ठाकूर, प्रभाकर शंकर
प्रभाकर शंकर ठाकूर यांचा जन्म जबलपूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव उमाबाई होते. ठाकूर चार वर्षांचे असतानाच त्यांचे वडील नोकरीच्या निमित्ताने नागपूरला येऊन स्थायिक झाले. त्यांनी शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी स्वीकारली. ठाकूर यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत झाले. नंतर माध्यमिक, उच्च माध्यमिक असा शैक्षणिक प्रवास करत ते १९३७मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९४१मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी तृतीय श्रेणीत मिळवली. त्यानंतर त्यांनी नोकरीसाठी ग्वाल्हेर संस्थानात जायचे ठरवले. तेथे त्यांची सेंट्रल फार्मवर साहाय्यक कीटकशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली.
नागपूर येथे कृषी महाविद्यालयात कंपोस्ट खत योजनेत साहाय्यक बायोकेमिस्ट म्हणून त्यांची नेमणूक झाली, पण या खतामध्ये मानवी विष्ठेचा वापर होत असल्यामुळे लोकांमध्ये त्याबद्दल घृणा होती. हे खत विनामूल्य नेण्यासाठीही शेतकरी तयार नसत. या खताचा प्रचार-प्रसार याबाबत ठाकूर यांनी सावनेर गावी केलेला प्रयोग सफल ठरला. पुढे या खताबाबत गैरसमज दूर झाला व अन्य खतांच्या तुलनेत गुणवत्ता सिद्ध झाल्यामुळे हे खत लोकप्रिय झाले.
ठाकूर यांना १९४८मध्ये बायोकेमिस्ट म्हणून अमरावती विभागासाठी पदोन्नती मिळाली. १९४९मध्ये मालती देव या तरुणीशी त्यांचे लग्न झाले. १९५०मध्ये सरकारने कंपोस्ट खत योजना बंद केल्यामुळे त्यांना तृतीय दर्जाच्या कृषी अधिकारी पदावर पदावनती स्वीकारावी लागली.
ठाकूर यांची नियुक्ती सांगलीला झाल्यावर आष्टा व त्याजवळील खेड्यात बिनपंखी टोळांचा शाळूवर उपद्रव होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न ४०-५० टक्के कमी यायचे. त्या खेड्यात लागोपाठ दोन वर्षे कीटकनाशकांची हवाई फवारणी करण्यात आली. त्यानंतर टोळांचा उपद्रव झाला नाही. तद्नंतर ठाकूर यांनी विविध ठिकाणी काम केले.
१९५२मध्ये कृषि-विभागाच्या विकास खंड योजनेत चार अमेरिकन विशेषज्ञांची, मध्य प्रदेश सरकारला सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती व यासाठी ठाकूर दुभाष्याचे काम करत होते. या तज्ज्ञांच्या मदतीने ४ ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर्स व विस्तार अधिकाऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर उभारले गेले, ज्यात ठाकूरही सहभागी झाले होते.
१९६५मध्ये एकात्मिक क्षेत्र विकास योजना शासनाने राबवण्यास घेतली. या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ठाकूर यांची प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. या योजनेत लहान शेतकऱ्यांना उभे करण्याच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारक कल्पना मांडण्यात आल्या होत्या. वि.स.पागे यांच्याबरोबर एकात्मिक क्षेत्रविकास आणि रोजगार हमी योजना राबवत असतानाच १९६७ साली ठाकूर यांना खात्यातर्फे प्रशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्यात आले.
सांगली जिल्ह्यात पहिल्या जिल्हा परिषदेत ठाकूर कृषि-विभाग अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांनी जिल्ह्यात द्राक्ष संवर्धनाची मोहीम उघडली. त्यांच्या प्रयत्नाला चांगले यश आले आणि थोड्याच दिवसांत द्राक्ष क्षेत्रात सांगलीचे नाव अग्रेसर झाले. त्यांचा पिंड कार्यकर्त्याचा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन वाटा निर्माण करण्याकडे त्यांचे सतत लक्ष असे. १९७०मध्ये सांगली शेतकरी सहकारी कारखान्यावर उद्यान विकास अधिकारी असे नवे पद निर्माण करून ते स्वीकारण्यास त्यांना राजी केले. अशा रीतीने ते सहकारी क्षेत्राकडे वळले. या प्रतिनियुक्तीच्या काळातही महिन्यातील २५ दिवस शेतकऱ्यांच्या शेतावर नवीन बागा लावण्यास व नवनवे प्रयोग करण्यास त्यांनी सुरुवात केली. द्राक्ष, डाळिंब, संत्रे, आंबा, मोसंबी, अंजीर, नारळ व गुलाब असे फळबाग व फुलबाग यांचा कार्यक्रम त्यांनी राबवला. यापैकी मोसंबीच्या बागा चांगल्या टिकल्या.
