Skip to main content
x

टिळक, लक्ष्मीबाई

     क्ष्मीबाई टिळक ह्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव नारायण गंगाधर गोखले. लक्ष्मीबाईंचे बालपण त्यांच्या आत्या रखमाबाई गोविंद खांबेटे ह्यांच्या घरी गेले. नारायण वामन टिळक यांच्याशी विवाह झाल्यावर मनकर्णिका हे नाव बदलले गेले आणि लक्ष्मीबाई नारायण टिळक म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या.

     कवी टिळकांनी ‘माझी भार्या’ ह्या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे लक्ष्मीबाई रूपाने सामान्य होत्या. ८जुलै १९०० रोजी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी वेशभूषा बदलली नाही. त्या अखेरपर्यंत नऊवारी नेसत होत्या. ‘ख्रिस्ती धर्माचा कुंकू न लावण्याचा काही संबंध येत नाही, तेव्हा नेहमीप्रमाणे कुंकू लावण्यास काहीच हरकत नाही,’ असे ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या टिळकांनी सांगितले होते. तरी, एका मडमेला वचन दिले होते म्हणून लक्ष्मीबाईंनी कुंकू लावणे सोडून दिले होते. त्यांच्या अंगावर दागिना नसे कारण पैसा हातात आला की टिळकांकडून तो लगेच खर्च होई. लक्ष्मीबाई हाती आलेला पैसा जपून वापरत.

     टिळकांच्या विक्षिप्त आणि उदार स्वभावापायी लक्ष्मीबाईंना अनेकदा मनस्ताप सोसावा लागला. तरीही त्या कधी कुढत बसल्या नाहीत. तशाही परिस्थितीत त्या आनंदी आणि उत्साही असत. स्वतः विनोद करीत व दुसर्‍याने केलेल्या विनोदावर ‘हसण्याचा रोग’ असावा इतक्या अनावर हसत.

     लक्ष्मीबाईंच्या माहेरी शिक्षणाचे वातावरण नव्हते. लग्नानंतर टिळकांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. कै आणि खै, क्ष आणि ज्ञ, ड आणि ढ अशा अक्षरांचा क्रम बोटे मोडल्याशिवाय त्यांना आठवत नसे. जोडाक्षरे लिहिणेही त्यांना जमत नसे. १९१३च्या सुमारास बाईंनी कीर्तनकलेचे व ईश्वरविद्येचे शिक्षण घेतले.

     याच काळात लक्ष्मीबाईंनी सामाजिक कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता. टिळक धर्मांतर करणार, ही बातमी कानावर येताच लक्ष्मीबाई कासावीस झाल्या आणि ‘म्हणे जातो सोडून नाथ माझा, अता कवणाला बाहू देवराजा....’ ही चार ओळींची कविता लिहिली. हे  बाईंचे पहिले काव्यलेखन. लक्ष्मीबाईंच्या कविता टिळक दुरुस्त करत व प्रसिद्धीला पाठवत. लोकांना कवी टिळक परिचित होते. टिळकच पत्नीला कविता लिहून देतात, असा काहींचा समज होता. ‘मासिक मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘करंज्यातला मोदक’ ही कविता वाचून पंढरपूरच्या एका बाईने लक्ष्मीबाईंकडे तसा खुलासा मागितला होता. बाईंना रात्री कविता सुचत. मग जमिनीवर आगपेटीच्या काडीने किंवा खडूने किंवा कोळशानेही त्या लिहून काढीत. एकदा तर पावणे तीनशे ओळींची कविता त्यांनी अशी लिहिली होती. बालकवींनी नंतर ती कागदावर लिहून काढली. लक्ष्मीबाईंच्या कवितांचा ‘भरली घागर’ हा कवितासंग्रह त्यांचा पुत्र देवदत्त नंतर प्रकाशित केला.

     टिळकांनी सुरू केलेल्या ‘अभंगांजलि’ ह्या ‘ज्ञानोदय’मधील सदरात टिळकांच्या निधनानंतर लक्ष्मीबाईंनी अभंगलेखनही केले. टिळकांच्या हातून अपूर्ण राहिलेल्या ‘ख्रिस्तायन’ ह्या काव्याचे चौसष्ट अध्याय सहज, सोप्या, रसाळ शैलीत लिहून लक्ष्मीबाईंनी ‘ख्रिस्तायन’ पूर्ण केले. शेवटचा अध्याय देवदत्त टिळकांनी लिहिला.

