Skip to main content
x

तनपुरे, कुशाबा बाळोबा

तनपुरे महाराज

    नपुरे महाराज या नावाने विख्यात झालेल्या पूर्वाश्रमीच्या कुशाबा बाळोबा तनपुरे यांचा जन्म नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी या गावात, मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध दशमीला झाला. त्यांच्या आईचे नाव भागीरथी होते. माता-पित्यांनी त्यांना आगड गावी, मावशीकडे काम करण्यासाठी पाठवले. त्यांना महिना तीन रुपये मिळत. कुशाबाने दोन वर्षे ते काम केले. पण त्यांचे लक्ष भजन, पूजन, कीर्तनात रमे. पुढे त्यांना भिंगार येथे बागेत कामाला ठेवले. तिथेही त्यांचे कामात लक्ष नसे म्हणून त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.

ते सुतारकाम शिकण्यास जाऊ लागले. पुढे आई-वडिलांनी कुशाबाचे लग्न लावून दिले. काही दिवस संसार ठीक चालला. एके दिवशी नोकरीच्या ठिकाणी वाद निर्माण झाला. कुशाबा रागाने काम सोडून घरी आला. आईदेखील त्यांच्यावर रागावली. कुशाबा उपाशीपोटी घरातून बाहेर गेला. तिथे त्यांना काही मित्र भेटले. ते त्यांना तमाशाला घेऊन जाऊ लागले. रस्त्याने जाताना अखंड हरिनाम सप्ताहातील हरिनाम त्यांच्या कानी आले. तमाशाला जाण्याचा विचार सोडून ते घोंगडे महाराजांच्या सप्ताहाच्या समाप्तीला गेले. तेथे गाडगेबाबांचे कीर्तन चालू होते. या कीर्तनातून त्यांनी शिकवण घेतली, की परोपकार करून दीन-दुबळ्यांचा दुवा घ्यावा. त्यामुळे जन्माचे सार्थक होईल.

कुशाबाने गाडगेबाबांना गुरू मानले व त्यांच्याकडे कीर्तनाचा अभ्यास सुरू केला. कामात असतानासुद्धा मन रामध्यानात, भक्तिभावात असे. रात्री भजनाचा नित्यक्रम सुरू झाला. हळूहळू कुशाबा तनपुरे स्वत: कीर्तन करू लागले. घोंगडेबाबांच्या सप्ताहाप्रमाणे तनपुरे यांच्या सप्ताहाला गर्दी होऊ लागली. कडक वैराग्य, त्यागी वृत्तीने तनपुरे महाराजांचे चौदा नामसप्ताह यशस्वीरीत्या पार पडले. सप्ताहाच्या वेळी हजारो लोकांना अन्नप्रसादाचा लाभ होई. लोकांना तनपुरे महाराजांच्यात देवत्वाची प्रचिती आली.

सर्वसामान्य जनतेतले अज्ञान, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध तनपुरे महाराजांनी बंड पुकारले. देवापुढे कोंबडा, बकरा वगैरे बळी देण्याची अनिष्ट रूढी महाराजांनी बंद केली. कीर्तनाद्वारे समाजात जागृती करून दारू, गांजासारख्या व्यसनांतून हजारो लोकांना सन्मार्गाकडे वळविले. १९४० पासून अंध, अपंग, महारोगी यांच्यासाठी महाराजांनी अन्नछत्रे चालविली. शेकडो लोक तृप्त होऊन महाराजांना दुवा देऊ लागले. महाराजांचे भक्त असलेले धनिक लोक अन्नछत्रांतून अनाथ, अपंगांना मिष्टान्न देत. महाराज संत श्री गाडगेबाबांचे परमभक्त होते. तसेच कैकाडीबाबा, तुकडोजी महाराज यांच्या पठडीतले लोककल्याणार्थ तन, मन झिजवणारे महान कीर्तनकार होते. महाराजांनी चार धाम यात्रा पायी केली.

भक्तांकडून मिळालेल्या संपत्तीची आस धरली नाही. त्यांचे जीवन म्हणजे खडतर व योग्याचे होते. धर्म जागृतीबरोबर त्यांनी अस्पृश्यता निवारणाचा आटोकाट प्रयत्न केला. केदारनाथच्या यात्रेत महाराजांना वाचा सिद्धी प्राप्त झाली. सर्वत्र त्यांचा शिष्यवर्ग तयार झाला. महाराज पंढरपुरी वास्तव्याला असत. चार धाम यात्रेच्या वेळी महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगांच्या मूर्ती पंढरपुरास आणून दर्शनासाठी ठेवल्या होत्या.

  — वि.ग. जोशी

तनपुरे, कुशाबा बाळोबा