१९७२ सालच्या दुष्काळात ठाकूर यांनी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने लिफ्ट इरिगेशनची योजना सांगलीत राबवण्यात सहभाग घेतला. वसंतदादा पाटील यांनी अमेरिकेतून आणलेल्या द्रवरूप अमोनिया या सर्वांत स्वस्त नायट्रोजन देणार्या खताच्या उत्पादनाबाबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहित्याच्या आधारे ठाकूर यांनी एक टिप्पणी केली व ती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यकारिणीत प्रस्तुत केली. त्यानंतर महाराष्ट्र को-ऑप. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लि. या कंपनीची स्थापना करण्यात आली. ठाकूर मधल्या काळात कृषि-उपसंचालक म्हणून ठाण्यात बदलीवर गेले. आपण स्वेच्छानित्ती घेऊन एमसीएफसीच्या कामात सहभागी व्हावे असे त्यांनी ठरवले व १९७४ साली स्वेच्छानिवृत्ती घेऊन एमसीएफसीमध्ये सीनीअर फिल्ड अॅग्रॉनॉमिस्ट म्हणून रुजू झाले. पुढे द्रवरूप अमोनियाच्या वापराचे सफल प्रयोग करण्यात ठाकूर यांनी सहभाग घेतला, पण दुर्दैवाने ही संस्था पुढे बरखास्त करण्यात आली. या प्रकल्पावर त्यांनी लिहिलेला निबंध राष्ट्रीय स्तरावर पंजाबात झालेल्या परिसंवादात वितरित करण्यात आला.
सेवानिवृत्तीनंतर ठाकूर यांनी पुण्याच्या कम्युनिटी एड अॅब्रॉड (ऑस्ट्रेलिया) व अफार्म या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने डेकोस्पिनच्या कामात नव्या योजनांचा अंतर्भाव केला. सांगली-कोल्हापूर भागांतील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, पाणलोट क्षेत्र विकास अशा योजना संस्थेच्यावतीने राबवण्यात आल्या. महाराष्ट्र पशुसंवर्धन संघटना, महाराष्ट्र राज्य शेळी-मेंढी संशोधन व विकास संस्था, बोर महासंघ, डाळिंब संघ अशा अनेक संस्थांच्या कार्यात त्यांनी सहभाग घेतला.
ठाकूर यांना १९८९ साली महाराष्ट्र शासनाच्यावतीने कृषिभूषण पुरस्कार आणि कृषी खात्याचे शतसांवत्सरिक सुवर्णपदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
ठाकूर यांना राज्यस्तरावर व्यापक कार्य करण्याची संधी मिळाली. त्यांनी निरनिराळ्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरच्या परिसंवादांत भाग घेतला. फलोद्यान व सामाजिक वनीकरणाच्या योजना राबवणे व त्यासाठी विद्यापीठे, स्वयंसेवी व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून निरनिराळे कार्यक्रम करण्यासाठी ते झटले. डॉ. व्होरा यांच्या निसर्ग प्रतिष्ठानतर्फे राबवल्या जाणाऱ्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते.
ठाकूर यांनी शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात आपले आयुष्य व्यतीत केले. अधिकारी म्हणून केवळ नोकरी बजावण्यापेक्षा त्यांनी हजारो शेतकऱ्यांना चाकोरीतून बाहेर काढून विकासाची नवी वाट दाखवली. शासकीय योजनांचा मूळ आशय, मूळ हेतू कार्यपद्धतीतील गुंतागुंतीत न हरवता, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत आणि मनोभूमीत रुजवण्याचे काम त्यांनी केले. एक सच्चा व प्रामाणिक सरकारी सेवक हातातील पद आणि सत्तेचा उपयोग लोकहितार्थ किती परिणामकारकपणे करू शकतो याचे प्र.शं.ठाकूर हे आदर्श उदाहरण आहे.