Skip to main content
x

थत्ते, अरविंद दिगंबर

डॉ. अरविंद थत्ते यांचे कार्य साथ, एकलवादन, संशोधन व अध्यापन या सर्वच संदर्भांत वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. कलेशी व माणुसकीशी तडजोड न करणारा एक तत्त्वनिष्ठ, विचारवंत कलाकार व सहृदय माणूस म्हणून त्यांचा गौरव केला गेला आहे.

अरविंद दिगंबर थत्ते यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका येथे झाला. संगीत व विश्लेषक बुद्धीमत्ता यांचे बाळकडू त्यांना दिगंबर व वत्सला या आई-वडिलांकडूनच मिळाले. त्यांचे आजोबा हरहुन्नरी होते व कीर्तन, संगीत नाटकांत काम, चित्र काढणे, उत्तम कलमे बांधणे असे अनेक कलागुण त्यांच्यात होते. वडील व्यवसायाने शिक्षक, पण हार्मोनिअमही चांगली वाजवत. रत्नागिरीस असताना ते हार्मोनिअमची साथ व क्वचित संगीत नाटकांत ऑर्गनची साथही करत. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षापासूनच अरविंद थत्ते हे हार्मोनिअम वाजवू लागले. नंतर हे कुटुंब पुण्यात आले व त्यांच्यासमोर संगीताचे अधिक मोठे दालन खुले झाले. थत्ते यांना स्वरांची सूक्ष्म जाण बालपणापासूनच होती व स्वरलेखन करण्याची हातोटीही होती. बाराव्या वर्षी थत्ते यांचे भारत गायन समाजात संगीताचे रूढ शिक्षण सुरू झाले. तिथे त्यांनी सुहास दातार व सुधीर दातार यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले, तसेच त्यांनी तबल्याचे शिक्षण पुण्यात जी.एल. सामंत यांच्याकडे घेतले. वयाच्या एकविसाव्या वर्षापासून पुढे चौदा वर्षे पंडित जसराज यांच्याकडे त्यांनी कंठसंगीताचे शिक्षण घेतले.

त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे विद्यालयामध्ये झाले. गरवारे महाविद्यालयामधून बी.एस्सी. व नंतर पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. व एम.फिल. केल्यानंतर त्यांनी ‘विशुद्ध गणित’ या विषयात १९८७ साली पीएच.डी. मिळवली. मात्र, त्यांनी आपला व्यासंग संगीताच्या क्षेत्रातच चालू ठेवला. मुळातच मर्मवेधी अशी कुशाग्र बुद्धी व गणिताचा अभ्यास यांतून आलेल्या चिकित्सेमुळे  त्यांनी संगीताकडेही एका वेगळ्या दृष्टीने पाहिले. त्यांची सांगीतिकता ही वैज्ञानिक दृष्टी व कलाकारी वृत्ती या दोन्हींच्या मिश्रणातून बनलेली आहे.

ते १९८२ साली आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत स्पर्धेत ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. या दरम्यान रागसंगीताच्या मैफलींना ते हार्मोनिअमची साथही करू लागले. ‘स्वरानंद’ संस्थेच्या ‘मंतरलेल्या चैत्रबनात’, ‘आपली आवड’ अशा भावगीतांच्या कार्यक्रमांनाही त्यांनी साथ केली. ज्येष्ठ कथक गुरू रोहिणी भाटे यांना व काही तबलावादकांना नगम्याची साथही थत्ते यांनी केली. काही काळ जयमाला शिलेदार यांच्या संगीत नाटकांना व भीमसेन जोशींच्या ‘अभंगवाणी’लाही त्यांनी ऑर्गनची साथ केली.

एक व्यावसायिक हार्मोनिअम वादक म्हणून अरविंद थत्ते यांनी मोगूबाई कुर्डीकर, निवृत्तीबुवा सरनाईक, गजाननबुवा जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, के.जी. गिंडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, जसराज, राम मराठे, यशवंतबुवा जोशी, बाळासाहेब पूछवाले, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, सी.आर. व्यास, गंगूबाई हनगल, माणिक वर्मा, प्रभा अत्रे, किशोरी आमोणकर, शोभा गुर्टू, गिरीजा देवी, परवीन सुलताना, लक्ष्मी शंकर इ. सुप्रसिद्ध कलाकारांना साथसंगत केली. गायकाचा संगीतविचाराचा ओघ तुटू न देता, वादनातले सातत्य टिकवून स्वराचा भरणा देणारी, गायकाच्या मांडणीला खुलवत जाणारी, अगदी तंतोतंत, नेमकी साथ हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. अरविंद थत्ते यांनी मालिनी राजूरकरांना केलेली साथ लक्षणीय ठरली आहे. साथीच्या निमित्ताने त्यांनी भारतभर, तसेच अमेरिका, युरोप, आखाती देश, इ. देशांतही दौरे केले.

