Skip to main content
x

आठवले, विक्रम त्र्यंबक

डॉ.विक्रम त्र्यंबक आठवले यांनी रसायनशास्त्र या विषयातील पीएच.डी. पदवी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूरू येथून १९४५ साली प्राप्त केली. त्यानंतर कोलकाता येथील नॅशनल टेस्ट हाउस या प्रयोगशाळेत त्यांनी रसायन विश्‍लेषण पद्धतीच्या अद्ययावत पद्धतीवर संशोधनकार्य केले. १९४९ साली डॉ.भाभा यांनी त्यांना अणू संशोधन संस्थेत काम करण्याकरिता म्हणून बोलावून घेतले व त्या काळात त्यांना अ‍ॅनॅलिटिकल केमिस्ट्रीया विषयावर संशोधन करणाऱ्या शास्रज्ञांच्या गटाचे प्रमुख नेमण्यात आले. त्या वेळी त्यांची संशोधन शाळा मुंबईत केनिलवर्थ येथे होती. पुढे सर्व रसायनशास्राचे संशोधनकार्य करणाऱ्या प्रयोगशाळा स्वा. सावरकर मार्ग (कॅडल रोड) येथे हालविण्यात आल्या व तेथे गेल्यावर त्यांना स्वतंत्र विभाग प्रमुख म्हणून नेमण्यात आले (१९५५). १९६० सालाच्या सुरुवातीस रसायन प्रयोगशाळा तुर्भे येथील मॉड्युलर लॅबोरेटरी येथे हालविण्यात आल्या. त्यांच्या विभागावर अणुशक्तीच्या उपयोगात येणाऱ्या सर्व रासायनिक पदार्थांची शुद्धता तपासणे ही महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. नवीन प्रशस्त प्रयोगशाळेत त्यांनी नवीन उपकरणे आणून त्यांच्या प्रयोगशाळेचे एका अद्ययावत रसायन विश्‍लेषण विभागात रूपांतर केले.

स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मास स्पेक्ट्रोग्रफी, क्ष-किरण यंत्रे, तसेच इतर सर्व संशोधनपद्धतींचा वापर करण्यास येथे सुरुवात झाली. १९५८ साली अप्सराअणुभट्टी सुरू झाल्यावर तिचा वापर करून न्यूट्रॉन अ‍ॅक्टिव्हेशन अ‍ॅनॅलिसिसपद्धत विकसित करण्यात आली.

अणुभट्टीत वापरण्यासाठी उपयोगात येणारे जवळजवळ सर्वच पदार्थ अतिशय शुद्ध स्वरूपात वापरले जातात. अशा पदार्थांतील अशुद्धता ही दहा लाखांत एक (पार्ट्स पर मिलियन) ते शंभर  कोटी भागांमागे एक (पार्ट्स पर बिलियन) इतकी कमी असावी लागते. अर्थात, इतक्या कमी असलेल्या अशुद्धीचा शोध घेणे हे फार जिकिरीचे काम असते. ते अतिशय अवघड, परंतु अतिशय गरजेचे काम आठवले यांनी यशस्विरीत्या पार पाडले. अणुऊर्जा क्षेत्रासाठी लागणारे तंत्रज्ञान कोणीही विकत नाही किंवा उदारहस्ते देत नाही. ते स्वत:च विकसित करावे लागते. आठवले यांनीही या पदार्थशुद्धीच्या क्षेत्रासाठी लागणारी नवनवीन तंत्रे देशातच विकसित केली. त्यासाठी भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक उपकरणांचा उपयोग त्यांनी कल्पकतेने करून घेतला. या उभरत्या नवीन क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून काम करू शकणाऱ्या अनेक तरुणांची एक नवीन पिढीच त्यांनी तयार केली.

सुरुवातीला इंधनयुक्त युरेनियम व थोरियम यांची शुद्धता तपासण्याकरिता लागणाऱ्या धातूंवर त्यांनी संशोधन केले. विश्‍लेषण पद्धती विकसित करून त्या प्रमाणित करण्याचे संशोधन डॉ.आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले. जड पाण्याची शुद्धता मापण्याच्या पद्धतीवर संशोधन करून ती प्रमाणित करण्यात आली. त्यातूनच वॉटर केमिस्ट्रीया एका नवीन क्षेत्राचा उदय आणि विकास देशात झाला. झिरकोनियम धातूचा उपयोग इंधन नलिका बनविण्याकरिता होतो. अर्थात त्याच्या शुद्धतेत परीक्षण व मापनही महत्त्वाचे असते. यावरील संशोधन डॉ. आठवले यांच्या प्रयोगशाळेत प्रमाणित करण्यात आले. इतर महत्त्वाचे धातू म्हणजे अ‍ॅल्युमिनिअम, कॅडमियम, बोरॉन, बेरेलियम व स्टील. यांची शुद्धता तपासण्याकरिता लागणारी प्रणालीसुद्धा डॉ.आठवले यांच्या प्रयोगशाळेत प्रमाणित करण्यात आली. गुन्हे विश्‍लेषण शास्त्रातही निरनिराळ्या मूल्यांची अचूक मोजणी महत्त्वाची असते. तेथे आठवले यांनी प्रमाणित केलेल्या कार्यप्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर त्याकरिता लागणारे संशोधनही याच प्रयोगशाळेत सुरू  करण्यात आले.

विविध उद्योगधंदे, तसेच इतर सरकारी खात्यांमधून अशा प्रकारच्या रासायनिक विश्‍लेषण पद्धतीची गरज भासल्यास त्यांना मदत करण्याचे, तसेच तेथील प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना शिक्षण देण्याचे कामही डॉ. आठवले यांच्या प्रयोगशाळेत केले गेले.

डॉ. आठवले एक कार्यक्षम प्रशासक व शास्त्रज्ञ होतेच; पण ते एक उत्तम शिक्षकही होते. भाभा अणू संशोधन केंद्रात भरती होणार्‍या शास्त्रज्ञांसाठी विश्‍लेषण रसायनशास्त्राकरिता त्यांनी एक अभ्यासक्रम तयार केला व या प्रशिक्षणावर चांगले नियंत्रणही केले.

डॉ. आठवले हे उत्तम संघटक होते. याचे प्रत्यंतर त्यांनी संपादित केलेल्या अणुयुगया पुस्तकावरून दिसून येते. अणू संशोधन केंद्रातील वेगवेगळ्या पंधरा विषयांत संशोधन करणाऱ्या मराठी भाषक शास्त्रज्ञांच्या मदतीने त्यांनी हे पुस्तक तयार केले व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे त्याचे प्रकाशन केले गेले. आजतागायत अणुशक्तीया विषयावरील मराठीतील ते एकमेव व परिपूर्ण पुस्तक आहे.

- डॉ. श्री. बा. मनोहर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].