Skip to main content
x

आचार्य, अविनाश रामचंद्र

     अविनाश रामचंद्र आचार्य यांचा जन्म जळगाव येथे झाला. त्यांचे वडील रामचंद्र हनुमंत आचार्य हे प्रतिथयश स्त्री-रोगतज्ज्ञ होते. ते व्यवसायासठी १९३१ मध्ये जळगावात आले. अविनाश यांच्या आई लीला आचार्य यांनी राजकारणाद्वारे सामाजिक कार्याला सुरुवात करून जळगाव येथे नगरसेवकपद भूषविले. जनसेवा व समाजसेवेचा वारसा अविनाश आचार्य यांना आई-वडिलांकडून लहानपणापासूनच मिळाला होता. तसेच बालवयातच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जळगावच्या महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक पाचमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण जळगाव व मुंबई येथे पार पडले. पुढील शिक्षणासाठी ते मंगलोरला गेले. तेथून त्यांनी एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.डी.साठी टाटा, के.ई.एम. व वाडिया या सरकारी रुग्णालयांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मुंबई येथून पदवी घेतल्यावर त्यांनी परत जळगावला जाण्याचा निर्णय घेतला.

     आचार्य आईच्या सांगण्यावरून १९४० पासून संघाच्या शाखेत जाऊ लागले. अविनाश आचार्य यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी त्यांच्या आईचे व २० व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर अलका व अनिल या लहान भावंडांची जबबादारी अविनाश आचार्य यांच्यावर पडली. तसेच, समाजसेवेचा मूलपिंड असणाऱ्या डॉ. अविनाश आचार्य यांनी १९६३ पासून जळगाव येथून वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. त्या वेळेस त्यांनी आठवड्यातून दोन दिवस समाजातील गरीब स्त्रियांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्याचा अभिनव उपक्रम राबवला. याच काळात त्यांनी जळगाव जिल्हा रुग्णालय व नगरपालिकेचे साने गुरुजी रुग्णालय येथे मानद वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी त्यांच्या खासगी मालकीच्या लीलाबाई आचार्य या रुग्णालयाचे आचार्य वैद्यकीय प्रतिष्ठान या धर्मादाय संस्थेत रूपांतर करून समाजापुढे नवा आदर्श उभा केला.

     डॉ. अविनाश आचार्य यांना १९७४ मध्ये शाळा सुरू करण्याची कल्पना सुचली व जळगावजवळील पाळधी येथे शाळा काढण्याचे ठरले. तेव्हा सांगलीचे संघचालक माधवराव गोडबोले यांनी सहकारी बँकेची स्थापना करण्याचा सल्ला डॉ. आचार्य यांना दिला. तसेच संघ प्रचारक तात्या बापट यांनीही ‘शिक्षणसंस्था काढून समाजसेवा करालच; पण बँक सुरू करून त्या समाजसेवेचा श्रीगणेशा करा’, असे सांगितले.  या सल्ल्याला अनुसरून डॉ. आचार्य यांनी बँक उभारणीच्या कामाला सुरुवात केली आणि आवश्यक असणारे १ लाखापर्यंतचे भांडवल उभे केले. पुढील काही दिवसात संस्था नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आणि बँक सुरू होण्याची चिन्हे दिसत असतानाच २६ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी घोषित झाली. डॉ. आचार्य यांनी आणीबाणी विरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांना १९ महिन्यांसाठी तुरुंगवास भोगावा लागला. २३ मार्च १९७७ ला अधिकृतपणे आणीबाणी उठल्यावर त्यांची मुक्तता झाली. तेव्हा त्यांनी बँकेच्या उभारणीसाठी नव्याने प्रयत्न सुरू केले. परंतु मध्ये दोन वर्षांचा काळ गेलेला असल्यामुळे त्यांना अधिकचे दोन लाखाचे भागभांडवल उभे करण्याची जबबादारी पेलावी लागली. त्या वेळेस भागभांडवल उभारणीचे नियम बदलले असल्यामुळे केवळ १० कि.मी. अंतरातील माणसांनाच सभासद करून घेण्याची मर्यादा घातली गेली. या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी २० जानेवारी १९७९ रोजी जळगाव जनता सहकारी बँकेची स्थापना केली. त्यावेळी मोहनभाई मेहता यांनी नाममात्र भाड्याने दिलेल्या नवीपेठ येथील दोन खोल्यांच्या जागेत बँकेचे व्यवहार सुरू झाले. पहिल्या वर्षी बँकेला जवळपास १२ हजार रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला. त्या तोट्याची कारणे शोधून, त्यावर मात करत दुसऱ्याच वर्षी सुमारे १२ हजार रुपयांएवढा नफा मिळवला. पुढील वर्षापासून बँकेची घोडदौड सुरू झाली.    त्यानंतर काही वर्षात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांत ३१ शाखा व १ विस्तारित कक्षही कार्यरत केला. या बँकेच्या विविध शाखांच्या माध्यमातून सुमारे ३३०० महिला स्वयंसहायता बचत गटांची स्थापना केलेली असून, बचत गटांना अर्थसाहाय्यही देण्यात आलेले आहे. २८ जानेवारी २००० रोजी रिझर्व्ह बँकेने या बँकेला  शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिला. डॉ. आचार्य यांनी सलग २० वर्षे या बँकेचे अध्यक्षपद भूषवले आहे. धुळे पीपल्स बँकेचे विलिनीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही डॉ. आचार्य यांनी घेतला व तो यशस्वीरित्या अमलात आणला.

