Skip to main content
x

ठाकरे, श्रीकांत केशव

          वडील प्रबोधनकार ठाकरे यांचे संस्कार, कलाप्रेम आणि वडीलबंधू बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास यांमुळे त्यांचे धाकटे बंधू श्रीकांत हेही व्यंगचित्रकार झाले यात नवल ते काय! प्रबोधनकार सतार उत्तम वाजवायचे आणि पेंटिंग्जही करायचे. आपल्या मुलांनी कुठल्या ना कुठल्या कलेत प्रगती करावी असा त्यांचा कटाक्ष होता. त्याप्रमाणे श्रीकांत ठाकरे यांनी व्हायोलिन शिकायला सुरुवात केली अन् त्याचबरोबर चित्रकलाही.

          ‘केसरी’ या दैनिकात व्यंगचित्रे काढण्याचे काम बाळासाहेबांनी सोडल्यावर ते काम श्रीकांत यांच्याकडे आपसूक आले. व्यंगचित्रांची कल्पना आणि चित्रकला यां बाबतीत त्यांचे सल्लागार अर्थातच बाळासाहेब होते. त्यानंतर आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ यांत त्यांनी व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे दिवस असल्याने व अत्रे त्यात आघाडीवर असल्याने श्रीकांत ठाकऱ्यांची व्यंगचित्रे गाजू लागली. आचार्य अत्रे यांना अटक झाल्यावर तर त्यांनी संपादकीय जबाबदारी स्वीकारून पूर्ण पान व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली.

          त्या काळातील त्यांची चित्रे खरोखरीच प्रभावी होती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये मोरारजी देसाई यांच्या कारकिर्दीत झालेल्या गोळीबारात अनेक आंदोलक मारले गेले. त्याबद्दल मराठी जनतेत मोरारजींबद्दल चीड होती. मोरारजी देसाई त्यांच्या व्यक्तिगत आहाराविहाराबद्दल विशेष काटेकोर व प्रसंगी हेकेखोर होते. या पार्श्वभूमीवर श्रीकांत ठाकऱ्यांनी असे चित्र काढले की, प्रेतांच्या राशीवर सैतानाच्या रूपात बसलेले मोरारजी केळे खात म्हणताहेत, ‘‘मी पक्का शाकाहारी आहे!’’

          पुढे साठ साली ‘मार्मिक’ सुरू झाला आणि श्रीकांत ठाकरे यांची जबाबदारी वाढली. ‘मार्मिक’च्या आतल्या पानांत ते राजकीय व्यंगचित्रे काढायचे. इतरही काही रेखाटने करायचे. चित्रपट परीक्षणाचे ‘सिनेप्रिक्षान’ नावाचे सदर ते ‘शुद्धनिषाद’ या नावाने लिहायचे. त्यांच्या राजकीय, सामाजिक चित्रांमधली रेखाटने पाहण्यासारखी आहेत. एका व्यंगचित्रात इराणी हॉटेलचे व्यंगचित्रात्मक रेखाटन त्यांनी इतके हुबेहूब केले आहे, की त्याला दाद द्यावीच लागेल.

          बाळासाहेबांचा वरदहस्त असल्याने त्यांनी ब्रशच्या साहाय्याने केलेली व्यंगचित्रे किंवा रेखाटने, त्याचबरोबर मराठी भाषेशी खेळता खेळता केलेले विनोद यांमुळे त्यांची शैली ही बाळासाहेबांच्या शैलीशी मिळतीजुळती होती. मात्र, ब्रशच्याच नाजूक रेषांनी त्यांनी केलेली हिंदी चित्रपटांतील नटनट्यांची अर्कचित्रे (कॅरिकेचर्स) हे त्यांचे काम निश्चितपणे वेगळे अन् महत्त्वाचे मानता येईल.

          ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘बन्याबापू’ या नावाने त्यांनी काही वर्षे पॉकेट कार्टून्स काढली. संगीतकार म्हणूनही त्यांची अनेक भावगीते (विशेषत: मुहम्मद रफी यांनी गायलेली) गाजली. त्याचबरोबर अनेक मराठी चित्रपटांनाही त्यांनी उत्तम संगीत दिले.

- प्रशांत कुलकर्णी

ठाकरे, श्रीकांत केशव