Skip to main content
x

वर्तक, ताराबाई नरसिंह

      ताराबाई या नावाने सर्वत्र ओळखल्या जाणार्‍या ताराबाई नरसिंह वर्तक यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातल्या बोर्डी या नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या गावी झाला. त्यांचे वडील आत्मारामपंत सावे व मातोश्री रमाबाई होत.

      ताराबाईंचे शालेय शिक्षण बोर्डीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयामध्ये झाले. आचार्य भिसे गुरुजी, चित्रे गुरुजी व आत्मारामपंत सावे या ध्येयवादी, स्वदेशप्रेमी मंडळीने राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या उद्देशाने स्थापन केलेली व चालवलेली ही शाळा होती. विद्यार्थीदशेतच अभ्यास, खेळ व वक्तृत्व स्पर्धा या सर्वच क्षेत्रात पारितोषिके मिळवून त्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास केला. या काळातच ताराबाईंनी स्वातंत्र्य संग्रामात पत्रके घरोघरी वाटून अप्रत्यक्षपणे मदत केली.

       १९४४ मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचा विवाह निष्ठावंत गांधीवादी व थोर स्वातंत्र्य सैनिक अण्णासाहेब वर्तक यांचे सुपुत्र नरसिंह उर्फ भाईसाहेब यांच्याशी झाल्यामुळे शिक्षण तात्पुरते खंडित झाले. दुर्दैवाने त्यांचे पती नरसिंहराव असाध्य रोगाने ग्रस्त आले व ताराबाईंनी अत्यंत निष्ठेने श्रद्धेने व सातत्याने त्यांची शुश्रुषा केली. त्यांची कार्यकुशलता पाहून पद्मभूषण शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांनी या खऱ्या काम करणाऱ्या म्हणून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. कन्या, गृहिणी व माता या महिलेच्या जीवनातील सर्व भूमिका ताराबाईंनी चोख बजावल्या व त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी केली.

        त्यांनी महिला विद्यापीठाची बी.ए. पदवी मिळवली. ताराबाईनी विरार येथे पहिले महिला मंडळ स्थापन करून महिला जागृतीच्या कार्याचा शुभारंभ केला. १९५५ मध्ये त्यांनी विरार येथे शिशुविहार स्थापन करून बालवाडीचे कार्य प्रारंभ केले. महिला मंडळाच्या कार्याचा विस्तार चालूच होता. त्यांचे प्रोत्साहक व मार्गदर्शक दीर भाऊसाहेब वर्तक यांनी वसई येथेे तीन महाविद्यालयांची स्थापना करुन उच्च शिक्षणाची सोय १९७१ मध्ये केली होती. त्यांनीच उच्च तांत्रिक शिक्षणाची योजना आखली व ताराबाईंच्या अथक परिश्रमाने तंत्रनिकेतनची योजना सिद्धीस नेली. डहाणू ते बोरिवली या परिसरात अशा प्रकारची संस्था नव्हत्या. भाऊसाहेब वर्तकांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या शिक्षणसंस्था आगाशी - विरार- अर्नाळा या क्षेत्रात आहेत. उच्च तांत्रिक शिक्षणाच्या सोयीमुळे मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये तंत्रज्ञांच्या नोकऱ्या मिळणे सुलभ झाले. ताराबाईंचे हे कार्य चिरस्थायी स्वरूपाचे आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याविषयी ताराबाई सतत दक्ष असत. १९५६ मध्ये वर्षभर त्यानी कै. अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिरात विनावेतन अध्यापनाचे कार्य केले होते. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीकडे ताराबाईंचे कटाक्षाने लक्ष असे.

        ग्रामीण व आदिवासी महिलांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वनिता विहार मंडळाची स्थापना केली. ग्रामपंचायत ते जिल्हापरिषदेचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. समाजकल्याण करणाऱ्या अनेक संस्थांच्या त्या आश्रयदात्या, अध्यक्षा, उपाध्यक्षा, चिटणीस अशा जबाबदारीच्या पदी राहून कार्यरत होत्या. महिलावर्षात त्यांच्या अध्यक्षतेखाली कोसबाड येथे झालेल्या भव्य मेळाव्यात आसपासच्या पाच मैलांच्या परिसरातून सुमारे दोन हजार महिला उपस्थित होत्या. राज्यमंत्री असताना त्यांच्या कारकीर्दीत महिला व बालकल्याणाच्या अनेक कामांना वेग आला. याचे बोलके उदाहरण म्हणजे डहाणूला आज डौलाने उभे असलेले मूक बधिर बालविकास केंद्र होय.

       कुटुंब नियोजनाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ताराबाईंना महाराष्ट्र शासनाने १९७३ मध्ये व १९७५ मध्ये असे दोनदा सुवर्ण पदक देऊन त्यांना गौरविले. राज्य व केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाच्या त्या सदस्या होत्या. (१९७५ ते १९८०) ठाणेे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समितीच्या १९८० पासून त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच १९८० मध्ये त्या प्रचंड बहुमताने राज्य विधानसभेेवर निवडून आल्या व राज्यमंत्रीपदाची  जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली.

        ताराबाईंचे राजकीय कर्तृत्वही मोठेच होते. संघटना कौशल्य व कार्यक्षमता पाहूनच पक्षश्रेष्ठींनी त्यांना महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्त केले होते. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्र सरकारने त्यांना युरोपातील स्वीडन, नॉर्वे व नेदरलंड देशात अभ्यासासाठी नियुक्त केले होते. (१९८१)

- वि. ग. जोशी

संदर्भ
१.न. गो. वर्तक माध्यमिक विद्यालय, विरार येथे ग्रंथालयात ठेवलेल्या माहितीपत्रके व फाईल्समधून संकलित, ताराबाईच्या षष्ठ्यब्दिपूर्ती प्रसंगी १४.२.१९८७ रोजी दिलेले सन्मान पत्र.
वर्तक, ताराबाई नरसिंह