Skip to main content
x

यादव, आनंद रतन

डॉ.आनंद यादव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी एका गरीब शेतमजुराच्या कुटुंबात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घरातून पूर्णपणे विरोध असताना, शेतात मजुरी करून, वेळ मिळेल तेव्हा शाळेत जाऊन त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तशाच परिस्थितीत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन मराठी व संस्कृत भाषांत एम.ए.च्या पदव्या प्राप्त केल्या आणि त्यानंतर मराठी भाषेतच मराठी लघुनिबंध, प्रेरणा, प्रवृत्ती व विकासया विषयात पुणे विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळवली.

प्रारंभी पंढरपूर येथे अध्यापन व नंतर आकाशवाणी केंद्रावर नोकरी करून अखेरीस त्यांनी दीर्घकालपर्यंत पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्य केले. डॉ.यादव यांची ८२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची बहुमताने निवड झाली होती. परंतु त्यांनी लिहिलेल्या संतसूर्य तुकारामया चरित्रात्मक कादंबरीतील काही मजकुरावरून वाद निर्माण झाला. वारकर्‍यांच्या दबावामुळे डॉ.यादवांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

या अध्यक्षपदापूर्वी त्यांनी अनेक प्रादेशिक, विभागीय आणि कामगार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. जळगाव येथील १९९८चे पहिले समरसता साहित्य संमेलन, १९८६चे बेळगाव येथील चौथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, १९८७चे साक्री येथील पहिले दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन, १९९०मधील भंडारा येथील चौथे जनसाहित्य संमेलन, १९९४चे नाशिक येथील कामगार साहित्य संमेलन, १९९६चे तिसरे ठाणे जिल्हा मराठी साहित्य संमेलन, अशा सर्व संमेलनांत अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीची छाप पाडली होती.

प्रतिकूलतेशी झोंबी

शेतमळ्यात शेतमजूर म्हणून राबणारे रत्नू जकाते हे त्यांचे वडील व आयुष्यभर नवर्‍याच्या धाकात राहून, नवर्‍याचा मार खात मुलांना वाढवणारी तारा ही त्यांची आई. डॉ.आनंद यादवांना एकूण १० भावंडे होती, पण त्यांच्यापैकी शिक्षणाचे वेड, त्यासाठी वाटेल ते दिव्य करण्याची तयारी फक्त आनंद यादव ह्यांनीच दाखवली. घरातील दारिद्र्य, खाणारी भरपूर तोंडे, त्यामुळे घरादाराला आलेली अवकळा, शिक्षणाविषयी घरातून असणारे औदासीन्य आणि शिक्षण घेण्यासाठी आनंद ह्यांची होणारी तडफड, सार्‍या विरोधी शक्तींशी आणि प्रतिकूलतेशी झोंबी घेत-घेत, शिक्षणाची पायवाट सुटू न देता शिक्षणातून वाङ्मयाचे संस्कार घेत, वाङ्मयातील स्वप्निल जगाचा आधार घेत त्यांनी शिक्षणाचे शिखर यशस्वीपणे सर केले.

शालेय जीवनातच त्यांना वाचनाची गोडी लागली. पुस्तक वाचणे हे भिकेचे लक्षण आहे, असे म्हणणार्‍या वडिलांच्या नकळत त्यांनी पुस्तके मिळवली आणि वाचली. शेतात राबताना भोवतीचा निसर्ग, हिरवाई यांनी त्यांच्यावर जणू गारूड केले. उपजत प्रतिभा असल्यामुळे शालेय जीवनातच त्यांनी जानपदगीते लिहून शिक्षकांची शाबासकी मिळवली. त्यानंतर १९५९ साली हिरवे जगहा शेतीवरील कवितांचा ग्रामीण कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. डॉ.आनंद यादव यांची साहित्यसंपदा विपुल असून त्यांची ४०पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

