Skip to main content
x

व्यास, चिंतामण रघुनाथ

चिंतामण रघुनाथ व्यास यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावी झाला. व्यासांचे घराणे हे संत घराणे म्हणून ओळखले जाई. चिंतामण व्यास शालेय शिक्षणाकरिता बार्शी येथे आले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यानंतर संगीताच्या शिक्षणाकरिता ते मुंबईला आले. शालेय शिक्षण चालू असताना किराणा घराण्याची तालीम त्यांनी पं. गोविंदराव भातंब्रेकर यांच्याकडे घेतली. संगीताचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. मुंबईला त्यांनी दोन-तीन ठिकाणी नोकरी करून नंतर आय.टी.सी.मध्ये कायमची नोकरी धरली.
मुंबईमध्ये गिरगावातील ट्रिनिटी क्लबमध्ये दर शनिवारी व रविवारी गाण्यांचे कार्यक्रम होत असत. तेथे त्यांचे गाणे ऐकून नाफडे नावाच्या रसिकाने त्यांना चांगले गाणे शिकण्याकरिता ग्वाल्हेर गायकीचे श्रेष्ठ गायक पं. राजारामबुवा पराडकर यांच्याकडे पाठवले. पराडकरबुवांच्या निधनापर्यंत व्यासांचे संगीताचे शिक्षण चालू होते. तसेच, पं. यशवंतबुवा मिराशी यांच्याकडे मार्गदर्शन घेण्याचे भाग्यही व्यासांना लाभले.
पराडकरबुवांकडे शिकत असतानाच व्यासांची मुंबई येथील भारतीय विद्या भवन येथे संगीताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. तेथे पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांशी त्यांचा संबंध आला. तसेच रातंजनकरांचे शिष्य पं. चिदानंद नगरकर, पं. के.जी. गिंडे व पं. एस.सी.आर. भट यांच्याशी संबंध आल्यामुळे संगीताकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला.
ग्वाल्हेर घराण्याची उत्कृष्ट तालीम घेत असतानाच व्यासांची पं. जगन्नाथबुवा पुरोहित ऊर्फ ‘गुनिदास’ यांच्याशी भेट झाली. गुनिदास हे एक उत्तम वाग्गेयकार होते. त्यामुळे बंदिशीकडे बघण्याची त्यांची ‘नजर’ संपूर्णपणे बदलली. जगन्नाथबुवांनी व्यासांच्या प्रतिभेला पैलू पाडले. व्यासांनी खूप उत्तम बंदिशींच्या रचना केल्या. व्यासांच्या बंदिशी त्यांच्या शिष्यांप्रमाणेच अनेक प्रथितयश गायक-गायिका आपल्या मैफलीत पेश करतात.
‘रागसरिता’ या पुस्तकात व्यासांनी रचलेल्या १२१ बंदिशी आहेत. ‘तज रे अभिमान’ (बिलासखानी तोडी) ‘कौन मीत कौन वैरी’ (विभास), ‘मनवा तुम ना जाने’ (धानी), ‘मेरा मन लागो’ (रागेश्री), ‘ना डारो रंग मोपे’ (बागेश्री) अशा कमी शब्दांत अधिक आशय सांगणार्‍या त्यांच्या अनेक बंदिशी लोकप्रिय झाल्या.  त्यांच्या बंदिशी ‘गुणिजान’ या टोपणनावाने आढळतात. व्यास हे उत्तम गायक, वाग्गेयकार गुरू म्हणून ओळखले जायचे. त्यांची शिष्यपरंपरा तेवढीच मोठी आहे. उदा. प्रभाकर कारेकर, कुंदा वेलिंग, श्रीपाद पराडकर, मंगला रानडे, संजीव चिमलगी, तसेच पुत्र सुहास व सतीश व्यास यांचा समावेश त्यांच्या शिष्यपरिवारात होतो.
आय.टी.सी.तील नोकरी करत असताना व्यासांनी कंपनीतर्फे महाराष्ट्राच्या नऊ जिल्ह्यांमध्ये ‘बर्कले नाट्यमहोत्सव’ आयोजित करून एक उत्तम उपक्रम केला. ‘महाराष्ट्र ललित कला निधी’ या संस्थेची स्थापना करून त्यांनी आपले गुरू पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या स्मृत्यर्थ ‘गुनिदास संगीत संमेलन’ सुरू केले. देशात आणि परदेशांत त्यांनी अनेक कार्यक्रम केले. ‘स्पीक मॅके’ या संस्थेतर्फे त्यांनी अनेक ठिकाणी  संगीताच्या कार्यशाळा घेतल्या.
व्यासांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू होता. ग्वाल्हेर घराण्यात सुरुवातीचे व त्याही आधी किराणा घराण्याचे संस्कार झाल्यामुळे बोल-आलाप, बोल तान व सुरेलपणा त्यांच्या गायनात दिसत असे. त्यामुळे तीनही घराण्यांचे समग्र दर्शन त्यांच्या गायनात दिसे. आम रागांबरोबर अनवट किंवा अप्रचलित रागही ते तेवढ्याच ताकदीने रसिकांसमोर मांडायचे.
व्यासांना त्यांच्या सांगीतिक योगदानाबद्दल भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने १९९२ मध्ये सन्मानित केले. त्याव्यतिरिक्त त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९८७), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार (१९९०), ‘उस्ताद हफीज अली’ पुरस्कार (१९९८) ‘मा. दीनानाथ’ पुरस्कार (१९९९) आणि मध्य प्रदेश शासनाचा ‘तानसेन’ पुरस्कार (१९९९) असे अन्य पुरस्कारही प्राप्त झाले. कलकत्ता येथे गुनिदास संगीत संमेलनासाठी गेले असतानाच त्यांचा अकस्मात मृत्यू झाला.

सुहास व्यास

व्यास, चिंतामण रघुनाथ