Skip to main content
x

उदगावकर, भालचंद्र माधव

     टाटा मूलभूत संशोधन संस्था (टी.आय.एफ.आर.) नावाच्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेतील ज्येष्ठ प्राध्यापक व बुद्धिप्रामाण्याच्या आधारे मराठीतून उत्कृष्ट वैज्ञानिक प्रबोधन करणारे भौतिकीचे नामवंत संशोधक असलेल्या भालचंद्र माधव उदगावकरांचा जन्म, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले. शालेय जीवनातही ते अतिशय हुशार म्हणून गणले गेले.  तेव्हाच्या मॅट्रिकच्या परीक्षेनंतर दोन वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या इंटर सायन्स परीक्षेत, पहिल्या वर्गात, पहिल्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. त्यांनी अभियांत्रिकीचा मार्ग न निवडता, बी.एस्सी., एम.एस्सी. या पदव्या उच्च श्रेणीत संपादन केल्या. प्रा.उदगावकरांनी १९४९ सालापासून जवळजवळ ४० वर्षे मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्येच संशोधन व अध्यापन केले.

     आपल्या संशोधन कारकिर्दीच्या सुरुवातीस डॉ. होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली जरी त्यांनी मूलभूत कणांच्या गुणधर्मासंबंधीचा अभ्यास सुरू केला तरी लवकरच, त्या काळी नव्याने उदयास येणार्‍या अणुऊर्जेच्या संदर्भातील भारतातील विकास व संशोधनकार्याकडे ते आकर्षित झाले. १९५३-५५ दरम्यान फ्रान्समधील सॅक्ले येथील अणुशक्ती केंद्रात, तत्कालीन आघाडीच्या विचारांसंबंधीचे प्रशिक्षण घेऊन भारतात परतल्यावर उदगावकरांनी अणुभट्ट्यांतील विविध आण्विक प्रक्रियांच्या सैद्धान्तिक अभ्यास करणाऱ्या वेगळ्या गटाची, भारतीय अणुसंशोधन विभागात पायाभरणी केली. त्या अंतर्गत अतिउच्च स्तरावरील ऊर्जेसंबंधीच्या सैद्धान्तिक-भौतिकीच्या अभ्यासाकडे ते १९६० साली वळले. अमेरिकेत १९६०-६२ सालांदरम्यान बर्कले, १९६२ साली प्रिन्स्टन व १९६३ साली आरगॉन राष्ट्रीय प्रयोगशाळेत त्यासंबंधीचे काम करून भारतात परतल्यावर टाटा संस्थेमध्ये सैद्धान्तिक-भौतिकी विभाग प्रमुख म्हणून कामास लागले. अण्वस्त्रस्पर्धा काबूत ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी स्थापिलेल्या या चळवळीच्या कामाला १९९५ साली शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. पगवॉश चळवळीच्या कार्यात ते सक्रिय होते.

     सैद्धान्तिक-भौतिकी  हा जरी त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय असला, तरी त्यावर आधारित प्रायोगिक कार्यात ते रस घेत. टी.आय.एफ.आर.मधील सैद्धान्तिक-भौतिकीचा वेगळा विभाग सुरू होण्याआधी उदगावकर तुर्भे येथील अणुशक्ती विभागाच्या ‘रिअ‍ॅक्टर फिजिक्स ग्रुप’मध्ये कार्यरत होते. त्यांच्या शिफारसपत्रामुळे अनेक तरुण शास्त्रज्ञांना, तसेच विद्यापीठातील शिक्षकांना, कॅलिफोर्नियातील लॉरेन्स बर्कले प्रयोगशाळेसारख्या नामांकित संस्थांमधून प्रायोगिक विज्ञानाचे धडे गिरवता आले. १९८३ साली टी.आय.एफ.आर. व बी.ए.आर.सी.तील शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे ‘मेहिया’ नावाच्या एका प्रवेगयंत्राच्या उभारणीचे कार्य जेव्हा हाती घेतले, त्या वेळी तो प्रकल्प जागतिक दर्जाचा व्हावा, यासाठी उदगावकर संबंधित ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी सतत संपर्क साधून असत.

     उदगावकरांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. १९७१ साली भौतिकीच्या विविध शैक्षणिक अंगांच्या परिणामकारक विकासासाठी स्थापन झालेल्या इंडियन फिजिक्स असोसिएशनचे ते पहिली दोन वर्षे संस्थापक अध्यक्ष होते तसेच असोसिएशनने नव्याने सुरू केलेल्या ‘फिजिक्स न्यूज’ या त्रैमासिकाचे संपादक होते. ठरावीक पाठ्यक्रमानुसार शास्त्रीय विषय विद्यार्थ्यांच्या गळी उतरवून त्यांच्या परीक्षा घेण्यात सदैव गुंतलेले विद्यापीठातील प्राध्यापक व टी.आय.एफ.आर.सारख्या प्रगत संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ, यांनी समन्वयाने चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय शाखांमधील आधुनिक विचारांबद्दल कुतूहल निर्माण करणे किती अगत्याचे आहे, याची आत्यंतिक जाण त्यांना सदैव असते.

     सैद्धान्तिक-भौतिकशास्त्र, सापेक्षता सिद्धान्त, क्वांटम भौतिकी अशा प्रगत विज्ञानाच्या शाखांचे परिणामकारक उच्च शिक्षण देण्यास विद्यापीठीय अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्तरावर काही मूलभूत बदल करण्यासाठी त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळामार्फत जागृती कार्यक्रम हाती घेतले. परिणामी, १९७३-७९ सालांदरम्यान त्यांना विद्यापीठ अनुदान मंडळाचे सदस्यत्वच देण्यात आले. १९७७-७९ या काळात त्यांनी भारतीय नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षांचे विशेष सल्लागार म्हण्ाूनही काम केले. १९८० ते १९८६ अशी सहा वर्षे उदगावकर भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषदेचेही सदस्य होते. ठिकठिकाणच्या विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे प्रभावी शिक्षकांच्या अभावी, शिक्षणाच्या गुणवत्तेत घट होणे स्वाभाविक असते. त्यावर परिणामकारक तोडगा म्हणून फक्त अभ्यासक्रमातील सुधारणांच्याच मागे न लागता, कर्तबगार शिक्षकांची निकड भागवायला प्राध्यापकांना संशोधनासाठी विशेष अनुदान मिळावे म्हणून तरतुदींसाठी ते आग्रही बनले. १९७९-८६ या काळात भारतातील ठिकठिकाणच्या विद्यापीठातील प्राध्यापकांना, आण्विक विज्ञानासंबंधीच्या संशोधनासाठी भारत सरकारच्या अणुशक्ती विभागांतर्गत अनुदान देणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली.

     दहा वर्षांपूर्वी महाविद्यालयीन शिक्षणासाठी वयाने पात्र असलेल्या तरुणांचे प्रमाण भारतात फक्त सहा टक्के होते. त्यात अजूनही फारसा बदल झालेला नाही. या परिस्थितीचा दरडोई उत्पन्नाशी कितपत संबंध असू शकतो याचा तपास त्यांनी सुरू केला. राष्ट्रीय प्रगतीनुसार जागतिक स्तरावर ज्ञानसंचयाची वाढ जर दुप्पट व्हायला हवी असेल, तर ज्ञान आणि तंत्रज्ञान या बाबतींतही भारतातील मनुष्यबळ अद्ययावत करण्याची निकड उदगावकरांनी हेरली. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने आपण देत असलेल्या शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्यात कुठलीही तडजोड न स्वीकारण्याची जबाबदारी स्वत:वरच घेतली तर पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रम नुसते शिकवण्याऐवजी, त्यांतील मूलतत्त्वे ओळखायला व ती समजून घ्यायला मार्गदर्शन करणारे जबाबदार शिक्षक निर्माण होण्यास फार मोठी चालना मिळेल, असे त्यांना मनोमन वाटते.

     पदव्युत्तर विभागांना आवश्यक ती स्वायत्तता हा विषय दुर्दैवाने मुंबई विद्यापीठात अजूनही फक्त चर्चेचीच बाब राहते. याबद्दल प्रा.उदगावकर वारंवार खंत व्यक्त करतात. याखेरीज, निर्णयांच्या विद्यापीठीय स्तरावरील अंमलबजावणीस लागणारा प्रशासकीय विलंब, प्रयोगशील महाविद्यालयांच्या गुणवत्तावर्धनाच्या कामात मोठा अडसर बनतो. आय.आय.टी., इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ इत्यादी केंद्रशासित संस्थांचा दर्जा, राज्यशासित शिक्षणसंस्थांपेक्षा सरस असण्यामागचे कारण, त्यांना मिळणारी स्वायत्तता व पुरेसे आर्थिक बळ यांचा संयुक्त परिणाम असे ते मानतात.