गायकावर कधीही कुरघोडी न करता, गायकीतले बारकावे नेमकेपणाने टिपत, त्याला पोषक अशी साथ करण्याबाबत अरविंद थत्ते यांचा लौकिक आहे. साथीसाठी नॅचरल ट्यूनिंगच्या हार्मोनिअमचा वापर मोठ्या प्रमाणात करून त्यांनी वादनातील सुरेलपणाचा एक मानदंडच निर्माण केला. अत्यंत नेमकी, संयमित व पूरक साथ करून देशातील अग्रगण्य हार्मोनिअम साथीदारांत त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. गेल्या काही काळात प्रामुख्याने डॉ. अरविंद थत्ते यांच्या परिश्रमांमुळे विशिष्ट स्वरपट्टीसाठी स्वरजुळणी केलेल्या ‘स्पेशल ट्यूनिंग’ हार्मोनिअम कटाक्षाने वापरण्याकडे महाराष्ट्रातील गायक-वादकांचा कल आहे.

त्यांनी १९९५ नंतर मात्र साथसंगत करणे सीमित केले. त्यानंतर डॉ. थत्ते यांनी प्रामुख्याने एकल हार्मोनिअम वादनाद्वारे या वाद्यातून उत्तम रागसंगीत निर्माण करणे व त्याद्वारे या वाद्याला मैफलीतला मानाचा दर्जा (कॉन्सर्ट स्टेटस) देणे यांकडे आपले लक्ष केंद्रित केले.

डॉ. अरविंद थत्ते यांनी एकलवादनाची स्वतंत्र शैलीच निर्माण केली व तिचा प्रसारही त्यांनी नेटाने केला. हार्मोनिअम वादनाच्या गायकी-अंग वा तंत-अंग अशा कुठल्याही साच्यात स्वतःला अडकवून न घेता, गायकी वा तंत्राच्या सामायिक आयामांबरोबरच हार्मोनिअमच्या स्वतंत्र क्षमतांना जोपासून त्यांनी सर्वसमावेशक अशी वादनशैली विकसित केली. तारता, गरिमा, घनता व आघात या संदर्भांत असणार्‍या हार्मोनिअमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून त्यांनी या वाद्याच्या कक्षा रुंदावणारे विशुद्ध रागसंगीत वाजवले. चिंतन, रियाजातून आलेला घोटीवपणा आणि उत्स्फूर्ततेचा ओलावा यांचा मेळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी एकलवादनात अनेक कलाकारांच्या बाबतीत दिसणारे दोष, हिणकसपणा टाळला. वादन करताना हातवारे व हावभावांपेक्षा वादनातील स्पष्टता, नेमकेपणा याला महत्त्व दिले.

डॉ. थत्ते यांनी हार्मोनिअमला साजेसे राग निवडणे, त्यांत गतींची बांधणी करणे, तसेच आलाप-जोड-झाला, द्रुत गतींबरोबरचा झाला, छंदवादन, विविध जातींमधील सूक्ष्म लयकारीचे व तयारीचे वादन असे अनेक आयाम विकसित केले. ललित, अहिरभैरव, नटभैरव, तोडी, चारुकेशी, शुद्धसारंग, भीमपलास, मधुवंती, दिन की पूरिया, पूरिया, पूरिया धनाश्री, कल्याण, दुर्गा, झिंझोटी, बागेश्री, औडव बागेश्री, मालकंस, कैशिकरंजनी, इ. राग मैफलींत वाजवून हार्मोनिअमवर उच्च दर्जाचे रागसंगीत वाजू शकते याची साक्ष पटवली आहे. ‘श्री’सारख्या रागाची पेशकश हार्मोनिअमवर करण्याचे आव्हानही त्यांनी समर्थपणे पेलले. गौरी, बिहागडा, संपूर्ण मालकंस, मालवती, श्रीकल्याण असे विशिष्ट घराण्याशी वा कलाकाराशी जोडले गेलेले रागही त्यांनी वेगळी वाट चोखाळत वाजवले, तसेच बसंतीकेदार, पूरियाकल्याण, जोगकंस असे जोडराग वाजवण्यात त्यांचा हातखंडा आहे. चंद्रबसंती, त्रिवेणी मध्यम, संपूर्णकंस असे रागही त्यांनी निर्माण केले. अशा हार्मोनिअम वादनासाठी त्यांनी खास गतींची निर्मिती केली. हार्मोनिअम वादनाच्या कक्षेत ‘टप्पा’ हा प्रकार त्यांनी प्रथमच आणला. खमाज, काफी, भैरवी यांबरोबर जयजयवंती, मारुबिहाग, वाचस्पती यांसारख्या रागांमध्ये त्यांनी टप्पे बांधले व सादर केले.

