Skip to main content
x

बालरामन, सुनंदा

सानिया

     सानिया यांचा जन्म सांगली येथे झाला. पूर्वाश्रमीच्या त्या सुनंदा कुळकर्णी. ‘सानिया’ या टोपण नावानेच त्यांनी सारे लेखन केले. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर फिरत, अनेक शाळांतून त्यांचे शालेय शिक्षण झाले. अखेर नाशिकच्या सरकारी कन्याशाळेतून मॅट्रिक झाल्यानंतर नाशिक कॉलेज आणि पुणे येथे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. १९७४मध्ये त्या एम.कॉम. झाल्या. पदवीधर झाल्यावर, लग्नाअगोदर काही दिवस त्यांनी नोकरीही केली.

     सानियांच्या घरात साहित्यिक वातावरण नव्हते; पण त्या मात्र शाळेत असल्यापासूनच लिहू लागल्या. शालेय मासिकातून त्यांचे लेखन छापून येऊ लागले. सुरुवातीच्या काळात त्यांनी कविताही लिहिल्या. १९७०पासून त्या लेखन करीत आहेत. पण १९७५पासून ‘सत्यकथा’, ‘मौज’ ‘हंस’ ‘कथाश्री’, ‘किस्त्रीम’, ‘अक्षर’, ‘तरुण भारत’, ‘केसरी’ यांसारख्या मासिकांतून त्यांचे कथालेखन सातत्याने सुरू आहे.

     विवाहानंतर नवर्‍याच्या नोकरीमुळेच देश-परदेशांत त्यांचे वास्तव्य राहिले. त्यांनी तिथला समाज बघितला, माणसे पाहिली. हे सगळे अनुभवून त्यांनी लेखन केले. गेली अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य महाराष्ट्राबाहेर, बंगलोरलाच आहे.’ “समाजात वावरताना जे अनुभवले, जाणवले, त्यातूनच लेखनाला सुरुवात झाली. तेव्हा हे सारे लेखन मी ठरवून केलेले नाही. ते नैसर्गिकपणे झाले आहे,” असे त्या म्हणतात. कथा, कादंबरी, दीर्घकथालेखनाबरोबरच काही अनुवादही त्यांनी शब्दांकित केले आहेत. ‘वाट दीर्घ मौनाची’  हा स्वैर अनुवाद व ‘सानिया की कहानियाँ’ - हा दीर्घकथासंग्रह हिंदीमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

     त्यांच्या प्रगल्भ संवेदनशील साहित्याची दखल अनेकांनी घेतली आहे. त्यांना राज्यशासन पुरस्कार, साहित्य परिषद पुरस्कार, वर्टी पुरस्कार, वि.स. खांडेकर स्मृती पुरस्कार, जयवंत दळवी स्मृती पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांच्या लेखनासाठी मिळाले आहेत.

     सानियांनी सुरुवातीला कथा हा वाङ्मयप्रकार हाताळला. ‘शोध’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८०मध्ये मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. त्यानंतर ‘खिडक्या’ (१९८९), ‘भूमिका’ (१९९४), ‘वलय’ (१९९५), ‘परिमाण’ (१९९६), ‘प्रयाण’ (१९९७) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

    ‘प्रतीती’ (१९८९), ‘दिशा घराच्या’ (१९९१), ‘ओळख’ (१९९२) ‘आपण आपले’ (२००३) हे त्यांचे दीर्घकथासंग्रहही प्रकाशित झाले आहेत.

    मानवी संबंधाचा, त्यातही मानवी नात्यातील दुरावा, कोरडेपणा, अकारण निर्माण होणारे समज-गैरसमज यांतून वाट्याला येणारे एकाकीपण त्यांच्या कथांतून आधिक्याने जाणवते. स्त्री-केंद्रीभूत असेच हे लेखन आहे.

    त्यांचे अनुभव, त्यांना जे लिहायचे, सांगायचे, व्यक्त करायचे आहे ते लघुकथा या वाङ्मयप्रकारात व्यक्त करणे अशक्य वाटल्यावर सानियांनी ‘दीर्घकथा’ लिहिल्या. तर, विषयाचा आवाका, अभिव्यक्ती याही पलीकडची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी कादंबरीलेखन केलेले दिसते. ‘स्थलांतर’ (१९९०), ‘आवर्तन’ (१९९६), ‘अवकाश’ (२००१) या त्यांच्या तीन कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘स्थलांतर’ कादंबरीचे लेखन त्यांनी पत्रात्मक निवेदनपद्धतीने केले आहे.

     सानिया यांच्या कादंबरीतील स्त्री-व्यक्तिरेखा- नंदिता, सुरुची, जान्हवी या सगळ्याच सुशिक्षित, कमवत्या स्वतःच्या अस्तित्वाचे भान असलेल्या, स्वातंत्र्याची आस धरणार्‍या आहेत. स्वतःप्रति सजग होत जाणारी स्त्री सानियांच्या कादंबरीत विशेषत्वाने भेटते. मुद्दाम स्त्रीवादी म्हणून त्यांनी लेखन केलेले नाही. स्त्रीच्या भूमिकेतून ‘ती एक माणूस’ म्हणून सहजपणे मांडली आहे.

    स्त्रीचे अस्तित्व, तिची महत्त्वाकांक्षा, तिचे व्यक्ती म्हणून जगणे, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे या दृष्टिकोनांतूनच एका कलात्मक पातळीवर त्यांनी हे सारे चित्रण केले आहे. आणि इथेच त्यांचे हे वेगळेपण अधोरेखित होते.

    - प्रा. मंगला गोखले

बालरामन, सुनंदा