आकेरकर, विजयप्रकाश नरहरी
विजयप्रकाश नरहरी आकेरकर यांचा जन्म सावंतवाडी इथे झाला. हुमरस हे आकेरकर कुटुंबाचे वास्तव्याचे गाव. त्यांचे बालपण हुमरसलाच गेल्याने १ ली ते ७वी पर्यंतचे शिक्षण तिथल्या पूर्व प्राथमिक शाळेत झाले. आठवी ते दहावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण त्यांनी माणगावच्या श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात घेतले. आकेरकर सरांकडे दोन बी.ए. आणि दोन पदव्युत्तर पदव्या आहेत. अर्थशास्त्र विषय घेऊन १९६९ ला पहिली बी.ए.ची पदवी मालवणच्या स. का. पाटील महाविद्यालयातून घेतली. त्यानंतर १९७१ ला शिवाजी विद्यापीठाची बी.ए. परीक्षा इंग्रजी विषय घेऊन ते उत्तीर्ण झाले. याशिवाय अध्यापनासाठी अनिवार्य असलेल्या बी.एड. आणि एम. एड. या शिवाजी विद्यापीठाच्या पदव्याही त्यांनी मिळविल्या आहेत.
शिक्षण पूर्ण झाल्यावर आकरेकर यांंनी श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाची सर्वांगीण प्रगती हेच आपले कार्य मानले. जिथे विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले त्याच शाळेत सहाय्यक शिक्षक, पर्यवेक्षक आणि प्राचार्य या जबाबदार्या त्यांनी मनोभावे स्वीकारल्या. इंग्रजी आणि व्याकरण हे विषय शिकवण्यातले त्यांचे कौशल्य निर्विवाद आहे.
देणगी म्हणून १४ एकर जमीन आणि लाखो रुपये मिळवून शाळेला नावारूपास आणणे हे सरांचे खास नोंद घेण्याजोगे काम आहे. सर्व स्तरावरच्या क्रीडा प्रकारात भाग घेणारी सरस्वती विद्यालय ही जिल्ह्यातली एकमेव शाळा आहे. सुसज्ज व्यायामशाळा, पूर्ण विकसित संगणक कक्ष, बालभवन केंद्र, गुरु दक्षिणा हॉल, गरीब विद्यार्थी फंड, ग्रंथालय ही सरस्वती विद्यालयाच्या विस्ताराची मुख्य अंगे आहेत. शाळेबरोबरच माणगावला उच्च माध्यमिक कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक महाविद्यालय आणि यक्षिणी माध्यमिक शाळा सुरू करण्यातही आकेरकर यांचा मोठा सहभाग आहे. ते जेव्हा शाळेत नोकरीला लागले तेव्हा ३०० असलेली विद्यार्थी संख्या आज १७०० वर गेली आहे यातच आकेरकर यांच्या योगदानाचे प्रतिबिंब दिसते. आपला १९६९ ते २००६ हा नोकरीचा कालावधी संपवून आकेरकर लौकिकदृष्ट्या निवृत्त झाले असले तरी आजही ते शाळेच्या कामात व्यग्र आहेत.