     डॉ. आचार्य यांचे सहकार क्षेत्रातले कार्य केवळ बँकेपुरते मर्यादित न राहता, त्यांनी सहकार क्षेत्रात संघटन उभे करण्यात महत्त्वपूर्ण यागदान दिले आहे. सहकार भारतीच्याद्वारे सहकाराच्या संघटनात्मक कामातही त्यांनी सहभाग घेतला. आचार्य यांनी २००४ पासून वैद्यकीय व्यवसायास विराम देऊन सहकार भारतीच्या कामाला वाहून घेतले आहे. सहकार भारतीचे अध्यक्ष असताना देशभर प्रवास करून सहकार क्षेत्राचे जाळे विणण्यासाठी परिश्रम घेतले. ‘जागतिकीकरणाच्या युगात सर्वसामान्य जनतेला सहकारच तारेल; नव्हे तर सहकाराशिवाय जागतिकीकरण यशस्वी होऊ शकणार नाही’, असे ठाम मत डॉ. आचार्य यांनी मांडलेले आहे.    

     ‘समाजावर आईसारखे प्रेम करू या’ या भावनेतून डॉ. आचार्य यांनी केशव स्मृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी व सेवाभावी प्रकल्पाची उभारणी केली. या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून त्यांनी विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव; जनता प्रशिक्षण केंद्र, हरिजन कन्या छात्रालय, जळगाव; जनता ललित कला अकादमी, माधवराव गोळवळकर स्वयंसेवी पतपेढी, बळवंत नागरी सहकारी पतसंस्था, जळगाव; उद्योजक नागरी सहकारी पतसंस्था, जळगाव; जनता इन्फोटेक प्रा. लि. यांसारख्या संस्थांची स्थापना करून जळगाव जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली. 

     डॉ. आचार्य यांना सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल वाई नागरी सहकारी बँक   मर्या., वाई यांच्यातर्फे ‘सहकारभूषण’ हा पुरस्कार २००३ मध्ये देऊन सन्मान करण्यात आला.  तसेच, समाजातील तळागाळातील जनतेसाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ‘अंत्योदय’ हा पुरस्कार २००३ मध्ये देण्यात आला. तर दैनिक लोकमतच्या जळगाव आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘खानदेश भूषण’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. समाजसेवेचा वसा घेऊन अखंड कार्यरत असणाऱ्या डॉ. अविनाश आचार्य यांचे जळगाव येथेच निधन झाले.

    डॉ. अविनाश आणि अनुराधा आचार्य या दाम्पत्याची मुलगी आरती स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.

- संपादित

आचार्य, अविनाश रामचंद्र