Skip to main content
x

वनारसे, तारा

निष्णात स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ.तारा वनारसे यांचा जन्म पुणे येथे एका सुसंस्कृत, मध्यमवर्गीय, सुखवस्तू कुटुंबात झाला. सुरुवातीपासूनचे सर्व शिक्षण पुण्यात झाले व बी.जे.मेडिकल महाविद्या-लयातून वैद्यकीय पदवी मिळविली. लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आब्टेट्रिक्स अ‍ॅन्ड गायनाकॉलाजीची फेलोशिप त्यांना मिळाली.

१९५८पासून लंडनमध्ये वास्तव्य केले. पुढे तेथील बेनेडिक्ट रिचर्डस या इंग्रज डॉक्टराशी विवाह करून त्या तेथेच स्थायिक झाल्या. साहित्य, संगीत, नाटक यांची आवड व त्यातून लेखन केले. त्यांचा पश्चिमकडाहा पहिला कथासंग्रह १९६३मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर केवल कांचनहा अलीकडचा संग्रह २००७मध्ये प्रसिद्ध झाला. या दोन्ही संग्रहांतून मानवी नातेसंबंध-विशेषतः पति-पत्नी, प्रियकर-प्रेयसी यांच्यावर प्रकाश पडतो. त्यांच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी स्त्री अनेक सूखवस्तू पुरुष आयुष्यात येऊनही स्त्रीला क्वचितच प्रेमसाफल्य लाभते. मनुष्य स्वभावातील ज्ञान-अज्ञान अशा अनेक कंगोर्‍यांचे दर्शन सूचकपणे घडविण्याचा लेखिकेचा प्रयत्न जाणवतो.

केवल कांचनमध्ये (२००७) आठ कथा असून केवल कांचनही दीर्घकथा आहे. या आठही कथा काहीशा गूढतेकडे झुकतात. केवल कांचनकथेतील केवल कर्णिक हे संस्कृतचे प्राध्यापक असून कांचन ही त्यांची विद्यार्थिनी त्यांच्या एका चिठ्ठीने तिच्या मनातील आदराचे रूपांतर प्रेमात होते, पण पुढे काही घडत नाही. ते आपले अयशस्वी लग्न पुढे ढकलत राहतात व ती दोन पुरुष आयुष्यात येऊनही त्यांची वाट पाहत राहते. केवल यांचे निधन झाल्याचा फोन ती झोपेत असताना घेते. मात्र शेवटपर्यंत ते खरेच वारले की तो भास होता असा संभ्रम वाचकांच्या मनात कायम राहतो. शेवटी ऑलिव्हर या मित्राशी ती लग्न करते. सूचकता, संभ्रम, भास, अतृप्तता, श्रीमंतीतही सुखाच्या अभावाचा सल, अशी त्यांच्या कथालेखनाची काही वैशिष्ट्ये जाणवतात. नर्सेस क्वॉर्टर्स’ (एकांकिका), ‘सूर’ (कादंबरी) आणि बारा वादावर घर’ (कविता) ही आपली मोजकीच निर्मिती त्यांनी १९५४ ते २००० या प्रदीर्घ काळात केली असून ती वाचकांचे लक्ष वेधून घेते.

रामायणातील शूर्पणखेच्या जीवनाची शोकांतिका व्यक्त करणारी श्यामिती’ (२०००) ही कादंबरी त्यांची महत्त्वाची कलाकृती आहे. रामाच्या सांगण्यावरून लक्ष्मणाने तिला विद्रूप केल्याची त्रोटक कहाणी रामायणात येते. पण लेखिकेने रावणाच्या या बहिणीच्या प्रेमकहाणीला एक उदात्त रूप देऊन आर्य-अनार्य संघर्षाला एक वेगळा अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे व एका मिथकाची पुनर्निमिती केली आहे. शूर्पणखा जर आर्य, असती तर तिची अशी विटंबना झाली असती का आणि रामावर प्रेम करणे हा तिचा गुन्हा होता काय असे प्रश्न आजच्या स्त्री-मुक्ती चळवळीच्या संदर्भात विचारून लेखिकेने शूर्पणखा प्रकरणाला एक वेगळा अन्वयार्थ देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या कादंबरीत तत्कालीन वातावरण, भौगोलिक तपशील, निसर्गाची विविध रूपे, भाषा या पार्श्वभूमीवर राम, सीता, लक्ष्मण, शूर्पणखा, अगस्ती व अन्य ऋषी व त्यांच्या बायका आणि विशेषतः अर्धा आर्य व अर्धा अनार्य असलेल्या अर्यमा यांची व्यक्तिमत्त्वे लेखिकेने जिवंत केली आहेत. अर्यमा लिहिणार असलेल्या रामायणाची नव्हे तर रावणायणया महाकाव्याची व तेही अनार्यांच्या भाषेतील महाकाव्य; यातून पुढील काळातील इतिहासाची दिशा सूचित होते. शूर्पणखेच्या उदात्तीकरणाचे रंग काहीसे भडक वाटले, तरी त्या मिथकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावणारी श्यामितीही कादंबरी वनारसे यांच्या लेखनातला एक महत्त्वाचा टप्पा ठरते.

- डॉ. प्रल्हाद वडेर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].