात्मक नाही, ते भावनात्मक संश्‍लेषण आहे. मग तिथे ईश्वर, माणूस आणि निसर्ग यांची मिसळण होते आणि नवी, वेगळी भूमिका प्रकटते; ज्यात आत्मज्ञानाची अंतःप्रतीती प्रकट होते. आता सौंदर्यशोध हा शिवत्वाचा शोध बनतो आणि अंतिम सौंदर्यात पूर्णतः आत्मविसर्जन करण्याची प्रेरणा बळावते; जी भारतीय परंपरेत ज्ञानेश्वर, रवींद्रनाथ आणि अरविंदबाबू यांच्या अनुभूतिविश्वात होती; तीच तांबे यांच्या कवितेत साधकापासून परिणतप्रज्ञेपर्यंतचा प्रवास करताना दिसते. म्हणूनच तांब्यांच्या कवितेत निसर्ग हा केवळ पृष्ठभूमी म्हणून येत नाही तर तो कवितेत वावरतो. रंग, रूप, गंध होऊन प्रतीत होतो. मग एखादी दूध काढणारी गवळण पाहताना दुधात स्वप्नभूमी बिंबून गोड झालेल्या दुधाची तृप्ती अनुभवास येऊ शकते.

कवी तांबे यांची काव्यशैली प्रश्नात्मकता आणि विरामचिन्हांच्या सजग जाणिवेने अद्भुत, भावरम्य रसायन बनून वावरते. त्यात शब्द नादाच्या जाणिवेने उमलतात आणि अर्थ प्रसरणशील बनवीत जातात. तांब्यांच्या कवितेतील ‘विधवागीते’ ही तत्कालीन वैधव्यदर्शनातून अनेक अनुभवांची चित्रे बनतात. कधी ते एखाद्या विधवेचे स्वप्न असते, ज्यातून जागच येऊ नये असे वाटते; कधी एखादीच्या अंगुलीचा फोड, शाईचा डाग, मनाबरोबर शरीराचे पोळणे दाखविते; तर कधी ‘बघुनि तया मज होत कसेसे’ असे म्हणत ती मनाचे धुमसलेपण व्यक्त करते. ‘हिंदु विधवेचे मन’ या कवितेत समाजभीतीने ‘बहीण होईन, दासी होईन...’ असे म्हणत ती स्वतःची समजूत काढते, तर ‘नदीतीरी उभी ती.’ मध्ये वैधव्यानंतरच्या सासुरवासामुळे ती जीव द्यायला जाते पण मुलांच्या हाकेने परतते, तर कधी ‘ते कांत यापुढे’ मधून ती जुलमाला आग लावणारी बंडखोर पुनर्विवाहोत्सुक अशा रूपात दिसते. तांब्यांचे समाजभान इथे पूर्ण जागे दिसते. संस्थानात राहणे, पारतंत्र्य अशा दुहेरी बेड्यांमध्ये राहूनही त्यांनी आपली प्रतिभा स्वतंत्र राखली.

तांबे हे स्वतः संगीताचे अभ्यासक होते. माधवराव पटवर्धनांनी तांब्यांची कविता संपादित करताना राग बदलले, पण रागांमधून संगीताने अर्थ वर्धमान करण्याची तांबेक्षमता नाहीशी करून टाकली; शब्द बदलले आणि तांबेपण नाहीसे केले. विरामचिन्हे काढून टाकून भावस्पर्श कमी केला आणि शीर्षके बदलून अर्थवत्तेला ढळ पोहोचवला. आजही जी रा. श्री. जोग प्रत उपलब्ध आहे, तीत ती शबलित झालेली कविताच नव्या पिढीपर्यंत येत आहे.

थोडक्यात, तांबे यांनी अनेकानेक काव्यप्रकार हाताळले- भावगीते, नाट्यगीते, मुक्तके, सुनीते(ode), स्तोत्रे, शोकगीते (elegy), इत्यादी. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगाचे सौंदर्य महत्त्वाचे मानले, दुःखाशी झगडून प्राप्त केलेल्या आनंदाला महत्त्वपूर्ण मानले, संगीताला भावनेची आंतरसंगती मानून काव्य केले, बालकवितेने नवा प्रदेश उजळून टाकला आणि टणक-अकाव्यात्मक शब्द योजून अनुभवाचे सौंदर्य महत्त्वाचे असल्याचा प्रत्यय दिला. तांबे यांच्या काव्यक्षेत्रातील पृथगात्मतेचे स्वरूप हे असे आहे. आधुनिकतेच्या संदर्भात तांबे यांची काव्यदृष्टी नव्याने न्याहाळणे, हेच त्यांच्या कवितेला न्याय देणे ठरावे. त्यांचे निधन ग्वाल्हेर येथे झाले.

- डॉ. आशा सावदेकर

तांबे, भास्कर रामचंद्र