Skip to main content
x

तारळेकर, गणेश हरी

     संस्कृत आणि संगीत यांचा एकत्रित समन्वय क्वचित पाहायला मिळतो. पुण्यात डॉ. अरविंद मंगरूळकर आणि प्रा. ग.द. तारळेकर ही दोन नावे डोळ्यासमोर येतात, पण तारळेकरांचा बराच काळ खान्देशातल्या धुळे-जळगावमध्ये गेला. निवृत्तीनंतर ते भांडारकर संस्थेत येऊ लागले व बरीच वर्षे रेग्युलेटिंग काउन्सिलचे ते सभासदही होते.

     कोल्हापूर जिल्ह्यातील तारळे गावी गणेश हरी तारळेकरांचा जन्म झाला. एम.ए. संस्कृतची पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठातून घेतली. नंतर बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीची एम.ए. आणि मुंबई विद्यापीठातून बी.टी. या पदव्या मिळवल्यावर १९६२ साली पुन्हा पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी घेतली. त्यानंतर ते संस्कृतचे प्राध्यापक म्हणून प्रथम जळगावच्या एम.जे. महाविद्यालयामध्ये आणि नंतर धुळ्याच्या एस.एस.व्ही.पी. महाविद्यालयामध्ये दाखल झाले. १९७४ साली धुळ्याच्या महाविद्यालयामधून संस्कृत विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले आणि पुण्याला आले. त्यांनी संस्कृतच्या पीएच.डी. विद्यार्थ्यांबरोबर ‘इंडियन म्युझिकॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले.

     त्यांच्या अजोड कर्तृत्वामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये महाविद्यालयीन निवृत्त विशेष प्राध्यापक म्हणून विद्यापीठ अनुदान मंडळाचा गौरव पुरस्कार, मुंबईच्या संगीत सभेकडून ‘स्वरसाधना रत्न’ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून ‘आदर्श संस्कृत अध्यापक’ आणि संगीतातील संशोधनाचा विशेष पुरस्कार मुंबईच्या संगीत संस्थेकडून मिळाला आणि अलीकडे भारत सरकारतर्फे ‘राष्ट्रपती संस्कृत पंडित’ पुरस्कारही मिळाला होता.

    डॉ. तारळेकर पुण्यामध्ये आल्यावर त्यांनी विद्यापीठाच्या विविध संस्कृत समित्यांवर काम केले. भारत गायन समाजाचे ते बराच काळ अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे ते अध्यक्षही होते. भांडारकर संस्थेच्या सल्लागार मंडळावर बरीच वर्षे काम केल्यावर ते संस्थेचे शेवटपर्यंत विश्वस्त होते.

    डॉ. तारळेकरांचा संशोधनाचा विषय संगीत आणि संस्कृत असला तरी त्यांनी प्रामुख्याने ‘भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर’ खूप संशोधन केले. तसेच प्राचीन भारतीय संगीताच्या इतिहासाची त्यांना खूप जाण होती. अलीकडे ते सामवेदाचे शास्त्रोक्त गायन शिकले होते, ही गोष्ट संस्कृतच्या क्षेत्रात दुर्मिळ होती.

    ‘नाट्यशास्त्र’ या तारळेकरांच्या ग्रंथाची दुसरी आवृत्ती अलीकडेच प्रसिद्ध झाली होती. शारंगदेवाचा ‘संगीत रत्नाकर’ तीन खंडांमधून त्यांनी प्रसिद्ध केला होता. त्यासाठी साहित्य संस्कृती मंडळाने मदत दिली होती. ‘पुष्पसूत्र’ या सामवेदाच्या ग्रंथाचे काम त्यांनी मोठ्या मेहनतीने केले होते; जे  इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आटर्सतर्फे प्रसिद्ध झाले आहे. ‘भरत नाट्यशास्त्रा’चा अठ्ठाविसावा अध्याय त्यांनी लिहून पूर्ण करून छपाईसाठी दिला. पण प्रत्यक्ष ग्रंथ पाहावयाला ते मुकले, याची सर्वांना जाणीव आहे. ‘इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स’ हा त्यांचा ग्रंथ जगभराच्या रसिकांनी वाखाणला आणि ‘सामवेदाचे स्वरोच्चार’ लोकांनी कौतुकाने स्वीकारले होते. त्यांच्या जीवनात त्यांच्या पत्नी नलिनीताईंचा मोठा सहभाग होता. तारळेकरांच्या प्रत्येक कार्यात त्या आघाडीवर असत.

    २००२ साली तारळेकर यांना भारत सरकारचा संस्कृत अभ्यासासाठी असलेला सन्मान (मरणोत्तर) राष्ट्रपती भवन येथे   प्राप्त झाला. त्यांच्या पत्नी नलिनीताई यांनी  तो स्वीकारला.

    — वा.ल. मंजूळ / आर्या जोशी

तारळेकर, गणेश हरी