अरविंद थत्ते यांनी तीनताल, एकताल, झपताल, रूपक या तालांतील गतकारीबरोबर झूमरा तालात मध्यविलंबित लयीत ख्यालवादन केले. शिवाय मत्तताल, मिश्रजाति-रूपक, तिस्रजाति-रूपक, खंडजाति-रूपक, अष्टरूपक, साडेसात मात्रांचा नीलताल, मिश्रजाति-पंजाबी, आडा झपताल अशा अनवट तालांतही त्यांनी वादन करून लयतालावरचा आपला अधिकार सिद्ध केला आहे.

विष्णू दिगंबर जयंती समारोह (दिल्ली), मणिराम मोतीराम संगीत समारोह (हैदराबाद), कुमार गंधर्व स्मृती समारोह (देवास), बंडूभैया चौघुले स्मृती समारोह (इंदूर), सवाई गंधर्व संगीत महोत्सव (कुंदगोळ), शिवानंद संगीत महोत्सव (औंध संस्थान), शाहू संगीत समारोह (कोल्हापूर), दादर माटुंगा म्युझिक सर्कल (मुंबई), स्वरगंगा संगीत महोत्सव व राम मराठे पुण्यतिथी (ठाणे), भुवनेश्वर, धारवाड, इ. ठिकाणी त्यांनी एकलवादनाच्या मैफली प्रस्तुत केल्या. एकल हार्मोनिअमवादनासाठी त्यांनी पहिला अमेरिका दौरा २००६ साली केला.

त्यांच्या एकल हार्मोनिअमवादनाच्या अनेक ध्वनिफिती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या वादनाची ध्वनिचकती (सी.डी.) १९९६ साली प्रसिद्ध झाली.

आपल्या संशोधक वृत्तीने त्यांनी हार्मोनिअमच्या ट्यूनिंगची वेगळी पद्धत तयार केली, तसेच रागसंगीतावरही संशोधन केले. केवळ हार्मोनिअमबद्दलच नव्हे, तर संपूर्ण रागसंगीतावर महत्त्वपूर्ण भाष्य करणारा ‘संगीत विमर्श’ हा डॉ. अरविंद थत्ते यांचा इंग्रजी भाषेतला ग्रंथ २०१० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी श्रुतिविचार, चतुःसारणाप्रयोग, रागनिर्मिती व रागविस्तार, आवाज व वाद्याचा रियाज, मैफलीतील प्रस्तुती, गुरु-शिष्य नाते, इ. अनेक बाबींवर त्यांचे मूलगामी विचार व्यक्त  केले आहेत.

त्यांना पहिला कुमार गंधर्व पुरस्कार (१९९३, सोलापूर), बंडूभैया चौघुले पुरस्कार (२००२, इंदूर), गोविंदराव टेंबे संगतकार पुरस्कार (२००३, पुणे), लीलाताई जळगावकर पुरस्कार (२००८, पुणे) असे पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेे. गायन व हार्मोनिअम या दोन्हींसाठी ते खर्‍या अर्थाने विद्या ‘दान’ करत आहेत. सुयोग कुंडलकर, चैतन्य कुंटे, चिन्मय कोल्हटकर, मानसी महाजन हे त्यांचे शिष्य उत्तम हार्मोनिअम वादक म्हणून गणले जातात .

डॉ. थत्ते यांच्यातील उच्च दर्जाची कला व तत्त्वनिष्ठा यांमुळे समकालीन कलाकारांमध्ये एक कृतिशील विचारवंत कलाकार व सहृदय व्यक्ती म्हणून त्यांचे आदराचे स्थान निर्माण झाले आहे.

चैतन्य कुंटे

थत्ते, अरविंद दिगंबर