बेडेकर, मालती विश्राम
स्त्रियांचा खराखुरा आवाज आपल्या वाङ्मयाद्वारे धीटपणे प्रथमच मांडणार्या मालतीबाई बेडेकर यांचा जन्म त्यांच्या आजोळी, आवास, तालुका अलिबाग येथे झाला. जन्मनाव बाळूताई असे होते. त्यांच्या आईचे नाव इन्दूताई व वडिलांचे नाव अनंतराव खरे असे होते. वडील गुहागर येथून मुंबईस शिक्षणासाठी आले, पण कोणाचा आधार नव्हता. गुहागरच्या फाटक नावाच्या गृहस्थाकडे शिवणकाम व इतर कामे करत राहिले. दुपारी दुकान बंद असताना चित्रकलेच्या वर्गाला जाऊन चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. नंतर फणसवाडीत बिर्हाड केले. मुंबईत असताना रावसाहेब रेगे यांच्या संपर्कात येऊन टिळक-आगरकर यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर बसला. मुंबईत प्लेग सुरू झाल्यामुळे त्यांना मुंबई सोडावी लागली. त्याच वेळी घोडनदी, शिरूर येथे अमेरिकन मिशन स्कूलमध्ये चित्रकलेचे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. बाळूताई ह्या स्वतः त्यांच्या आईवडिलांची दुसरी मुलगी. पहिली मुलगी म्हणजे कृष्णाबाई मोटे. इतर दोन बहिणींपैकी एक स्टॅटीस्टिशिअन होती व एक डॉक्टर होती. दोघे भाऊ स्वतंत्र व्यवसायात होते. बाळूताईंचे वडील पुरोगामी विचारांचे असल्यामुळे आपल्या मुलींना द्विपदवीधर करण्याचा निश्चय त्यांनी मुली लहान असतानाच केला होता. मुलींबाबत अत्यंत संकुचित व प्रतिगामी विचारसरणीच्या काळात वडिलांचे विचार काळापुढे ५०-६० वर्षे धावणारे होते; त्यांनी आपल्या मुलींना मिशनच्या मुलांच्या शाळेत घातले. बाळूताईंचे सातवीपर्यंतचे शिक्षण शिरूरला झाले. लहानपणी मुलीला सायकल शिकविणे, त्या काळात शिरूरमध्ये आलेल्या पहिल्या ट्रकने शिक्षणासाठी कर्वे शिक्षण संस्थेत पुण्याला पाठवणे, जातिभेद न पाळणे हे वडिलांचे प्रगतिपर विचारांचे द्योतक समजायला पाहिजे. स्वतःच्या वडिलांवर ‘खरे मास्तर’ ही कादंबरी लिहून सामान्य माणसातील असामान्यत्वाचे दर्शन घडविण्यात बाळूताई यशस्वी झालेल्या आहेत. बाळूताई पुण्याला कर्वे शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात राहत. त्या संस्थेच्या मॅट्रिकच्या परीक्षेत १९१९ साली त्या सर्वप्रथम आल्या. कर्वे विद्यापीठाच्या जी.ए.(गृहीतागमा) परीक्षेतही त्यांना प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला. प्रघोगमा या पदवीसाठी ‘अलंकारमंजूषा’ हा प्रबंध १९२८ साली सादर केला. पुण्याच्या कन्याशाळेमध्ये १९२३ ते १९३३ या कालावधीत शिक्षिका व लेडी सुप्रिन्टेन्डन्ट म्हणून त्यांनी काम केले. तेथे असतानाच मुंबईत जाऊन त्या बी.टी.झाल्या. त्याच वेळी महिलाश्रमाचे सेविकापद स्वीकारून कर्वे आश्रमाचे तहहयात सभासदत्व त्यांनी घेतले होते.
