Skip to main content
x

उजळंबकर, कृष्ण मुकुंद

कृष्ण मुकुंद उजळंबकर मूळचे मराठवाड्यातील पण नोकरीनिमित्त त्यांचे वास्तव्य नागपुरात होते. एम.ए., एलएल. बी., एम. लीब. असलेले उजळंबकर यांनी सुरुवातीला निजाम कॉलेज व केंद्रीय सचिवालय, हैद्राबाद येथे ग्रंथपाल म्हणून काम केले. नंतर मुंबईतील सचिवालय ग्रंथालयात विशेष अधिकारी व नंतर केंद्रीय ग्रंथालय, नागपूर येथे मुख्य ग्रंथपाल म्हणून काम केले. ग्रंथ व ग्रंथालयाविषयीच्या आस्थेमुळे महाराष्ट्रातील व भारतातील ग्रंथालय चळवळीत सहभागी होऊन त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांचे ग्रंथालयविषयक लेखन हे त्या विषयाच्या त्यांच्या सखोल अभ्यासाचे व प्रत्यक्ष अनुभवाचे फलित आहे. तसेच ते वाङ्मयप्रेमी अभ्यासक व अंतःस्फूर्तीने लेखन करणारे ललित लेखकही आहेत. ‘नवोन्मेष’ (१९४६) ही आझाद हिंद सेनेच्या पार्श्वभूमीवरची त्यांची पहिली कादंबरी होय. त्यानंतरच्या काळात त्यांनी आठ-नऊ कादंबर्‍या लिहिल्या. ‘अभय’, ‘सखूचा संसार’ या त्यांच्या आरंभीच्या कादंबर्‍या आहेत.

‘अभय’ ही किशोरांच्या जीवनावर आधारलेली संस्कारक्षम कादंबरी तर ‘धूर’ (१९८२) ही सामाजिक वास्तववादी कादंबरी लिहिली. ‘धोंडी’ ही दलित जीवनावर आधारित कादंबरी तर ‘मायेचे कढ’ ही कौटुंबिक वळणाची कादंबरी त्यांनी लिहिली. याशिवाय ‘जयप्रकाश नारायण’ हे चरित्र, ‘रक्तिमा’ हा काव्यसंग्रह व ‘त्रिवेणी’ हा एकांकिका संग्रह हे सारे प्रसिद्ध झाले आहे. ‘आम्ही असे लढलो’ (१९५९) व ‘आम्ही लढाई जिंकली’ (१९६०) या स्वातंत्र्य-लढ्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या दोन राजकीय कादंबर्‍यांमुळे उजळंबकरांना कादंबरीकार म्हणून लौकिक प्राप्त झाला. या कादंबर्‍यांतून अनुक्रमे विदर्भातील व मराठवाड्यातील स्वातंत्र्य-लढ्याचा रोमहर्षक इतिहास परिणामकारकतेने त्यांनी चित्रित केला आहे. महाभारताच्या पौराणिक पार्श्वभूमीवर लिहिलेली ‘पाचामुखी परमेश्वर’ ही कादंबरी पूर्वार्ध (१९७७), उत्तरार्ध (१९७८) अशा दोन भागांत प्रकाशित करण्यात आली.

एकूणच त्यांचे कादंबरी लेखन ध्येयप्रधान आहे; राजकारणाला दिलेल्या ऐतिहासिक बैठकीमुळे उजळंबकरांची कादंबरी ही समकालीन राजकीय कादंबरीहून वेगळी दिसते.

त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रतिवर्षीसंशोधनात्मक लेखनासाठी  मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार दिला जातो. 

- प्रा. मंगला गोखले

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].