Skip to main content
x

तल्हार, मनोहर मारोतीराव

       मनोहर मारोती तल्हार यांचा जन्म अमरावती येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत व माध्यमिक शिक्षण आय.इ.एम. शाळा व समर्थ हायस्कूलमध्ये झाले. १९५० मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला, पण ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.

१९४९पासून चित्रपटासंबंधी लेखनाला त्यांनी सुरुवात केली. नंतर १९५५पासून त्यांनी कथा, कादंबरी लेखनाला सुरुवात केली. ‘बुढीचं खाटलं’ (१९५८), ‘तोलरेघ’ हा दहा निवडक कथांचा संग्रह (१९६५), ‘गोरीमोरी’ (१९६६), ‘निःसंग’ (१९७८), ‘कॅन्सल’ हा पंधरा कथांचा संग्रह (१९९३), व ‘दुजा शोक वाहे’ (२०००) असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

१९९५ मध्ये त्यांचा ‘श्वेतांबरी’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. ‘अप्रिया’ (१९६६), ‘अफलातून’ (१९८६), ‘शुक्रथेंब’ (१९९४), ‘अशरीरी’ (१९९४) ‘अशरीर’ (१९९४) आणि ‘माणूस’ (१९६२) या त्यांच्या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. यांपैकी ‘माणूस’ ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी होय.

१९५८ ते १९६७ या काळात वर्‍हाडमधील जनवादी कादंबरी- विशेषतः उद्धव शेळके, मनोहर तल्हार, वामन इंगळे यांच्या पहिल्या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. या कादंबरीमधून समाजातील श्रमजीवी, साधनवंचित, शोषित वर्गाचे चित्रण करण्यात आले आहे. हे आधुनिक वैदर्भी जनवादी कादंबरीचे वैशिष्ट्य होय.

तल्हार हे अशाच एका श्रमजीवी (शिंपी) जातीत जन्म घेतलेले लेखक आहेत. पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन, ते सरकारी नोकरी शिरले, ते शहरात स्थायिक झाले असले, तरी त्यांचे जन्मजातीशी असलेले नाते ते विसरू शकले नाहीत. तल्हारांनी नेहमी स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहून लेखन केले. त्यामुळे काळ अधिक लागला तरी चालेल, परंतु लोकप्रियतेशी तडजोड करून त्यांनी कधीही लेखन केले नाही. दीर्घकालावधीतले त्यांचे मोजके पण वैशिष्ट्यपूर्ण लेखन प्रसिद्ध झाले.

श्रमजीवी वर्गाबद्दलचा त्यांचा अनुभव अस्सल होता आणि त्याचेच प्रामाणिक चित्रण ते ‘माणूस’ कादंबरीत करतात. या कादंबरीतील प्रमुख पात्र शंकर हा रिक्षावाला आहे. त्याच्या जीवनातील बदलामुळे ना तो गावचा आणि ना शहराचा अशा असुरक्षित भावनेचे सावट घेऊन जगतो आहे. ‘माणूस’मधील नागर श्रमजीवी समाजाचे चित्रण आपल्याला हादरवून टाकते, अस्वस्थ करून सोडते.

तल्हार यांचे सारे लेखन हे स्वतःच्या अनुभूतीशी प्रामाणिक राहूनच केले आहे, हे विशेष .

त्यांच्या ‘दुजा वाहे शोक’ला महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार लाभलेला आहे. 

- प्रा. मंगला गोखले/ आर्य जोशी 

तल्हार, मनोहर मारोतीराव