श्री.म.माटे यांच्या व्याख्यानांमुळे त्याच्या अस्पृश्योद्धार कार्यामध्ये त्या सहभागी झाल्या. गुल्लटेकडी विभागात सायकलने जाऊन साक्षरतेचे व स्वच्छतेचे कार्य त्या करीत. वसंत व्याख्यानमाला, गडकरी स्मृतिदिनानिमित्त फर्गसन महाविद्यालयामधील सभा अशा सभांमधून आपले पुरोगामी विचार त्या समर्थपणे मांडीत असत. अशी एकूण दोन हजार व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. महाराष्ट्राची विद्युल्लता म्हणून त्यांना ओळखले जात असे.
कर्वे आश्रमात राहिल्यामुळे तसेच साक्षरता व अस्पृश्योद्धार ह्या कामांमुळे स्त्रियांच्या वास्तव प्रश्नांचे त्यांना प्रत्यक्ष दर्शन घडले. समाजात भरडली जाणारी स्त्री, तिच्या विविध समस्या, परित्यक्ता, बालविधवा, माणूस म्हणून जगण्याच्या स्त्रीच्या हक्कांची होणारी पायमल्ली या सर्व गोष्टींचा त्याच्या संवेदनशील मनावर परिणाम झाला. शिवाय स्वतःचे वडील आणि टिळक-आगरकर, कर्वे, माटे यांच्या विचारांचा प्रभाव होताच. स्त्रीमुक्ती म्हणजे काय, याची कल्पना १९६०-१९७०पर्यंत आपणाकडे फारशी नव्हती. ह्या स्त्रीमुक्तीचा खराखुरा वास्तववादी आद्य हुंकार ‘कळ्यांचे निःश्वास’ (१९३३) या कथासंग्रहातून उमटला. पाठोपाठ ‘हिंदोळ्यावर’ (१९३४) व ‘विरलेले स्वप्न’ (१९३५) ह्या कादंबर्या ह.वि.मोटे यांनी प्रकाशित केल्या. हे सारे लेखन विभावरी शिरूरकर ह्या टोपणनावाने प्रसिद्ध झाले. संस्कृतीची आवड, रात्रीची नीरव शांतता आवडायची; म्हणून ‘विभावरी’ हे नाव व शिरूरला वास्तव्य होते; म्हणून शिरूरकर या अर्थाने हे टोपणनाव घेतले होते. ‘कळ्यांचे निःश्वास’ हा मराठी साहित्यविश्वातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे, त्यामध्ये ११ भावकथा आहेत. आता या पुस्तकाला ७५ वर्षे झाली; परंतु स्त्रियांच्या मूलभूत प्रश्नांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. स्त्री कितीही शिकली, तरी तिची घुसमट थांबलेली नाही. उलट प्रौढ कुमारिकेचे प्रश्न जास्त तीव्र झालेले आहेत. लग्नाच्या वेळी स्वतःला दाखवून घेण्याच्या तडजोडीपासून पुढे अनेक तडजोडी सतत कराव्या लागतात. मानवी जीवनात पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही असणारी कामभावना अत्यंत नैसर्गिक आहे. त्या भावनेचे संयत व कलात्मक वर्णन त्यांच्या या भावकथांमध्ये आहे. परंतु ‘बाबांचा संसार माझा कसा होणार!’ ह्यासारखे निर्भीड सत्यकथन सनातनी संस्कृति-रक्षकांना झोंबले, टोपणनावाने कोण लिहीत आहे, ह्याचा कसून शोध झाला. अनेक ठिकाणी चर्चा, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सभा, वाद, प्रतिवाद झाले. १९४९ साली निघालेल्या ‘विभावरीचे टीकाकार’ या पुस्तकात याची सविस्तर माहिती आहे. ‘विविधवृत्त’ त्यातील ‘अलमगीर’ हे विरोधाबाबत आघाडीवर होते. विश्ववाणीमध्ये ना.र.अळतेकरांनी दहा लेख लिहिले. ‘विभावरीबाई पत्ता द्या’ अशी एकच हकाटी झाली. त्र्यं.शं.शेजवळकर ‘निःस्पृह’ नावाने लिहिणारे तुळजापूरकर विरोधात होते. न.चिं.केळकर आचार्य अत्रे, वा.म.जोशी, मामा वरेरकर, कमलाबाई टिळक इत्यादींनी विभावरीच्या वाङ्मयाची प्रशंसा केली.
विभावरी शिरूरकर ह्यांच्या वाङ्मयावर प्रभात, त्रिकाल वगैरे नऊ दैनिकांतील मजकूर सोडूनही दोन हजार पृष्ठांची टीका नीटपणे आलेली होती. हा सारा गदारोळ उठण्याचे कारण ‘कळ्यांचे निःश्वास’ (१९३३) इतकीच ‘हिंदोळ्यावर’ (१९३४) ही कादंबरी होती. ‘अचळा’ ही या कादंबरीतील नायिका. ती शाळेत शिक्षिका असते, तिचा पती व्यसनी व गुन्हेगार असतो; त्या काळी घटस्फोटाची कायदेशीर सोय नव्हती. लग्न न करता चिरागवर प्रेम करून मातृत्वाचा अधिकार मिळविण्याबाबत अचळा ठाम असते. अचलेचे मातृत्व हा तिचा स्वैराचार नसून, तो तिचा हक्क आहे असा क्रांतिकारी विचार विभावरींनी ६०-६५ वर्षांपूर्वी मांडला. विभावरींच्या समाजचिंतनाची साक्ष म्हणून त्याकडे बघायला हवे. स्त्रीचा माणूस म्हणून विचार केला नाही, तर काय घडू शकते; याचे ते वास्तवचित्रच आहे. ह्यापूर्वी ह.ना.आपटे, वा.म.जोशी, माडखोलकर यांनी स्त्रियांविषयी सहानुभूतीपर लेखन केलेले आहे. विभावरींनी स्त्रीच्या भावनांची नैसर्गिक उलघाल संयमित रितीने मांडली आहे. या वैचारिक पुरोगामित्वाचा विभावरींना इतका त्रास झाला की, विरोधकांनी त्यांची प्रेतयात्रा काढण्यापर्यंत मजल गेली. स्त्रीवादी लेखनाचे कुठलेही दिशादर्शन समोर नव्हते. वैचारिकदृष्ट्या स्त्रीमुक्तीचा फार महत्त्वाचा टप्पा ‘हिंदोळ्यावर’ (१९३४) ह्या कादंबरीने गाठला आहे. ‘हिंदोळ्यावर’ ह्या कादंबरीतून विभावरींनी सामाजिक समस्येचे सर्जक रूप मांडले आहे.’ असे डॉ.भालचंद्र फडके म्हणतात, ते खरे आहे.
त्यानंतर ‘विरलेले स्वप्न’ (१९३५), ‘बळी’ (१९५०), ‘जाई’ (१९५२), ‘दोघांचे विश्व आणि इतर कथा’ (१९५७), ‘शबरी’ ही सर्व पुस्तके विभावरी शिरूरकर या नावाने लिहिलेली आहेत. ‘रानफुले’, ‘हिंदू-व्यवहार धर्मशास्त्र’, ‘स्त्रियांच्या हक्कांची सुधारणा’ ही पुस्तके बाळूताई खरे या नावाने; तर ‘चार भाषांतरे’, ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ आणि ‘काळाची चाहूल’, ‘संकटमुक्त स्त्रियांचे पुनर्वसन’ (१९६४), ‘उमा’ (१९६६); काही नाटके, ‘साखरपुडा’ (१९६२) चित्रपट, मनस्विनीचे चिंतन, प्रौढ साक्षरांसाठी लेखन अशी विविध वाङ्मयीन कामगिरी त्यांच्या मालतीबाई या नावावर आहे, ‘बळी’, ‘शबरी’, ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ व ‘काळाची चाहूल’ यांना राज्यपुरस्कार मिळालेले आहेत. ‘कळ्यांचे निःश्वास’चा पुरस्कार टोपण नावामुळे घेता आला नाही. ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’मध्ये १९४१ ते १९५६ या काळातील स्त्रियांच्या संस्थांची पाहणी करून काढलेले निष्कर्ष आहेत. ‘पारध’ या नाटकाला मुंबई साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला होता. श्रेष्ठ व प्रदीर्घ वाङ्मयीन कामगिरीसाठी; १९९२ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार व जुलै, १९९८ मध्ये साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृती हे सन्मान त्यांना देण्यात आले. अखिल भारतीय स्त्री परिषदेच्या अध्यक्षा म्हणून नागपूर, कर्हाड, जळगाव, अलिबाग, मडगाव येथे त्यांची निवड झाली. १९५१ साली प्रजासमाजवादी पक्षातर्फे त्या विधानसभेला उभ्या होत्या. १९५२ साली पीस मिशनतर्फे त्यांना रशियाला आमंत्रित केले गेले होते. प्रौढशिक्षण व बालशिक्षण ह्या समित्यांवर नियुक्ती तसेच इंग्लंड, रशिया, फ्रान्स येथील स्त्री-जीवनाचा अभ्यास व त्या कारणाने त्या देशांना भेटी झाल्या. १९८१ साली मुंबई येथे भरलेल्या ‘समांतर’ मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
१९३७ ते १९४० ही तीन वर्षे विभावरी सोलापूर येथील बॅकवर्ड क्लास ऑफिसमध्ये, रिमांड व रेस्क्यू होममध्ये स्त्री-विभागावर पर्यवेक्षिका म्हणून काम करीत होत्या. १९४० साली त्यांनी सोलापूर सोडले. पण तेथील मुले, माणसे त्यांना पुण्याला भेटायला येत. त्या मुलांचे विषय त्यांच्या डोक्यात ठाण मांडून बसलेले होते. त्यातूनच ‘बळी’ या कादंबरीची निर्मिती झाली. ही कादंबरी मराठी कादंबरीच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरावी अशीच आहे. १९५० साली दलित साहित्याची वेगळी चूल मांडली गेलेली नव्हती. अशा काळात एका सवर्ण स्त्रीने मांग, गरुडी यांसारख्या गुन्हेगारी समाजाच्या सामूहिक मनाची व आबा, चांगुणा यांची मनोविश्लेषणात्मक व्यक्तिचित्रे अप्रतिम रेखाटली आहेत. तेथील परिसराचे रेखाटनही अस्सल उतरले आहे. विभावरींच्या व्यापक जाणिवेच्या, विशाल मानवतेचा जीवनासंबंधीच्या सखोल चिंतनाचा तो पुरावा आहे. विभावरींचे निरीक्षण व आकलन, त्यांची जात-धर्म यांना पार करून जाणारी अपार करुणा ह्या सार्यांचे दर्शन कादंबरीत घडते. माणूस सुधारू शकतो, ह्या तत्त्वावर त्यांचा विश्वास होता. क्षमाशीलता त्यांच्या ठिकाणी भरपूर होती. म्हणूनच की काय सोलापूरच्या त्यांच्या घरातील मोलकरीण ही एके काळची दरोडेखोर स्त्री होती व २-३ खुनांचा आरोप असलेला मनुष्य त्यांचा रखवालदार होता. त्यांच्या परिवर्तनशील क्रांतिकारी विचारसरणीला कृतिशीलतेची जोड होती. १९५६नंतर ‘महिला सेवाग्रम’मध्ये त्यांनी विनावेतन काम केले. अनाथ मुलींना त्या वेळप्रसंगी घरी संभाळीत. श्री.विश्राम बेडेकरांसारख्या वादळाबरोबर त्यांनी संसार केला.