अरगीकर, गोपाळ प्रल्हाद
गोपाळ प्रल्हाद अरगीकर हे भारतीय कृषि-वैज्ञानिक होते. बी.एस्सी.(कृषी)ची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ९ ऑक्टोबर १९४१पासून मुंबई सरकारच्या कृषी खात्यात त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. ती चालू असतानाच संशोधन करून कृषी विज्ञानातील पीएच.डी.ची पदवीही त्यांनी संपादन केली. राज्यातील बेलहोंगल, परभणी, विजापूर, डिग्रज या कृषी संशोधन केंद्रांत ‘रोपपैदासकार’ म्हणून त्यांनी काम केले. ज्वारी, मका, बाजरी, डाळी आणि गहू या महत्त्वाच्या पिकांचे तज्ज्ञ म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. या संशोधनात वरील पिकांच्या निरनिराळ्या रोगांपासून प्रतिकार करणार्या जातींची उत्पत्ती करून त्यांच्या उत्पन्नात वाढ केल्यामुळे त्यांचा नावलौकिक वाढला. कालांतराने कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारली. त्याचबरोबर कृषी उपसंचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती.
कृषी क्षेत्रातील त्यांच्या ख्यातीमुळे ‘कोलंबो प्लॅन’ प्रमाणे १९५९ साली जपान येथे भातशेतीच्या विशेष अभ्यासासाठी भारत सरकारतर्फे त्यांना पाठवण्यात आले होते. १९६८-७१ दरम्यान गोवा, दमण व दीव राज्याचे ते कृषी संचालक होते आणि तेथे भात, भाज्या, ऊस, काजू, केळी, नारळ, आंबा इत्यादी पिकांच्या उत्पन्नात वाढ कशी होईल, यासंबंधी चालू असलेल्या निरनिराळ्या संशोधन प्रकल्पांना त्यांनी मार्गदर्शन केले. १९७३मध्ये तेलबियांच्या विशेषत: सूर्यफुलांच्या अभ्यासासाठी त्यांना रशियात पाठवले होते.
अरगीकर यांनी निरनिराळ्या पिकांच्या नवीन जाती शोधून काढल्या. ‘अणुशक्तीचा शेतीसाठी उपयोग’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ते टोकिओला गेले होते (१९५९). हरभरा, करडई, सूर्यफूल, वांगी, सीताफळ, भुईमूग या पिकांवरील जनुकविज्ञानाविषयीचे त्यांचे संशोधन आणि अभ्यास यास कृषी क्षेत्रात फार महत्त्व आहे.
अरगीकर अखिल भारतीय कृषी समितीचे सदस्य होते, तसेच ते ‘इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अॅण्ड प्लान्ट ब्रीडिंग’चे आजीव सभासद होते. १९६१-६२मध्ये त्या सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी अनेक संशोधन पत्रिका प्रसिद्ध केल्या असून, काही विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शनही केले होते.
- संपादित