Skip to main content
x

वैद्य, पुरुषोत्तम रामचंद्र

      पुरुषोत्तम रामचंद्र वैद्य तथा बाबा वैद्य यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नरच्या प्राथमिक शाळेत झाले. इंग्रजी पहिली ते चौथीचे शिक्षण सिन्नरच्या न्यू इंग्लिश स्कूल म्हणजेच आजच्या ब. ना. सारडा विद्यालयात झाले. मॅट्रिक झाल्यावर १९४२ मध्ये बांद्रयांच्या प्रशिक्षण संस्थेमधून त्यांनी डिप्लोमा इन लेदर टेक्नॉलॉजीचा कोर्स पूर्ण केला व मिल लेदर इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्ष सह व्यवस्थापक म्हणून नोकरी केली. रुईया महाविद्यालयामधून त्यांनी एम. ए. ची पदवी घेतली. महाविद्यालयात शिकत असताना प्रा. गोवर्धनदास पारिख व प्रा. न. र. फाटक यांचा फार मोठा परिणाम त्यांच्यावर झाला. अर्थशास्त्र व इतिहासाच्या अभ्यासाची प्रेरणा त्यांना मिळाली.

      १९४८ ते १९५३ या काळात दैनिक नवाकाळचे सहसंपादक म्हणून ते काम पाहू लागले. पण स्वतंत्र लिहिण्यास वाव नाही व इंग्रजी शब्दांचे भाषांतर करण्यात रस नाही म्हणून त्यांनी ही नोकरी सोडली व ते नाशिकला आले. नाशिकच्या पेठे विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. नोकरीत असतानाच त्यांनी कांदिवलीच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून डी. पी. एड्. व मुंबईच्या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातून बी. टी. पदवी मिळविली. पत्रकार व समाजसेवक नवरे यांनी सांगितले म्हणून ते ‘श्रद्धानंद अनाथ महिलाश्रमा’त जात असत. त्यावेळी अनाथ स्त्रिया व मुले यांच्या समस्या त्यांना जाणता आल्या. या अनुभवाचा फायदा नाशिकमध्ये १९५४ मध्ये अनाथ महिलाश्रमाची स्थापना करताना झाला. हल्ली ही संस्था ‘आधाराश्रम’ म्हणून कार्य करीत आहे. पहिली वीस वर्षे वैद्यांनी या संस्थेचे कार्यवाह म्हणून काम पाहिले. ते शारीरिक शिक्षणाचे शिक्षक होते. १९५४ ते १९६४ या काळात महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवात पंच म्हणून, संघांचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी स्वत:च्या कार्याचा ठसा उमटविला. भारत सेवक समाज, गेम्स अँड अ‍ॅथलेटिक असोसिएशन, साने गुरुजी कथामाला,  शिक्षक गौरव समिती अशा संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभले व लाभत आहे.

      मराठी, इतिहास, भूगोल या विषयांचे वैद्य उत्तम अध्यापक होते. सर्वच शाळांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने राबविले. मॅरेथॉन शर्यत, सूर्यनमस्कार यासारख्या उपक्रमातून शारीरिक व मानसिकदृष्ट्या विद्यार्थी सशक्त व्हावेत हा हेतू होता. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह असताना त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचा सुवर्ण महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला.

      १९५९ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक माध्यमिक शिक्षक संघाची स्थापना झाली. तेव्हापासून आठ वर्षे ते संघाचे कार्यवाह होते. या काळात शिक्षकांसाठी उद्बोधन चर्चासत्रे, विद्यार्थ्यांसाठी एस.एस.सी. व्याख्यानमाला या बरोबरच शिक्षकांच्या हक्कांसाठी, मागण्यांसाठी उपोषण, मोर्चे, संप यांचेही नेतृत्व त्यांनी केले.

       १९८१ मध्ये सी.डी.ओ. मेरी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून वैद्य निवृत्त झाले. पण अजूनही त्यांचे काम चालू आहे. १९८१ पर्यंत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध माध्यमिक शाळांतून ते अध्यापक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

      सेवेत असताना आणि नंतरही आदिवासी कल्याणासाठी शरीरशास्त्र, आयुर्वेद यांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचा उपयोग उपचारातही ते करीत असतात. योगोपचार वर्गातही अनेक वर्षे त्यांची रुग्णसेवा चालू आहे.

- प्रा. सुहासिनी पटेल

वैद्य, पुरुषोत्तम रामचंद्र