आंबेरकर, वसंत रघुनाथ
बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले आणि १९३५ ते १९४५ या दशकातल्या चित्रकला क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाचे एक प्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे वसंत रघुनाथ आंबेरकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे शालेय शिक्षण प्रथम कुलाब्याला व नंतर अलिबाग येथे झाले. त्यांचे वडील डॉ. रघुनाथ भाऊ आंबेरकर हे नामवंत डॉक्टर होते. नौदलातील नोकरी सोडून ते अलिबाग येथे राहायला गेले व तेथे त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्यांना साहित्य, संगीत व विशेषत: नाट्यकलेचीही आवड होती. त्यांनी आपल्या मुलावर डॉक्टर होण्याची सक्ती न करता आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य दिले.
वसंत आंबेरकर यांनी वडिलांनी दिलेल्या या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग केला. ते १९३३ मध्ये इंग्रजी विषय घेऊन विल्सन महाविद्यालयामधून बी.ए. व नंतर एम.ए. झाले. मुंबईला फोर्ट भागात त्यांनी स्वत:चा स्टूडिओ चालू केला. त्यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे व कल्पकतेमुळे अनेक इंग्रजी कंपन्यांची कामे त्यांच्याकडे येऊ लागली. त्यांच्या या स्टूडिओत चित्रकार, गायक, वादक, साहित्यिक, नाट्यक्षेत्रातील कलावंत यांचा राबता असे. तेथे कलेवर चर्चासत्रेही झडत.
वास्तववादी कलाशैलीत पारंगत व जलरंगातील प्रावीण्यामुळे प्रख्यात असलेले चित्रकार सा.ल. हळदणकर यांच्या कलाशाळेत मुल्लर यांच्या सल्ल्यानुसार आंबेरकरांनी मन लावून अभ्यास केला व प्रावीण्य संपादन केले. शाळेत असतानाच लंडन येथील प्रेस आर्ट स्कूलच्या पर्सी.व्ही. ब्रॅडशॉचा पत्रव्यवहाराद्वारे करता येणारा कलाशिक्षणाचा चार वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला व त्यामुळे त्यांना कलेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. कलेच्या मूलभूत तत्त्वांसंबंधीची त्यांच्या विचारांची बैठक पक्की झाली. याचाच परिणाम त्यांच्या पुढच्या कारकिर्दीवर दिसून येतो. त्यांचा विवाह जून १९३४ मध्ये नलिनी मेढेकर यांच्याशी झाला.
वास्तववादी चित्रणात प्रावीण्य मिळवूनही त्यांच्या नवनवीन प्रयोग करण्याच्या आवडीमुळे पुढेपुढे त्यांच्या चित्रांत ब्रशचे जोरदार फटकारे, मोजकेच रंग व अनावश्यक बारकावे टाळून केलेली रचना दिसू लागली. भारतात व विशेषत: मुंबईच्या कलाक्षेत्रात १९३५-३६च्या सुमारास दृश्यकलेबद्दलचा आधुनिक प्रवाह रुजू लागला होता. चित्रघटकांच्या मांडणीत, मग ते निसर्गचित्र असो वा व्यक्तिचित्र, अधिक लवचीकपणा येऊ लागला होता. त्या काळातील इतर चित्रकारांप्रमाणेच आंबेरकर यांनी जाणीवपूर्वक नवे मार्ग चोखाळले. नंतरच्या काळात एस.एच. रझा, अकबर पदमसी इत्यादींच्या चित्रांमधून हा प्रवाह अधिक दृढ झाला.
आंबेरकरांच्या चित्रांमध्ये वास्तवदर्शी शैलीपासून एक्स्प्रेशनिस्ट शैलीपर्यंतचे विविध प्रभाव दिसतात. त्यांच्या निसर्गचित्रांमधून यथार्थदर्शनापेक्षा आकार आणि अवकाश यांचा रचनातत्त्वाच्या माध्यमातून शोध घेतलेला दिसतो. ‘द ड्रेस’ हे मानवी आकृतिप्रधान चित्र आणि ‘चर्च’ हे वास्तुरचनाप्रधान चित्र, या दोन्ही चित्रांमधून जोरकस काळ्या रेषांनी रेखाटन केलेले आहे आणि त्यांत रंग भरलेले आहेत. त्यांची काही चित्रे अमूर्ततेकडेही झुकलेली आहेत. कलेतील आपले गुरू सा.ल. हळदणकर यांच्या सांगण्यावरून आंबेरकर आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यात प्रत्यक्ष भाग घेऊ लागले व त्यांनी सचिवपदाची जबाबदारी सांभाळली. अनेक उपक्रमांद्वारे सोसायटीला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली व १९३५ साली ते सोसायटीचे अध्यक्ष झाले. १९४३ साली संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात त्यांनी काढलेला कॅटलॉग त्यांच्या प्रतिभेचे प्रत्यंतर देतो.