     नाशिक येथे १६सप्टेंबर १९३३रोजी माधव जूलियन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनाच्या स्वागताध्यक्ष लक्ष्मीबाई होत्या. ह्याच वर्षी २८डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या त्या पहिल्या स्त्री-अध्यक्ष होत. शाळेची पायरी कधीही न चढलेल्या लक्ष्मीबाई टिळकांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला शोभेल असे भाषण केले.

     टिळकांच्या निधनानंतर बिसेलबाईंनी  मुंबईत भायखळा येथील मुलींच्या वसतिगृहावर मेट्रन म्हणून लक्ष्मीबाईंची नियुक्ती केली. समुद्रभरतीत वसतिगृहातील अकरा मुली व एक मुलगा असे बारा बळी गेले, त्यामुळे बाईंची ही पहिली आणि शेवटची नोकरी ठरली.

     टिळक पति-पत्नींच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात फार फरक होता. त्यांचे एकमत व्हायचे, ते फक्त परोपकाराबाबत. हौशी, दया, चिकी या मुलींना त्यांनी घर दिले आणि ताराला तर आपले आडनावही दिले. टिळक दाम्पत्याची दोन अपत्ये- विद्यानंद आणि नर्मदा ही बालपणीच निधन पावली. देवदत्त हे तिसरे अपत्य. १८९६च्या दुष्काळात बोर्डिंगच्या बावीस मुलांना आश्रय देताना लक्ष्मीबाईंनी आपल्या एकुलत्या एका मुलाचे वेगळे लाड केले नाहीत. एखाद्याच्या आजाराची बातमी कळताच ह्या ‘नाशिकच्या आजीबाई’ आपला बटवा घेऊन स्वतःहून जात आणि आजारी व्यक्तींची शुश्रूषा करीत.

    मुळात टिळकांच्या आठवणी देवदत्त लिहिणार होते आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल लक्ष्मीबाई पुरवणार होत्या. लक्ष्मीबाईंची वर्णनशैली इतकी अपूर्व होती की, पन्नास वर्षांपूर्वीचा प्रसंग प्रत्यक्षात घडतो आहे, असे ऐकणार्‍याला वाटावे. त्यामुळे देवदत्तांनी टिळकांचे चरित्र लिहिण्याची कामगिरी लक्ष्मीबाईंवर सोपवली. लक्ष्मीबाईंनी सांगितलेल्या...घटना त्या स्वतः लिहीत. त्या नातवंडांना शिकवता-शिकवता स्वतः अक्षरे गिरवत. त्या जशा बोलत, तशाच लिहीत. तोंडी-लेखी भाषेतला फरक त्यांना कळत नसे. त्यांचे लिखाण दुसर्‍याला वाचता आले नाही, तरी त्या स्वतः उत्तम रितीने वाचून दाखवत.

     ‘स्मृतिचित्रे’मधला कालखंड साधारण १८५७पासून सुरू होतो. त्या वेळची राजकीय व सामाजिक परिस्थिती फार ढवळून निघाली होती, तरी त्याचे प्रतिबिंब स्मृतिचित्रात फारसे पडलेले आढळत नाही. कारण टिळकांच्या आठवणी सांगणे, हाच एक हेतू ‘स्मृतिचित्रे’ लिहिण्यामागे होता. आपल्या पतीची विद्वत्ता आणि कवित्व ह्यांविषयी लक्ष्मीबाईंच्या मनात अतिशय आदर होता. टिळकांवर त्यांचे फार प्रेम होते. त्यामुळेच, टिळकांच्या स्वभावापायी दारिद्य्रात दिवस काढावे लागले, तरी त्यांनी त्याची कटुता लेखनात येऊ दिली नाही. टिळक होते तसे वाचकांपुढे उभे करताना त्यांनी टिळकांना कोठेही कमीपणा येऊ दिला नाही. तसेच स्वदोषांवरही पांघरूण घातले नाही. महादेवशास्त्री जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे “लक्ष्मीबाईंचा विचार करताना महाराष्ट्रातील, किंबहुना भारतीय नारीजात लक्षात घ्यायला हवी. त्यांचा सुटा विचार करता कामा नये. परंपरागत संस्कारांचे ओझे त्यांच्या मनावर होते. नारीचे सगळे गुणदोष त्यांच्यात होते. म्हणून त्या मराठी मनाला श्रद्धेय ठरल्या.”