नवा साहित्यप्रकार

झोंबी’ (१९८७) या त्यांच्या आत्मचरित्रमालिकेतील पहिल्या कादंबरीत दारिद्य्राचे आसूड खात जीव जगवीत ठेवणार्‍या कुटुंबातील एका पोराच्या हाती पाटी पेणशीलआल्यापासून तो मॅट्रिक होईपर्यंत कराव्या लागलेल्या झोंबीची कथा आली आहे. नांगरणी’ (१९९०) ह्या कादंबरीतून मॅट्रिकनंतर पुढील शिक्षणासाठी करावी लागलेली खडतर तपस्या चित्रित झाली आहे. घर’ (१९९२), ‘काचवेलया सदर मालिकेतील पुढच्या दोन कादंबर्‍या. त्यांची पहिली कादंबरी गोतावळा’ (१९७१) अतिशय प्रसिद्ध झाली.

आधुनिक यंत्रपद्धतीच्या आगमनामुळे कृषिसंस्कृतीचा कसा विस्फोट झाला, जुन्या संस्कृतीत असलेल्या निसर्ग, मानव, पशुपक्षी यांचा असलेला गोतावळा यंत्रयुगात कसा नामशेष झाला, याचे हृद्य चित्रण ग्रामीण बोलीत करणारी ही वाचकप्रिय कादंबरी आहे. नटरंगही तमाशा कलावंताच्या जीवनसंघर्षाचे दर्शन घडविणारी कादंबरी. एका मांजर कुटुंबाच्या कथेतून माणसाच्या आदिमनाचा शोध घेणारी माऊलीही आगळी कादंबरी आहे. एकलकोंडा’, ‘कलेचे कातडेयांशिवाय अगदी अलीकडच्या काळातील त्यांच्या दोन चरित्रात्मक कादंबर्‍या लोकसखा ज्ञानेश्वर’, ‘संतसूर्य तुकारामया  आहेत. दोन्ही संतांच्या जीवनातील विविध घटना, त्यांचे श्लोक, अभंग यांचा अभ्यास करून लिहिलेल्या या दोन साक्षेपी कादंबर्‍या आहेत. खळाळ’ (१९८४) हा काव्यात्म ग्रामीण कथांचा त्यांंचा पहिला कथासंग्रह आहे. घरजावई’, ‘माळावरची मैना’, ‘शेवटची लढाई’, ‘आदिताल’, ‘डवरणी’, ‘उखडलेली झाडं’, ‘भूमिकन्या’, ‘झाडवाटा’, ‘उगवती मनेहे त्यांचे कथासंग्रह होत.

स्पर्शकमळे’, ‘पाणभवरे’, ‘मातीखालची माती’, ‘साहित्यिकाचा गाव’, ‘ग्रामसंस्कृतीही ललित पुस्तकेही त्यांनी लिहिली.

हिरवे जग’ (१९५९), ‘मळ्याची मातीहे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. तसेच मायलेकरे’, ‘रानमेवा’, ‘सैनिकहो तुमच्यासाठीहे बालकवितांचा संग्रह आहेत. ग्रामीण साहित्य, स्वरूप व समस्या’, ‘ग्रामीणता: साहित्य आणि वास्तव’, ‘मराठी साहित्य, समाज, आणि संस्कृती’, ‘साहित्याची निर्मिती प्रक्रिया’, ‘मराठी लघुनिबंधाचा इतिहास’, ‘आत्मचरित्र मीमांसा’, ‘१९६०नंतरची सामाजिक स्थिती व साहित्यातील नवे प्रवाह’, ‘ग्रामसंस्कृतीहे त्यांचे वैचारिक व समीक्षात्मक लेखन होय. मातीतले मोती’, ‘निळे दिवस’, ‘तिसर्‍या पिढीची ग्रामीण कथा’, ‘कथावैभव’, ‘माझ्या आठवणी आणि अनुभव- विठ्ठल रामजी शिंदेयांसारख्या ग्रंथांचे संपादन करून एक सव्यसाची संपादक म्हणून त्यांनी मान्यता मिळवली.

