विजापूरकर, विष्णू गोविंद
विष्णू गोविंद विजापूरकर ह्यांचा जन्म कोल्हापुरात झाला. वडिलांच्या बदल्यांमुळे वेगवेगळ्या गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मॅट्रिक झाल्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून ते बी.ए. झाले. तेथे महामहोपाध्याय डॉ. रा. गो. भांडारकर त्यांचे गुरू होते. बी.ए. परीक्षेत सेकंड क्लास मिळाल्याने डेक्कन कॉलेजमध्ये दोन वर्षे दक्षिणा फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्राध्यापक म्हणून काम केले. नोकरी करीत असतानाच ते एम.ए. झाले. दोनच वर्षांनी एम.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ऋग्वेद, ऋक संग्रह प्रकाशित केला.
विजापूरकरांना सर्वजण‘अण्णा’ म्हणत. लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून १८९४ मध्ये त्यांनी कोल्हापुरात ‘ग्रंथमाला’ हे नियतकालिक सुरू केले. स्वधर्म, स्वदेश व स्वभाषा या सर्वांना जगात मान मिळावा या हेतूने त्यांनी ‘ग्रंथमाला’ चालविले. त्यांनी १८९८ मध्ये ‘समर्थ’ साप्ताहिक काढले व दहा वर्षे ते चालविले. पंधरा वर्षे कोल्हापूर सरकारची इमानाने सेवा केली. पण सरकारने ‘तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांवरील वजनाचा उपयोग यथायोग्य रीतीने करीत नाही’ असा ठपका अण्णांवर ठेवला व त्यांची नोकरी संपली.
१९०५ च्या राष्ट्रीय अधिवेशनास अण्णा उपस्थित होते. त्या अधिवेशनात राष्ट्रीय शिक्षणाचा ठराव पास झाला. १ जून १९०६ रोजी अण्णांनी कोल्हापूरमध्ये ‘समर्थ विद्यालयाची’ स्थापना केली. ऑगस्ट १९०६ मध्येच हे विद्यालय त्यांनी ‘महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळा’च्या स्वाधीन केले. मंडळाच्या उद्देशपत्रिकेवर दाजी आबाजी खरे, चिंतामण विनायक वैद्य, मोरेश्वर गोपाळ देशमुख, बाळ गंगाधर टिळक व विष्णू गोविंद विजापूरकर ह्यांच्या सह्या होत्या. समर्थ विद्यालयासाठी अनेक ठिकाणी दौरे काढून अण्णांनी निधी जमा केला. हे विद्यालय चौदा महिने चालले. त्यानंतर कोल्हापुरात प्लेगची साथ आली.
त्यानंतरच्या काळात तळेगावला शाळा स्थलांतरित केली. तेहतीस विद्यार्थ्यांनिशी सुरू केलेल्या ह्या विद्यालयात चवथ्या वर्षी दीडशे विद्यार्थी होते. शिक्षक अल्प वेतनात काम करीत. लोकांचा प्रतिसाद उत्तम होता. शाळा तपासनीसांचे शेरे समाधानकारक व उत्तेजन देणारे होते. पण गव्हर्नर क्लार्क ह्यांनी ‘राजद्रोहास व खुनास’ उत्तेजन देणारे म्हणून आरोप ठेवून प्रो. वा. म. जोशी, विनायकराव जोशी यांच्याबरोबर अण्णांना तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. १८ डिसेंबर १९११ रोजी अण्णांची अहमदाबादच्या तुरुंगातून सुटका झाली. पण त्यापूर्वीच १० जून १९१० रोजी सरकारने ‘समर्थ विद्यालय’ बेकायदा म्हणून जाहीर केले. सरकारला पत्रे देऊनही उपयोग झाला नाही. विद्यालय कायमचे बंद झाले.
अण्णा दिनकरशास्त्री कानडे यांच्याबरोबर दोन महिने महाराष्ट्राबाहेर हिंडून आले. प्रवासात त्यांनी काशीचे ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’, संस्कृत पाठशाळा, हरिद्वारचे गुरुकुले व ऋषिकुले पाहिली. ती कशी चालवली जातात ह्याची माहिती करून घेतली. परत आल्यावर पुन्हा एकदा सरकारला पत्र पाठवून आपले म्हणणे मांडले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
अण्णांनी सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची चळवळ सुरू केली. ना. गोखले ह्यांच्या शिक्षणविषयक बिलावरील भाषणाच्या शेकडो प्रती मराठीत स्वखर्चाने छापून लोकांना वाटल्या. शैक्षणिक कामं सुरू ठेवण्यासाठी वृत्तपत्रातून मदतीचे आवाहन केले. विद्यालयासंदर्भात गव्हर्नरची मुलाखत मागितली. पण त्यांना नकार मिळाला.
मात्र नंतर २५ ऑक्टोबर १९१८ रोजी सरकारने तळेगाव दाभाडे येथील प्रस्तावित विद्यालयास मान्यता दिली. १३ जानेवारी १९१९ रोजी विद्यालयाचा शुभारंभ झाला. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या संयमी, नि:स्वार्थी, निगर्वी अण्णांनी काम करावयास सुरुवात केली. १९२९ पर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी औद्योगिक शिक्षणाची सोय केली. शिक्षक व उपकरणे त्यांची जुळवाजुळव करून शेती, विणकाम, सुतारी, शिवणकाम, वेतकाम, पुस्तकबांधणी, मातीची चित्रे, मूर्ती तयार करणे, साबण-रंग-तेल तयार करणे या व्यवसायांची शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून देणग्या मिळविल्या. मोठ्या संघर्षानंतर सुरू केलेले समर्थ विद्यालय उत्तम प्रकारे चालू लागले.