     ‘स्मृतिचित्रे’च्या तिसर्‍या भागाच्या प्रकाशनाच्या वेळी आचार्य अत्रे म्हणाले, “रणांगणातून घायाळ परंतु विजयी होऊन परत आलेल्या वीराकडे पाहून त्याच्या अंगावरील जखमा मोजताना स्वकीयांना जो आदर वाटतो, तोच आदर ‘स्मृतिचित्रे’ वाचून श्रीमती लक्ष्मीबाईंबद्दल वाटतो.”

     ‘स्मृतिचित्रे’च्या चार भागांपैकी तीन भाग टिळकचरित्राने व्यापले आहेत. ‘स्मृतिचित्रे’चा तिसरा खंड १५ डिसेंबर १९३५ रोजी आचार्य अत्रे यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला. त्यानंतर २४ फेबु्रवारी १९३६ रोजी लक्ष्मीबाईंचे निधन झाले. टिळकांच्या जीवनातील चढउतार, स्थित्यंतरे आणि उत्तरोत्तर शांत होत गेलेल्या स्वभावाचा आलेख बारकाव्यांनिशी लक्ष्मीबाईंनी रेखाटला आहे. टिळकांना यातून वजा केले, तर लक्ष्मीबाई निष्प्रभ ठरतात, असे अजिबात होत नाही. एरवी ‘अत्मचरित्रा’मध्ये आत्मकथनाच्या अनुषंगाने इतर गोष्टी येतात. इथे टिळक हा केंद्रबिंदू मानून त्या आसाभोवती लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे फिरताना दिसतात. ‘स्मृतिचित्रे’ हे टिळकांचे चरित्र आहे, तसेच लक्ष्मीबाईंचे आत्मचरित्रही आहे.

     ‘बाबा पद्मनजींचे ‘अरुणोदय’ व कै.रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ यांत घरगुती, साधी भाषा असली, तरी पहिल्यात विनोद व चटकदारपणा नाही आणि दुसर्‍यात तुलनेने मनमोकळेपणा कमी आहे. म्हणून ‘स्मृतिचित्रां’ना मराठी वाङ्मयात अनन्यसाधारण स्थान असल्याचे प्रा.र.श्री.जोगळेकर यांनी लक्ष्मीबाईंच्या सत्कार समारंभप्रसंगी म्हटले होते. आपले चरित्र लिहायचे झाल्यास आपण होतो तसे लिहिले जावे, अशी इच्छा टिळकांनी व्यक्त केली. लक्ष्मीबाईंनी सांगितलेल्या आठवणी मधुसूदन गोखले, इंदिरा त्रिभुवन आणि माधव मनोहर लिहून घेत. कधी लक्ष्मीबाई स्वतः लिहीत.

     ‘स्मृतिचित्रे’मधून मोकळेपणाने निर्भीडपणाने सत्य सांगताना मार्मिक विनोदाची पेरणी करत, खुसखुशीत शैलीत प्रसंग रंगवत, जिवंत वाटावीत अशी व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे गतशतकातली महत्त्वपूर्ण आत्मचरित्र-चरित्रग्रंथ म्हणून ‘स्मृतिचित्रे’ची नोंद केली जाते.

     लक्ष्मीबाईंचे अशुद्धलेखन सर्वपरिचित होते. एकदा त्यांनी ‘पिसाप वेस’ असा शब्द लिहिला. बाईंचे अशुद्धलेखन शुद्ध करून वाचण्यात माधव मनोहर पटाईत. त्यांनी ताडले की, बाईंना ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ असे म्हणावयाचे आहे. माधव मनोहर म्हणतात, “प्रिन्स ऑफ वेल्स, हा शब्द शुद्ध लिहिणारे अनेक असतील पण ‘स्मृतिचित्रे’ लिहिणारे किती असतील?”

     - डॉ. अनुपमा उजगरे

संदर्भ
टिळक लक्ष्मीबाई; ‘स्मृतीचित्रे.’
टिळक, लक्ष्मीबाई