Skip to main content
x

बापट, निळकंठ गंगाधर

         गंगाधर दामोदर बापट व ताराबाई गंगाधर बापट या दाम्पत्याच्या पोटी एका सुसंस्कृत व मध्यमवर्गीय कुटुंबात निळकंठ बापट यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे येथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे येथील भावे विद्यालयात व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथे झाले. व्यवस्थापनशास्त्रातील गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. प्र.चिं.शेजवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी त्यांना अमेरिकन शासनाची फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी १९७५-१९७६मध्ये क्लिवलँड, अमेरिका येथील केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठ येथील शिक्षणक्रम पूर्ण केला. त्यानंतर बापट यांनी पुणे, मालेगाव, जळगाव, अहमदनगर येथील महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून काम केले. ते १९६८मध्ये औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वाणिज्य विभागप्रमुख म्हणून रुजू झाले व १९९६मध्ये तेथून निवृत्त झाले. या कार्यकाळात त्यांनी व्यवस्थापनशास्त्र व संगणकशास्त्र या विषयांत अनेक अभ्यासक्रम सुरू केले. मराठवाडा विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर त्यांनी थायलंड या देशातील खॉनखेन येथील विद्यापीठात व्यवस्थापनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. आजही ते अध्यापन व संशोधन कार्यात व्यग्र आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी एम.फिल. व पीएच.डी.च्या पदव्या प्राप्त केल्या आहेत. डॉ. बापट यांनी विद्यापीठातील कार्यकारिणी, विद्वतपरिषद, अभ्यासमंडळ, महाविद्यालयांची परीक्षण समिती इत्यादी, त्याचप्रमाणे लोकसेवा आयोगासारख्या संस्थांमध्ये व्यवस्थापकीय पदेही भूषवली.

         वंशपरंपरेने डॉ. बापट हे शेतकरी होते. सातारा जिल्ह्यातील हुमगाव या गावाचे ते इनामदार होते. विसाव्या शतकातील सहाव्या दशकात महाराष्ट्रात कुळकायदा अमलात आला व इनाम-वतने रद्द झाली. बापटांचा शेतीशी असलेला काही शतकांचा संबंध संपला. तरीही  शेतीविषयीच्या आस्थेने त्यांनी कृषी संशोधनावर लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून गणला जातो. दुष्काळकाळात या जिल्ह्यात दंगलीही झाल्या. जिल्ह्यातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू शेती होती. दुष्काळ निवारणाच्या हेतूने त्या वेळच्या ब्रिटिश सरकारने गोदावरी, प्रवरा व मुळा नद्यांवर धरणे बांधली व कालव्यांचे जाळे विकसित केले. त्याआधारे अहमदनगर जिल्ह्यात ऊस शेती व त्यावर आधारित साखर उद्योग विकसित झाला व एके काळचा दुष्काळी जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. हा सर्व इतिहास बापट यांनी आपल्या ‘अहमदनगर जिल्ह्याचा आर्थिक विकास १८६१-१९६१’ या ग्रंथात ग्रंथित केला आहे. याच निमित्ताने जिल्ह्यातील पीक-पाणी, विविध पिकांचे उत्पादन व त्यांची उत्पादकता, पाणीपुरवठा, शेतीस उपयुक्त अवजारे, गुरेढोरे यातील शतकात झालेले बदल, शेती उत्पादनावर आधारित साखर व इतर अनेक उद्योगधंदे या सर्वांचा अभ्यास बापट यांनी केलेला आहे. याचप्रमाणे शंभर वर्षांतील पाऊसमान, त्यातील चढउतार व त्याचा पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम, त्याची मोजदाद व भविष्यकाळातील पर्जन्याचा अंदाज हे बापट यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय होते. शेतीसाठी पाणी हा प्राण आहे. पाण्याचे अनेक पर्यायी उपयोग आहेत व त्याची उपलब्धी अनेक पर्यायी स्रोतांतून होते व त्यास येणारा खर्च भिन्नभिन्न आहे. तेव्हा खर्च व उत्पन्न यांचा मेळ घालून पर्याप्त उपयोग होईल असे नमुनारूप कसे मिळवता येईल या संकल्पनेवर आधारित संशोधन त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.

         महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत प्राचीन काळापासून झालेला बदल, नव्याने वसलेले प्रदेश, नवे वसाहतकार, त्यांनी विकसित केलेले प्रदेश, त्यातील शेती, वतनदारी, शेतीवरील आकारणी, पतपुरवठा या सर्वांचा बापट यांनी केलेला अभ्यास चरित्रकोश-इतिहास खंड यात प्रसिद्ध झाला आहे. तसेच मुळा-प्रवरा नदीवरील धरणे, कालवे व शेती यासंबंधित अभ्यास महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियर विभागाने प्रसिद्ध केला आहे.

         सध्या बापट महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा अभ्यास करत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ या क्षेत्रांत ज्यांनी लक्षणीय योगदान दिले आहे. अशा अनेक कोरडवाहू, बागायतदार, फळबागा मालक यांचा शेतीतील अनुभव व प्रयोग यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.

- संपादित

बापट, निळकंठ गंगाधर