चित्रकला क्षेत्रातील त्यांच्या प्रयोगशीलतेपेक्षा कलाशिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अधिक महत्त्वाचे आहे. १९४० सालची ‘री-ऑर्गनायझेशन कमिटी’, १९४६ सालची प्रख्यात ‘हंसा मेहता कमिटी’, १९४७ सालचे महाराष्ट्र राज्य शिक्षण सल्लागार मंडळ यांमध्ये काम करून त्यांनी कलाशिक्षणात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्याचबरोबर, वाई येथील विश्वकोशाच्या मंडळावरही त्यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याबरोबर काम केले.
आंबेरकरांच्या कलाशिक्षणविषयक विचारांनी प्रभावित झालेल्या हंसा मेहता यांनी गुजरात राज्यात, बडोदा (वडोदरा) येथे सयाजीराव विद्यापीठात कलाविभागाची पुनर्रचना करण्याचे ठरवले तेव्हा कला — अभ्यासक्रम व त्यासाठी शिक्षक निवडण्याची जबाबदारी त्यांनी आंबेरकरांवर सोपवली. या अभ्यासक्रमाअंतर्गत आंबेरकरांनी प्रथमच कलेचा इतिहास व सौंदर्यशास्त्र या विषयांचा अंतर्भाव केला व स्वत: हे विषय तेथील विद्यार्थ्यांना शिकवले.
मुंबईचे तेव्हाचे कलासंचालक माधव सातवळेकर यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्यातील कलाशिक्षणासाठी त्यांनी नवीन मूलभूत अभ्यासक्रम आखला. महाराष्ट्राच्या कलासंचालनालयाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी सर्व उच्च कला महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी मार्गदर्शक उन्हाळी शिबिरे घेऊन हा अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविला. बडोदा व मुंबई येथील कलाशिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना गोवा व त्रिवेंद्रम येथे कलाशिक्षणाची रूपरेषा ठरवण्यासाठी आमंत्रित केले गेले. या सर्व ठिकाणच्या अभ्यासक्रमांत कलैतिहास, कलासमीक्षा व सौेंदर्यशास्त्र यांचा अंतर्भाव व्हावा यासाठी ते आग्रही राहिले. यातून भारतातील कलाजगत व कलावंत अधिक प्रगल्भ होईल असा त्यांचा विश्वास होता. त्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले.
भारतात राष्ट्रीय कला अकादमी स्थापन करण्यासाठी ज्या तीन अखिल भारतीय परिषदा झाल्या, त्यांतही त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले व सर्व प्रांतांतील कलासंस्थांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी मान्य करून घेतली.
आंबेरकरांचा कलाक्षेत्रातील व्यासंग व गाढा अभ्यास पाहून त्यांना व्याख्याने देण्यासाठी निमंत्रणे येत. आपल्या इंग्रजीतील वक्तृत्वाने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत. बी.बी.सी. वाहिनीवर भारतीय व पाश्चात्त्य कलेवरील त्यांची व्याख्यानमाला बरीच गाजली. मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांत व नियतकालिकांत त्यांनी समीक्षात्मक लेखनही केले. १९७४ साली, चित्रकार बेंद्रे यांच्या सिंहावलोकनी प्रदर्शनाच्या कॅटलॉगमध्ये त्यांनी लिहिलेली प्रस्तावना ही त्यांच्या समीक्षा लेखनाचा उत्कृष्ट नमुना आहे.
आंबेरकरांना १९४६ साली त्यांच्या चित्रासाठी ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या वार्षिक कलाप्रदर्शनात पारितोषिक मिळाले. त्यांनी १९६२ मध्ये ‘टुवडर्स लाइट’ शीर्षकाचे प्रदर्शन भरवले होते. ललित कला अकादमीचे सदस्य व सहसचिव म्हणून त्यांनी समर्थपणे काम सांभाळले. ललित कला अकादमीतर्फे नियमितपणे जागतिक त्रैवार्षिक (त्रिनाले) प्रदर्शने भरवण्याबाबत ते आग्रही राहिले. त्यांच्या या योगदानाविषयी कृतज्ञता म्हणून ललित कला अकादमीतर्फे १९७९ साली मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियमच्या सभागृहात फेलोशिप देऊन त्यांना गौरविण्यात आले.आंबेरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात २००७ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीतर्फे ‘मास्टर स्ट्रोक्स सिक्स’ प्रदर्शनात त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली.