Skip to main content
x

बापट, श्रीकांत कृष्णाजी

       श्रीकांत कृष्णाजी बापट यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीला होते. त्यांचे वडील रमणबाग शाळेत उपमुख्याध्यापक होते. त्यांना आपल्या घरातच स्वयंशिस्तीचे बाळकडू मिळाले. घरात लोकशाहीचे वातावरण असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच जबाबदारीने वागण्याची, विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि इतरांसाठी झटण्याची सवय लागली. रमणबाग शाळेतील शिक्षक आणि महाराष्ट्र मंडळातील मान्यवरांच्या सहवासात त्यांची जडणघडण झाली. महाराष्ट्र मंडळात बॉक्सिंग, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल इ. खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. या मंडळात तसेच पुढे बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे त्यांना उत्तम शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन लाभले.

      बापट यांनी आपली खेळाची आवड जोपासत महाविद्यालयात बॉक्सिंग संघ तयार केला आणि या संघाने विजेतेपदही प्राप्त केले. त्यांना पुणे विद्यापीठाचे रमा-विष्णू पदकासहित अन्य पदकेही त्यांना मिळाली. अ‍ॅडव्हान्स अकाउंटिग आणि ऑडिटिंग हे विषय घेऊन पुणे विद्यापीठात ते बी.कॉम.च्या परीक्षेत प्रथम आले. पालकांवर आर्थिक भार टाकून परदेशात एम.बी.ए. करायला जाण्यापेक्षा त्यांनी सी.ए. करता-करता स्पर्धा परीक्षा देण्याचा पर्याय निवडला.

       महाराष्ट्र मंडळात तत्कालीन चीफ ऑफ स्टाफ जनरल नागेश आले असताना त्यांनी लहानग्या श्रीकांतला ‘आर्मीत येतोस का?’ असे विचारले होते. तसेच सी.ए.ची अंतिम लेखी परीक्षा देण्यापूर्वी त्यांना ‘तू समाजाचं ऑडिट कर, पोलीस सेवेत दाखल हो’, असा सल्ला काकासाहेब गाडगीळ यांनी दिला होता. परिणामी बापट यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा व मुलाखत दिली आणि त्यांची पोलीस सेवेसाठी निवड झाली. १९६२ पासून त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. मसुरी, माउण्ट अबू आणि नाशिक येथे त्यांचे प्रशिक्षण झाले.

        त्यांना शारीरिक क्षमता वाढवणे आणि भाषेचे व शिस्तीचे प्रशिक्षण मिळाले. सेवेसाठी आपल्या राज्याचा पर्याय निवडल्याने श्रीकांत बापट महाराष्ट्र कॅडरमध्ये दाखल झाले. त्यांची पहिली नेमणूक नागपूर येथे झाली. ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख तसेच पोलीस उपायुक्त (नागपूर), जिल्हा अधीक्षक (नगर), जिल्हा अधीक्षक (नाशिक), उपआयुक्त विशेष शाखा -१, महाराष्ट्र गुप्तहेर खात्याचे पोलीस अधीक्षक (मुंबई) अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी १६ वर्षे काम केले.

        त्यानंतर त्यांना देशाच्या गुप्तचर विभागात वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी मिळाली. दिल्लीत त्यांनी हे काम सुरू केले, पण नंतर १२ वर्षे ते याच कामासाठी मुंबईत होते. त्यावेळी देशाच्या पश्चिम प्रभागाची म्हणजे राजस्थान, गुजरात, गोवा व महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर होती. देशाच्या सुरक्षेला कोणत्याही प्रकारे धक्का लागू नये याकरिता काम करण्याची संधी त्यांना मिळाली. समाजातल्या खालच्या थरापासून सर्व मोठमोठ्या पातळीवरची माणसे भेटण्याची-पाहण्याची, तसेच सहकाऱ्यांच्या आणि हाताखालच्या लोकांसमोर स्वत:च्या वागणुकीतून आदर्श उभे करण्याची संधी त्यांना पोलीस सेवेत मिळाली. खरे म्हटले तर तेच समाजशिक्षण असते.

       हाताखालच्या लोकांना शिस्त, वक्तशीरपणा, शारीरिक तंदुरुस्ती, सजगता, धाडस, निगर्वीपणा या सर्वच बाबतीत स्वत: आदर्श घालून देण्याचा पायंडा पाडणाऱ्यातले श्रीकांत बापट एक होते. त्याचे प्रत्यंतर मुंबईत १९९२-१९९३ साली झालेल्या दंगलीच्या काळात आले.

       दंगलीच्या काळात ते मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी काम करत होते. दिवसभराच्या कामानंतर ते रात्री ३-४ वाजता मुंबईत गस्त घालत असत. त्यावेळी आणि कोणत्याही तणावपूर्ण वातावरणात त्यांचा सच्चा पोलीस ताफा त्यांच्यासह असे. या दंगलीच्या काळात मुंबईत शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी त्यांनी पोलीस दलामार्फत केली. पोलीस सेवेत असताना त्यांना ‘इंडियन पोलीस मेडल’, ‘प्रेसिडेन्स पोलीस मेडल फॉर डिस्टिन्ग्विश्ड सर्व्हिस’ ही पदके देण्यात आली. भारतीय पोलीस सेवेतल्या काही ठराविक लोकांना कोलंबो शिष्यवृत्ती दिली जाते, ती श्रीकांत बापट यांना मिळाली. पोलीस प्रशासनातले अत्युच्च शिक्षण घेण्याची संधी त्यांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळाली. त्यासाठी ते ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये गेले होते. भारतीय गुप्तचर विभागात काम करताना पाश्चिमात्य देशांमधल्या गुप्तचर संघटनेत विचारांचे आदानप्रदान करण्याची संधीही त्यांना मिळाली.

       आज पोलीस सेवेतून ते सेवानिवृत्त झाले आहेत. पण त्यांना पुन्हा संधी मिळाल्यास ते पोलीस सेवेतच येतील इतकी त्यांची या कामावर श्रद्धा आहे. त्यामुळेच सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये १९९३ ते १९९९ या काळात ज्येष्ठ सदस्य पदावर जेव्हा कार्यरत होते, तेव्हा त्यांनी प्रशासकीय सेवेसाठी योग्य व्यक्तींची निवड केली. त्यानंतर त्यांनी आरोग्य आणि शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या ‘हिंदुजा फाउण्डेशन’चे अध्यक्ष म्हणून ७ वर्षे काम केले.

        राजस्थान इथल्या युनायटेड रिसर्च डेव्हलपमेंट प्रोग्राम या सामाजिक संस्थेचेही ते विश्वस्त आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय समितीसमोर कुलगुरूंचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. आज खाजगी क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांच्या संचालक मंडळावरही ते आहेत. इथे मनुष्यबळ विकासाचे काम ते करतात. राष्ट्रीय सुरक्षा, मनुष्यबळ विकास, फळशेती अशा विषयांत रस असल्याने ते आज या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

       - पल्लवी गाडगीळ

बापट, श्रीकांत कृष्णाजी