अमीन, प्रभाकर वासुदेव
प्रभाकर वासुदेव अमीन यांचा जन्म वासुदेव आणि रमाबाई यांच्या पोटी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या गावी झाला. त्यांचे बालपण मोर्शीलाच गेले. अमीन यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोर्शीलाच झाले. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा १९६०मध्ये प्रथम श्रेणीत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. लहानपणापासूनच त्यांचा ओढा कृषी विषयाकडे होता; म्हणून अकोला येथील कृषी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. ते १९६३मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांना नागपूर विद्यापीठाने सुवर्णपदक देऊन गौरवले. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्था येथे प्रवेश मिळवला व १९६५मध्ये एम.एस्सी. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९६८ साली कृषी कीटकशास्त्रामध्ये पीएच.डी.ची पदवी मिळवली. डॉ. अमीन यांची १९७७मध्ये हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेत (इक्रीसॅट) भुईमूग कीटकशास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. तेथे त्यांनी १९९०पर्यंत काम केले. येथे काम करत असताना डॉ. अमीन यांनी केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र राज्यांत विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान आणि उत्पादकतेवर परिणाम करणार्या मुख्य घटकांवर भर देणारी लागवड पद्धत विकसित केली. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धत वापरावी. दर एकरी पेरणीसाठी उत्तम बियाण्यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. पाणी देण्यासाठी तुषारसिंचन पद्धतीचा वापर करावा. बियाण्यांची पूर्ण उगवण झाल्यावर साधारणतः ३० ते ३५ दिवस पाण्याचा ताण द्यावा. आवश्यकता भासेल तेव्हा मूलद्रव्याचा वापर करावा. तसेच जिप्समचाही वापर करावा, हे तंत्रज्ञान विकसित करून त्यांनी शेतकर्यांच्या शेतावर, मुख्यत: भुईमुगावर प्रयोग करून ही पद्धत कशी फायदेशीर आहे हे दाखवून दिले; उत्पादन २० ते ३५ क्विं. हे. एवढे वाढले.
महाराष्ट्रात सातारा, सांगली, परभणी व नांदेड या जिल्ह्यांमध्ये त्यांनी भुईमुगाची शेती करणार्या शेतकर्यांच्या शेतावर संशोधनाचे कार्य केले व शेतकर्यांना उत्पादनवाढीसाठी विशेष मदत केली. भुईमुगावर ‘बडनिक्रोसीस’ पसरवणार्या किडीवर नियंत्रण करण्याचे तंत्र शेतकर्यांना दाखवले. डाळवर्गीय किडीवरील संशोधन करताना ज्या हवामानात किडीचा प्रसार होतो, त्याचे निकष ठरवून कीटकनाशकाचा वापर करण्याचे वेळापत्रक शेतकर्यांना करून दिले. त्यामुळे किडीचा नायनाट होऊन झाडे निकोप दिसतात, हे त्यांनी शेतकर्यांना दाखवून दिले.
याच काळात अमीन यांचे ५० संशोधनपर निबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालिकांत प्रकाशित झाले. ५० संशोधन निबंधांपैकी ३३ संशोधनपर लेख भुईमुगावरील किडीसंबंधीचे होते. त्याचप्रमाणे त्यांनी हरभरा, तूर, मूग या पिकांच्या किडींवरही संशोधन केले.
डॉ. अमीन यांची एप्रिल १९९० मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू म्हणून निवड झाली. या पदावर ते ३ वर्षे कार्यरत होते. या काळात त्यांनी निरनिराळ्या जिल्ह्यांतील शेतकर्यांशी संबंध वाढवले, तसेच त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेऊन विविध पिकांवरील अद्ययावत तंत्रज्ञान शिकवले. पीक हंगामात चर्चासत्रे व शिवार भेट हे कार्यक्रम आयोजित करून विविध पिकांच्या लागवडीविषयीचे तंत्रज्ञान त्यांना शिकवले. शेतकर्यांची चर्चासत्रे तसेच मार्गदर्शन वर्ग शेतकर्यांच्याच शेतातील झाडाखाली भरवून त्यांना मार्गदर्शन करणे, हे डॉ. अमीन यांचे वैशिष्ट्य होते.
मे १९९२मध्ये कुलगुरुपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नागपूर येथे राहून ‘लोकसत्ता’ व ‘तरुण भारत’ या दैनिकांमधून ‘कृषी धर्म’ हे साप्ताहिक सदर चालवले व शेतकर्यांसाठी ज्ञानदानाचे कार्य चालू ठेवले. त्यांनी नागपूर येथे २५ ऑगस्ट १९९५ रोजी ‘राष्ट्रीय कृषी विकास व उद्योजक पणन प्रबोधिनी (नाडेन)’ या संस्थेची स्थापना केली आणि त्याअंतर्गत त्यांनी शेतकर्यांचे वर्ग श्रद्धामूल्य घेऊन चालवले. या काळामध्ये डॉ. अमीन यांच्या २० पुस्तिका प्रकाशित झाल्या. त्यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, कापूस व हरभरा इ. पिकांवरील पुस्तिका प्रमुख आहेत. तसेच पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या संत्र्याच्या पिकावर ‘संत्र्याचे पुस्तक’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. डॉ. अमीन यांचा शेतकर्यांशी दांडगा संपर्क होता. शेतीच्या तंत्रज्ञानाच्या जागृतीसाठी त्यांनी बच्चुबुवा देशमुख, संजय भुसकुटे, विष्णुपंत खुळे, प्रभाकर भट व रामदासपंत गायकी यांसारख्या शेतकर्यांशी निकटचे संबंध प्रस्थापित केले व त्यांच्या शेतातील विविध पिकांवर प्रयोग करून शेतकर्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकर्यांच्या उत्पादन खर्चात २५ ते ३० टक्के बचत केली व उत्पन्नात २५ ते ३० टक्के वाढ करून दाखवली.
डॉ. अमीन यांनी माती परीक्षणाचे फायदे व खताविषयीची माहिती आणि पिकासाठी मायक्रोन्यूट्रियंटचा वापर करण्यासंबंधीच्या विविध पुस्तिकाही प्रकाशित केल्या. डॉ. अमीन यांनी चांदूरबाजार येथील संत गुलाब महाराज संस्थान येथे प्रत्यक्ष शेतीचे कार्य केले. या संस्थेतर्फे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'डॉ. प्रभाकर अमीन स्मृती पुरस्कार' सुरू करण्यात आलेला आहे. ही संस्था प्रत्येक वार्षिक महोत्सवात शेतकर्यांना पुरस्कार प्रदान करते. डॉ. अमीन यांच्या कुटुंबीयांनी त्यांची ग्रंथसंपदा अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या वाचनालयाला समर्पित केली.