Skip to main content
x

आठल्ये,कृष्णाजी नारायण

कृष्णाजी यांचे वडील दशग्रंथी वैदिक असल्याने त्यांनाही तेच शिक्षण मिळाले. कर्‍हाड येथे त्यांचे थोडेसे मराठी शिक्षण झाले. पुण्याच्या ट्रेनिंग महाविद्यालयामध्ये राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सातारा जिल्ह्यात पाच वर्षे शिक्षकाची नोकरी केली. नंतर मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे ३ वर्षे शिक्षण घेतले. तेथे तैलचित्राचे विशेष ज्ञान संपादन केले. बडोदा येथे एका हायस्कूलमध्ये आठल्यांनी रंगकलेवर व्याख्यान दिले. योगायोगाने बडोद्याचे दिवाण सर टी. माधवराव व्याख्यानाला उपस्थित होते आणि व्याख्यानाने प्रभावित होऊन त्यांनी आठल्यांकडून अनेक तैलचित्रे काढून घेतली. मलबारमधील कोचीन येथे आठल्यांचे एक बंधू नोकरी करीत होते. ते आजारी पडल्याने त्यांना भेटायला म्हणून कृष्णाजी कोचीनला आले, ते २०वर्षे तेथेच राहिले . कोचीन मधील वास्तव्यात त्यांनी ‘केरळकोकिळ’ नावाचे मासिक सुरू करून (१८८६) ते सुमारे २५ वर्षे चालवले. त्याद्वारे त्यांनी तत्कालीन मराठी वाचकांत वाङ्मयाची आवड निर्माण केली.पहिली ५ वर्षे हे मासिक कोचीनहून निघत असे. त्यातील ‘पुस्तक परीक्षणे’, ‘लोकोत्तर चमत्कारांचे कथन’, ‘कविता’, ‘कूटप्रश्न’, ‘कलमबहादुरांस शेलापागोटे’ इत्यादी आकर्षक सदरांमुळे व सडेतोड लेखनामुळे ते फार लोकप्रिय झाले.

आठल्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. केरळमध्ये असताना त्यांनी नामावृत्तांतील ‘गीतापद्यमुक्ताहार’ हे पहिले पुस्तक प्रकाशित केले (१८८४). त्यानंतर त्यांनी तीसहून अधिक पुस्तके लिहिली. निर्णयसागर छापखान्याने ती प्रसिद्ध केली. छापखान्याच्या मालकाने १२ तोळ्यांचे सोन्याचे कडे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे बरेचसे लेखन अनुवादात्मक आहे. त्यात स्वामी विवेकानंदांवरील ‘राजयोग’, ‘भक्तियोग’ आणि ‘कर्मयोग’ हे अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत. याशिवाय ‘माझे गुरुस्थान’, ‘सार्थ दासबोध’, ‘समर्थांचे सामर्थ्य’, ‘सार्थ ज्ञानेश्वरी’, ‘सुलभ वेदान्त’, ‘आर्याबद्ध गीता’, ‘वसंत पूजा’, ‘फाकडे तलवार बहाद्दर’, ‘नरदेहाची रचना’, ‘विवेकानंद जीवन’, ‘ज्ञानेश्वरांचे गौडबंगाल’, ‘पंचतंत्रामृत’ हे ग्रंथ ‘सुश्लोक लाघव’, ‘सासरची पाठवणी’, ‘माहेरचे मूळ’, ‘शृंगार तिलकादर्श’, ‘मुलीचा समाचार’ ह्या काव्यरचना आणि ‘मुले थोर कशी करावीत?’,  ‘नजरबंद शिक्षक’, ‘ग्रहदशेचा फटका’, ‘मथुरा गणेश सौभाग्य’ वगैरेे गद्यरचना आकर्षक भाषाशैलीमुळे व पद्य प्रासादिक, आलंकारिक शैलीमुळे लोकप्रिय झाले. शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘महाराष्ट्र भाषा चित्रमयूर’ ही पदवी दिली होती. ‘आत्मरहस्य’ (१९१९), ‘The English Teacher’ भाग १ व २’ (१९२३), ‘कोकिळाचे बोल’ (निवडक लेख) (१९२६), ‘रामकृष्ण परमहंस’ (१९२९) या आठल्यांनी रचना होत.

- वि. ग. जोशी

आठल्ये,कृष्णाजी नारायण