झाडफुलून आले

ग्रंथ नावाच्या वस्तूला जिथे अजिबात थारा नव्हता, अशा वातावरणात वाढलेल्या आनंद यादवांना साहित्य- निर्मितीची भूतबाधा झाली आणि झाडफुलून आले. साहित्यनिर्मितीमुळे लाभलेल्या यशाच्या एका उंच पायरीवरून हा लेखक त्याच्यासारख्या साहित्याच्या भुताने पछाडलेल्या आणि उपेक्षेच्या अंधारातून प्रकाशाकडे झेपावणार्‍या ग्रामीण भागातील तरुणांना हात देण्याच्या कामात गुंतला आहे. ग्रामीण समाजाचे प्रश्न, व्यथा, वेदना, सामाजिक जाणिवा साहित्यजगतात उमटाव्यात म्हणून १९७४पासून डॉ.यादवांनी ग्रामीण साहित्य चळवळ सुरू केली, त्यासाठी खेड्यापाड्यांतील अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांमधून व्याख्याने, ग्रामीण साहित्यिकांसाठी शिबिरे, साहित्यिक मेळावे, कार्यशाळा घेऊन, ग्रामीण भागातील लेखक, शिक्षक यांचे संघटन करून त्यांची एक फळी निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ.यादव अजूनही करीत आहेत.

त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे कन्नड, हिंदी, उर्दू, तेलुगू, इंग्रजी, जर्मन या भाषांत अनुवाद झाले आहेत. कोलकाताच्या राष्ट्रीय हिंदी अकादमीचा उत्कृष्ट मराठी साहित्य निर्मितीचा पुरस्कार त्यांना १९९४मध्ये मिळाला. त्यांच्या अनेक पुस्तकांना मिळून ४०पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. झोंबीला साहित्य अकादमी पुरस्कारासह आठ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे एकूण चौदा पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधास पुणे विद्यापीठाचे दोन पुरस्कार मिळाले आहेत. मराठी साहित्य पत्रिकेचे १९७९ ते १९८२ या काळात ते संपादक होते. राज्य मराठी विकास संस्था, जागतिक मराठी अकादमी या संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचे सदस्य. मराठी साहित्य परिषद पुणे ह्या संस्थेचे १९९८ ते २००० या काळात उपाध्यक्ष. विचारभारतीचे ते काही काळ संपादक होते.

डॉ.आनंद यादव यांची मूळ प्रवृत्ती काव्यात्म असल्यामुळे, त्यांच्या गद्यातही काव्यात्मक भाषेचा साक्षेपी उपयोग झाल्याची अनेक उदाहरणे त्यांच्या लेखनात सापडतात. त्यांचे सर्व लेखन अभ्यासातून झाल्याचे जाणवते.

ग्रामीण साहित्याची जी एक गोंडस चौकट मराठी साहित्यात निर्माण झाली होती, ती डॉ.आनंद यादव यांच्या साहित्याने पार मोडून पडली. ग्रामीण जीवनातील कष्ट, हाल, सहनशक्तीची कसोटी पाहणारे प्रसंग यांचे अत्यंत वास्तव चित्रण, कोणत्याही अभिनिवेशाशिवाय त्यांनी केले आहे. अशा प्रकारे ग्रामीण साहित्याला वेगळा व कणखर आवाज देणार्‍या, ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण करणार्‍या कथा, कविता, आणि कादंबर्‍यांचा लेखक म्हणून त्यांचे कर्तृत्व नक्कीच गौरवाला पात्र आहे.

- सविता टांकसाळे

संदर्भ :
१. यादव आनंद; ‘झोंबी’. २. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, सामना, लोकमत, पुढारी, केसरी व प्रभात या वृत्तपत्रांचे अंक (१७ जानेवारी २००९). ३. मेहता ग्रंथ जगत; जानेवारी २००९.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].