     आण्विक रसायनशास्त्र, औद्योगिक रासायनिक चाचणी अशा विशिष्ट विषयांसाठीच्या प्रयोगशाळा स्थापन करायला, तिथे तज्ज्ञ प्राध्यापकांसाठी खास अध्यासने निर्माण करण्यासाठी उद्योगांकडून मोलाची मदत मिळू शकते, हे काही शिक्षणसंस्थांनी समर्थपणे सिद्ध  केल्याचा आनंद उदगावकर नि:संकोचपणे व्यक्त करतात. प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी, किंबहुना एकूणच राष्ट्रीय प्रगतीसाठी केलेली गुंतवणूक म्हणून उच्च शिक्षणाच्या अनुदानाकडे आपण पाहिले पाहिजे, असे ते ठासून सांगतात. खरे तर, राष्ट्रीय प्रगतीसाठी विज्ञान व वैज्ञानिक यांचा पुरेसा उपयोग करण्याच्या आवश्यकतेचीच भारतात होत असलेली उपेक्षा त्यांना सतत अस्वस्थ करते.

     पायाभूत शैक्षणिक सुधारणा शालेय स्तरापासूनच करणे अगत्याचे आहे हे जाणून, १९७२ साली त्यांच्या प्रेरणेने, मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथेही शिक्षकांसाठी विज्ञान शिक्षणाचा एक अनोखा कार्यक्रम हाती घेण्यात आला. विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शालेय शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देणारे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीने, १९७४ साली मुंबईत स्थापन करण्यात उदगावकरांनी पुढाकार घेतला. या केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. १९७५ ते १९९१ दरम्यान त्यांच्या कार्यकाळात १९८१ सालापासून या केंद्राला भारत सरकारच्या अणुशक्ती विभागांतर्गत अर्थसाहाय्यही मिळू लागल्यावर, ते केंद्र टी.आय.एफ.आर.चा एक भाग म्हणून कार्यरत झाले. मुंबईतील अणुशक्ती विभागाच्या शैक्षणिक संस्थेचे उदगावकर १९८८-९० साली अध्यक्ष होते. मुंबई विद्यापीठाच्या पश्चिम क्षेत्रीय उपकरण विकास देखभाल केंद्राच्या निर्मितीच्या प्रक्रियेलाही उदगावकरांचे मोलाचे साहाय्य लाभले.

     वैज्ञानिक संकल्पना सर्वसामान्यांना सहज समजाव्यात यासाठी प्रा. उदगावकरांनी सुबोध मराठीतून अनेक व्याख्याने दिली, वर्तमानपत्रातून लेख लिहिले, तसेच चर्चासत्रात भाग घेऊन तरुणांना मार्गदर्शन केले. मराठी विज्ञान परिषद या संस्थेचे ते १९८२-९१ अशी नऊ वर्षे अध्यक्ष होते. १९८५ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८७ साली ‘भारत जन विज्ञान जथ्था’ या नावाने एक देशव्यापी उपक्रम राबविण्यात आला, त्याच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे ते अध्यक्ष होते.

     वेळोवेळी विविध पातळ्यांवर जनमानसात विज्ञान प्रसाराच्या निमित्ताने ज्या अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आला, तेथे काम करणारे सर्व कार्यकर्ते नियोजित वेळेत ध्येय साध्य होण्यासाठी एकत्रितपणे कसे काम करतील, यासाठी ते नेहमी आस्थेने मार्गदर्शन करतात. मानवी जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी, मूलभूत वैज्ञानिक संशोधनाद्वारे जी नित्यनवी तंत्रे विकसित होत असतात, त्यांची माहिती जनसामान्यांना करून द्यायलाच हवी, यावर त्यांची अढळ निष्ठा आहे.

- डॉ. अच्युत थत्ते 

उदगावकर, भालचंद्र माधव