Skip to main content
x

वाघुळकर, एस. व्ही.

            जाहिरात क्षेत्राच्या सुरुवातीच्या काळातील प्रभावी चित्रकार आणि संकल्पनकार एस.व्ही. वाघुळकर यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून रेखा आणि रंगचित्रकलेमध्ये (ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंग) १९४४ मध्ये पदविका प्राप्त केली. उपयोजित कला (कमर्शिअल आर्ट) व मॉडेलिंगचा अभ्यासक्रमही त्यांनी याच काळात पूर्ण केला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात त्यांनी लष्करात भरती होऊन चित्रकाराचे काम केले. जाहिरातकलेतील विविध विभागांचा, प्रदर्शन मांडणीचा अनुभव त्यांना या काळात मिळाला. त्यांनी १९४५ मध्ये इन्फर्मेशन फिल्म्स ऑफ इंडियाया माहितीपट निर्माण करणार्‍या संस्थेत,

कार्टून विभागात नोकरी पत्करली. ते १९५० मध्ये जे. वॉल्टर थॉम्प्सन या प्रख्यात जाहिरातसंस्थेत कलादिग्दर्शक (आर्ट डायरेक्टर) म्हणून रुजू झाले. कला व जाहिरातकला प्रदर्शनांमध्ये त्यांना अनेक पारितोषिके मिळाली.

वाघुळकर ज्या काळात कलादिग्दर्शक म्हणून काम करू लागले, तो जाहिरात क्षेत्राच्या जडणघडणीचा काळ होता. देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि तेलकंपन्या, विमानसेवा, गृहोपयोगी वस्तू असे मोजकेच जाहिरातदार होते. जाहिरातसंस्थांमधील विविध व्यवस्थापन विभागांचा विस्तार नुकता कुठे होऊ लागला होता. त्यामुळे जाहिरातीच्या निर्मितीत एकच व्यक्ती कलादिग्दर्शक, संकल्पनकार आणि चित्रकार अशा विविध भूमिका पार पाडी. वाघुळकर स्वत: उत्तम चित्रकार होते, संकल्पनकार होते आणि कलादिग्दर्शकही होते. त्यामुळे त्यांनी बर्‍याच जाहिराती अशा एकहाती केलेल्या आहेत.

वाघुळकरांनी आपल्या कामाची एक शैली निर्माण केली आणि त्याचा प्रभाव पुढे काही काळ जाहिरात संकल्पन आणि चित्रांकनावर  राहिला. रेखांकनापासून ते जाहिरातमोहिमांच्या संकल्पनापर्यंत  विविध पातळ्यांवर काम करण्याची सर्जकता त्यांच्यापाशी होती.

फिलिप्सकंपनीसाठी केलेली वृत्तपत्र-जाहिरातींची मोहीम, ‘एअर इंडियाची केलेली भित्तिपत्रके (पोस्टर्स) आणि जाहिराती अशी पन्नास आणि साठच्या दशकातील त्यांची कामे पाहिली की काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्यांच्या रेखांकनातील रेषा ठाशीव आणि ठळक असते. त्यांच्या चित्रांमधील नैसर्गिक घटक, मग ती माणसे असोत वा मासे, कमीतकमी तपशील वापरून काढलेली असतात. या घटकांची मांडणी भौमितिक आणि थोडी आलंकारिक पद्धतीने केलेली असते. आणि ही रचना जाड, काळ्या अथवा विरोधी रंगांनी (कॉन्ट्रास्टिंग कलर्स) बंदिस्त केलेली असते. चित्रातील रंग सपाट (फ्लॅट कलर्स) असतात. त्रिमितीचा आभास निर्माण करण्यासाठी गडद रंग अथवा ड्राय ब्रशचा वापर केलेला असतो. वृत्तपत्र जाहिरातीसाठी केलेली चित्रे, मग ती स्क्रेपर बोर्डवर केलेली असोत अथवा काळ्या शाईने, अशीच ठाशीव असतात. ही चित्रे त्या वेळच्या लिथो अथवा ऑफसेट मुद्रणपद्धतीला योग्य अशीच होती.

वाघुळकर यांच्या जाहिरात संकल्पन आणि मांडणीत एक प्रकारचा थेटपणा होता. त्या काळातल्या जाहिरातींचे ते वैशिष्ट्य होते. वाघुळकरांनी केलेल्या एअर इंडियाच्या भित्तिपत्रकांवर अभिजात चित्रकलेचा फाइन आर्ट प्रभाव दिसतो. हेदेखील त्या काळाशी सुसंगतच म्हणावे लागेल. अभिजात चित्रकला आणि जाहिरातकला या एकमेकांना पूरक आणि परस्परांवर प्रभाव टाकणार्‍या कला आहेत. वाघुळकरांच्या काळात अभिजात चित्रकलेतील मांडणीच्या संकेतांचा प्रभाव जाहिरातकलेवर अधिक होता. नंतर तो कमी झाला. १९३० ते १९५० या काळात कलकत्ता (कोलकाता) येथील जाहिरातसंस्थांचा प्रभाव अधिक होता. पण १९५० च्या दशकानंतर मुंबई हे जाहिरातकलेचे प्रभावी केंद्र बनले ते वाघुळकरांसारख्या संकल्पनकार आणि कलादिग्दर्शकांमुळे.

एस.व्ही. वाघुळकरांना १९८१ साली कॅगअर्थात कमर्शिअल आर्टिस्ट्स गिल्डतर्फे दिला जाणारा हॉल ऑफ फेमपुरस्कार मिळाला. जाहिरात क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान देणार्‍या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

 - रंजन जोशी, दीपक घारे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].